राजुरा…
उपोषण स्थळी कुणीही न येता प्रशासनास सहकार्य करण्याचे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे आवाहन
राजुरा-
राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात कोरोणाचे संकट गंभीर झाले आहे. राजुरा सारख्या तालुक्यात व विधानसभा क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. वेळीच उपचार मिळत नसल्यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत हे अतिशय वेदनादायी आहे.
निष्पाप नागरिकांचे उपचाराअभावी जीव जात आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजे .यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाला जागे करण्यासाठी, गंभीर रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी तात्काळ ऑक्सिजन युक्त बेड, पुरेसे व्हेंटिलेटर प्रशासनाने
उपलब्ध करून द्यावे यासाठी राजुरा चे माजी आमदार सुदर्शन निमकर उद्या दिनांक पाच मे रोजी उपजिल्हा रुग्णालय समोर बेमुदत उपोषणास बसणार आहे.
या मागे माझा कुठलाही राजकीय स्वार्थ नाही किंवा प्रसिद्धीसाठी हे आंदोलन करीत नसल्याचे सांगितले असून राज्यात कोविड संकटावर मात करण्यासाठी संचार बंदी सुरू आहे. अशा स्थितीमध्ये संकटकाळात निष्पाप रुग्णांचे जीव वाचावे यासाठी प्रशासनाला जागे करण्याचा माझा प्रयत्न आहे. तालुक्यात ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या ही अत्यंत हृदय हेलावणारी आहे. अधिकारी या बाबत अधिकृत माहिती द्यायला तयार नाहीत अशा स्थितीमध्ये सामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागावा. ऑक्सिजन लेवल 50 च्या खाली आलेले रुग्ण राजुरा येथील कोवीड सेंटरमध्ये दाखल आहेत, ज्याअर्थी त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता आहे . ऑक्सिजन लेवल असल्यामुळे अनेक गंभीर रुग्ण मृत्यूच्या दाढेत संघर्ष करीत आहेत . त्यांचे नातेवाईक जीव वाचवण्यासाठी आटापिटा करीत आहेत. चंद्रपूर येथे ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. जीव वाचवण्यासाठी बाहेरच्या राज्यात उपचारासाठी जावे लागत आहे. आरोग्य व्यवस्था संपूर्ण कोलमडलेली आहे. शहरातील खाजगी दवाखाने फुल भरलेले आहेत. कोवीड सेंटरवर रुग्णांना उपचार करण्यासाठी जागा नाही. मग खेड्यापाड्यातील गोरगरीब रुग्णांनी जावे कुठे? उपचार घ्यायचा कुठे आहे ?असा प्रश्न निर्माण झाला आहे? ही परिस्थिती निर्माण होण्याला कारणीभूत प्रशासन जबाबदार आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने नियोजन केले नाही, त्यामुळे ही परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. संकटकाळात रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने काम करीत आहेत. अशा स्थितीमध्ये नागरिकांचे जीवन वाचविणे महत्त्वाचे आहे. गंभीर रुग्णांना जीवनदान देण्यासाठी व्हेंटिलेटर व इतर आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध शासनाने करून द्यावे याकरिता मी स्वतः उपजिल्हा रुग्णालय समोर उद्या सकाळी बेमुदत आंदोलन करणार आहे. कुठल्याही कारवाईची मला पर्वा नाही. नागरिकांच्या जीवासाठी मी सर्व सहन करायला तयार आहे. अशा स्थितीत सर्व हितचिंतकांना नम्र विनंती आहे की, कुणीही या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उपोषणस्थळी येऊ नये. मात्र आपल्या नजरेत आलेल्या अडचणी आणि समस्या शासनाच्या व प्रशासनाच्या नजरेत आणून त्यांना जागे करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन सुदर्शन निमकर यांनी केले आहे.
प्रतिकार. न्यूज