Home आपला जिल्हा ‘भूजल पुनर्भरण-एक लोक चळवळ’ विषयावर ऑनलाईन वेबिनार* Ø दुष्काळ परिस्थतीच्या प्रभावी...

‘भूजल पुनर्भरण-एक लोक चळवळ’ विषयावर ऑनलाईन वेबिनार* Ø दुष्काळ परिस्थतीच्या प्रभावी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन

33
0

*‘भूजल पुनर्भरण-एक लोक चळवळ’ विषयावर ऑनलाईन वेबिनार*

Ø दुष्काळ परिस्थतीच्या प्रभावी उपाययोजनांबाबत मार्गदर्शन

चंद्रपूर, दि.1 जून : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, चंद्रपूर कार्यालयांतर्गत पुणे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक, मल्लीनाथ कळशेट्टी यांच्या सुचना व मार्गदर्शनानुसार “भूजल पुनर्भरण- एक लोक चळवळ” (विहीर / विंधण विहीर पुनर्भरण व छत पाऊस पाणी संकलन) या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. सदर वेबिनारला जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अभियंता, पंचायत समिती स्तरावरील हातपंप यांत्रिकी, राष्ट्रीय सेवा योजना, नेहरु युवा केंद्र, सामाजिक संस्था, जलदुत, तसेच जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक, आदर्श शेतकरी इ. मान्यवरांची उपस्थिती होती.

या ऑनलाइन वेबिनारमध्ये वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. विजयता सोलंकी, यांनी “भूजल पुनर्भरण- एक लोक चळवळ” या विषयावर मार्गदर्शन केले. वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी उपाय म्हणून साधारण व्यक्ती देखील आपल्या शेतात व घरावर राबवू शकेल व कमी खर्चात पूर्ण होऊ शकेल, अशा उपाययोजना म्हणजे विहीर/विंधन विहीर पुनर्भरण व छतावरील पाऊस पाणी संकलनाद्वारे भूजल पुनर्भरण करता येऊ शकते, असे त्या म्हणाल्या.

पावसाच्या पाण्याचे विहिरीद्वारे भूजल पुनर्भरण करण्यासाठी अथवा छताच्या पाण्याचे कूपनलिकेमध्ये भूजल पुनर्भरण करण्यासाठी प्रथम शेतातील पाणी अथवा छतावरील पाणी एकत्रित करणे गरजेचे आहे. ज्या पाण्याचे पुनर्भरण आपण करणार आहोत. त्या पाण्याची गुणवत्ता चांगली असणे आवश्यक आहे. पाणी योग्य गाळण यंत्रणेच्या मार्फतच पुनर्भरणाच्या ठिकाणी पोहोचले पाहिजे. तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाची व आवश्यक गोष्ट म्हणजे याकरीता योग्य ठिकाणी गाळ स्थिरीकरण टाकीची

मांडणी करणे गरजेचे आहे व या उपाययोजनांना लोकचळवळीचे रुप देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

विहीर व कूपनलिकांद्वारे भूजल पुनर्भरण करताना गाळण यंत्रणा कार्यक्षमपणे काम करणारी असावी.गाळण यंत्रणेतून पाण्यासोबत गाळ जाणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पाणी पाईपचा उपयोग करून एकत्रितरीत्या जमा करून शोषखड्डयात अथवा कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण करणे शक्य आहे. पहिल्या एक- दोन पावसाच्या पाण्याचा उपयोग पुनर्भरणासाठी करण्यात येऊ नये. भविष्यकाळात पावसाच्या पाण्याचे व छतावरील पाण्याचे पुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे आहे. दुष्काळाची भीषण परिस्थिती टाळण्यासाठी शास्रोक्त पद्धतीने पुनर्भरण करणे म्हणजेच भविष्यातील पाणीसाठे निर्माण करणे होय.

सदर कार्यक्रमाचे संचालन कुणाल इंगळे यांनी केले. वेबिनार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा,चंद्रपूर कार्यालयाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here