चंद्रपूर – कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये साखरेची अनियंत्रित पातळी आणि स्टिरॉईडसह अन्य औषधांमुळे कमी झालेल्या रोगप्रतिकारकशक्तीमुळे म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दुसऱ्या लाटेत वाढले आहे. या आजारावरील औषधे महागडी असून, मागणी वाढल्याने औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
पहिल्या लाटेत करोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिसची बाधा झाल्याचे आढळले होते. यात काही रुग्णांना दृष्टीही गमवावी लागली. दुसऱ्या लाटेत या रुग्णांची संख्या अनेक पटींनी वाढली आहे.
चंद्रपुरात म्युकरमायकोसिस या आजाराचे 10 रुग्ण आढळले असून त्यावर सध्या उपचार सुरू आहे.
शहरातील एका सिटी स्कॅन सेंटरमध्ये स्कॅन करतांना या रूग्णांमध्ये हा आजार मिळून आला आहे. या सर्व दहाही रूग्णांवर औषधोपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती ठिक असल्याचे डॉ. राठोड यांनी सांगितले. मात्र येत्या काळात या रूग्णांची संख्या तथा मृत्यू वाढण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखविली. विशेष म्हणजे या रोगावरील प्रतिबंधात्मक इंजेक्शन्स महागडे आहे, शस्त्रक्रियेचा खर्च देखील सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरचा आहे. त्यामुळे या बुरशीजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्या, विशेषत: अॅम्फोटरसीन झ्रबी हे इंजेक्शन प्रतिबंधक इंजेक्शन कमी किंमतीत उपलब्ध करावे तसेच गोरगरीब रूग्णांच्या सोयीच्या द़ष्टीने या उपचाराचा समावेश महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेत करण्याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाला केली आहे.
म्युकरमायकोसिस म्हणजे काय?
‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार आहे. या बुरशीचा हवेतून संसर्ग होते. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असलेल्यांना यापासून धोका नाही; परंतु रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना तीव्र धोका असतो. नाकावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. तेथून ती सायनसमध्ये वाढते. कर्करोगाच्या पेशींपेक्षाही जलद गतीने वाढणारी ही बुरशी डोळ्यांतील पेशी, मेंदूतही प्रवेशही करते. त्यामुळे इतर बुरशीजन्य आजारांपेक्षाही हा संसर्ग अधिक धोकादायक असून याची बाधा झालेल्यांमध्ये जवळपास ३० टक्के मृत्युदर आहे.
लक्षणे
नाकातून काळसर द्रव बाहेर पडणे, नाक सतत वाहत राहणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, अकारण दात हलणे, दात दुखणे