Pratikar News
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करावे आणि अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव मान्य असल्याचा दावाही रामदास आठवले यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांना राज्यात मुख्यमंत्रिपदावर विराजमान होऊन दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. आणखी एक वर्ष त्यांनी मुख्यमंत्रिपदावर राहावे आणि पुढची अडीच वर्षे भाजपचे फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावर बसू द्यावे, असेही आठवले म्हणाले.
शिवसेनेशी पुन्हा राज्यात युती होत असेल तर भाजपही तयार असून आमचीही अशीच इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात पुन्हा सेना-भाजपचे सरकार स्थापन करून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करावे, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी अडचणीत आणत आहेत. त्यामुळे उद्धव पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन येऊ शकतात, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जातील असे वाटले नव्हते. मात्र त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन सत्ता स्थापन केल्याचे ते म्हणाले.