शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर दिवे यांचे निधन
राजुरा,चंद्रपूर(संतोष कुंदोजवार-)-
शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते, विदर्भ बळीराज्यचे उपाध्यक्ष, विदर्भ राज्य कोअर कमिटीचे सदस्य प्रभाकर दिवे यांचे आज दुपारी नागपूर येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. ते 66 वर्षाचे होते.
पंधरा दिवसांपूर्वी प्रभाकर दिवे यांचा गडचांदूर येथे कारला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला होता. त्यांना नागपूर येथे दाखल करून शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रभाकर दिवे हे चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे पंधरा वर्षे मानद सचिव आणि पाच वर्षे चंद्रपूर जिल्हा परिषदचे स्विकृत सदस्य होते. माजी आमदार अँड. वामनराव चटप यांचे ते खंदे समर्थक होते. यापुर्वी त्यांनी शेतकरी संघटनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली होती. गेली चाळीस वर्ष शेतकरी संघटनेच्या प्रत्येक आंदोलनात भाग घेऊन त्यांनी नेतृत्व केले. अनेकदा त्यांना कारावास भोगावा लागला होता. निर्भीड आणि आक्रमक नेतृत्व अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटना परिवाराने शोक व्यक्त केला आहे.
*******
प्रभाकर दिवे यांच्या जाण्याने शेतकरी संघटना व विदर्भ राज्य चळवळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. चाळीस वर्षे शेतकर्यांच्या घामाच्या दामासाठी लढणारा सच्चा साथी गमावला आहे.,अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा शेतकरी संघटनेचे नेते अडव्होकेत वामनराव चटप यांनी दिली तर,
*****
प्रभाकर दिवे हे माझे जुने सहकारी होते. सहकार क्षेत्रातील जाणकार, शेतकरी संघटनेचा कडवा व आक्रमक कार्यकर्ता आणि आपला चांगला मित्र गमावला आहे.अशी प्रतिक्रिया माजी आमदार अडव्होकेत संजय धोटे यांनी दिली.
*******