Home Breaking News उत्पन्न वाढीसाठी आणि समाजातील घटकांच्या विकासासाठीच मागील १५ वर्षांत कार्य अर्थसंकल्पीय चर्चेत...

उत्पन्न वाढीसाठी आणि समाजातील घटकांच्या विकासासाठीच मागील १५ वर्षांत कार्य अर्थसंकल्पीय चर्चेत सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची माहिती

49
0

Pratikar News

(Nilesh Nagrale)

नागपूर महानगरपालिका, नागपूर
ता. ३१ मे २०२१

नागपूर, ता.३१ : सन २००७ पासून नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. मागील १५ वर्षांत भाजपने आपल्या सत्ताकाळात समाजातील प्रत्येक घटकांच्या उन्नतीसाठी कार्य केले. शहराच्या विकासासाठी कार्य केले. इतकेच नव्हे तर हा विकास योग्य प्रकारे व्हावा, विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आर्थिक नियोजन केले. उत्पन्नवाढीसाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आणि त्यातून उत्पन्न सुरू केले. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी आणि शहराच्या विकासासाठी काहीच केले नाही, हा विरोधकांचा आरोप अत्यंत चुकीचा असल्याचे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी सांगितले.
नागपूर महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विरोधकांनी मांडलेल्या मुद्यांना उत्तर देताना ते बोलत होते. पुढे बोलताना श्री. ठाकरे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टी सन २००७ मध्ये सत्तेत आली. त्यावेळी आम्ही जी स्वप्न नागपूरकरांना दाखविली ती स्वप्न आज १५ वर्षांनंतर ९० टक्के पूर्ण करण्यात यशस्वी ठरलो आहोत. सन २००७ मध्ये मनपाचे बजेट ६१३ कोटींचे होते. ते आज १५ वर्षांनंतर २७९६ कोटींचे झाले आहे. सन २००७ मध्ये शहरात केवळ १९ पाण्याच्या टाक्या होत्या. आज ७५ टाक्या आहेत. ४३ पाण्याच्या टाक्या प्रस्तावित आहेत. २४ बाय ७ योजनेअंतर्गत ६८ कमांड एरियापैकी ५५ ते ६० कमांड एरियाचे कार्य पूर्णत्वाकडे नेण्यात आम्ही यशस्वी ठरलो. डी.पी. मध्ये असलेले अनेक रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत.
उत्पन्नवाढीवर बोलताना ते म्हणाले, नाग नदीच्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सिवेज ट्रीटमेंट प्लान्ट उभारण्यात आला. ते पाणी वीज केंद्राला विकून मनपाने त्यातून उत्पन्न सुरू केले आहे. सन २००७ मध्ये केवळ तीन लाख मालमत्ता यूनीट होते. आज ते साडे सात लाखांच्या घरात आहे. यातून सुमारे ३५० कोटींच्या घरात कर वसुली करण्यात येते. कविवर्य सुरेश भट सभागृह हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला. पूर्वी केवळ ३७ बगीचे शहरात होते. आता ही संख्या १३७ आहे. शहरातील अनेक क्रीडांगणे विकसित करण्यात आले. अनेक भागात ओपन जीम (ग्रीन जीम) लावण्त आल्या.
नागपूर शहरातील १६ झोपडपट्ट्या ज्या मनपाच्या जागेत आहेत तेथे ३२०० घरे आहेत. त्यापैकी १९०० घरांचे पट्टेवाटप करण्यात आले. १३०० घरांना पट्टेवाटप करण्यामध्ये असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यांनाही लवकरच पट्टेवाटप करण्यात येईल. उत्तर नागपुरात असलेल्या झोपडपट्ट्या नझुलच्या जागेवर आहेत. त्यामुळे मनपा त्यांना पट्टेवाटप करू शकत नाही.
‘प्रशासन आपल्या दारी’ अंतर्गत कामाचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी १० क्षेत्रीय कार्यालय सुरू करण्यात आले. अनेक कामे जनसहभागाने करण्यात येत आहे. सामाजिक संस्थांचा अनेक प्रकल्पांत सहभाग आहे. सामाजिक संस्थांचा सहभाग म्हणजेच जनसहभाग होय. नाग नदी स्वच्छता अभियान हे सुद्धा जनसहभागातूनच करण्यात येते. दिव्यांग लोकांना स्वयंरोजगारासाठी दोन लाख रुपये दिले. नागपूरचा विकास करता-करता राज्य आणि देशाच्या विकासालाही मनपाने हातभार लावला. नागपुरात मालमत्तांचे असेसमेंट सॅटेलाईट पद्धतीने करण्यात आले. राज्य शासनाने आता ही पद्धत अंगिकारली आहे. नागपूर महानगरपालिकेने ‘केबल डक्ट पॉलिसी’ तयार केली होती. ही पॉलिसी केंद्र शासनाने स्मार्ट सिटी प्रकल्पात अंगिकारली आहे. मनपाच्या मालकीच्या जागांवर २.५ चा एफएसआय देऊन गरीबांना घर द्यायचे असा ठराव पहिल्यांदाच नागपूर मनपाने केला. आता पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घर देण्यात येत आहे. अशा अनेक गोष्टी मागील १५ वर्षांत केल्या. सर्वसामान्य जनतेचं भलं व्हावं, यासाठी आम्ही काम करीत आहो, असे सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी म्हटले आहे.
नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकताना ते म्हणाले, स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने देशभक्तीची ज्वाजल्य भावना निर्माण होण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहे. ‘सुपर ७५’ हा मनपा शाळांत शिक्षण घेणाऱ्या होतकरु विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हाती घेण्यात आलेला प्रकल्प आहे. वर्षातील ३६५ दिवस आता विद्यार्थी विज्ञानाचे प्रयोग करू शकतील अशी डॉ. भटकर विज्ञान प्रयोगशाळा निर्माण करण्यात येत आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात ७५ हेल्थ पोस्ट तयार करण्यात येत आहे. कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाता यावे यासाठी मनपा स्वत: ४०० ऑक्सिजन सुविधा युक्त बेड्‌स उभे करीत आहे. या सर्व कार्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे योगदान मोठे आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना सन २०१८-१९ मध्ये १५४४ कोटी तर सन २०१९-२० मध्ये १६३२ कोटी जीएसटी अनुदान नागपूर मनपाला मिळाले होते. सरकार बदलताच चालू आर्थिक वर्षात केवळ १३५० कोटीचे अनुदान प्राप्त झाले. हजारो कोटी रुपये केंद्र शासनाच्या माध्यमातून शहर विकासासाठी मिळाले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हे करताना प्रशासनाचे सहकार्यही अपेक्षित आहे. आता कविवर्य सुरेश भट सभागृहाचा उपयोग विविध लघु उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात यावा तसेच कोव्हिडमुळे पालकत्व गमावलेल्या मुलांची माहिती नोडल एजन्सी म्हणून मनपाने काढावी आणि राज्य तसेच केंद्र शासनाने जाहीर केलेल्या योजनांचा लाभ त्यांना द्यावा, अशी विनंती सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी महापौरांकडे केली. कर्मचाऱ्यांना सहावा आणि सातवा वेतन आयोगाचा लाभ आपल्याच सत्ताकाळात मिळवून दिला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ अद्याप मिळाला नाही. त्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंतीही त्यांनी यावेळी महापौरांकडे केली. कोव्हिडकाळात मनपातील अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे. त्यांचे पालकत्व मनपाने घ्यावे, अशी विनंतीही सत्तापक्ष नेते ठाकरे यांनी आपल्या भाषणातून केली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here