Home Breaking News नागपुरातील गरीबांना आता घरपोच औषधी

नागपुरातील गरीबांना आता घरपोच औषधी

69
0

Pratikar News

नागपूर : शहरातील गरीब व गरजू कोव्हिड रुग्णांना नागपूर सिटिझन्स फोरमने मदतीचा हात दिला आहे. ‘दवा दान’ या उपक्रमाअंतर्गत फोरमने मेडिसिन बॅंक सुरू केली आहे. कोव्हिड रुग्णांवर उपचार करताना दिली जाणारी औषधे महागडी आहेत. १४ दिवसांचे औषध विकत घेण्यासाठी तब्बल दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. आर्थिक अडचण व बेताच्या परिस्थितीमुळे अनेक जण महागडी औषधे घेण्याचे टाळतात. फोरमच्या सदस्यांनी याविषयी शहराच्या विविध वस्त्यांमध्ये सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात पॉझिटिव्ह व्यक्तींचे नातेवाईक, मेडिकल स्टोर्स चालक व काही डॉक्टरांशी संवाद साण्यात आला. फॅबीपिरावीर नावाचे औषध न घेतल्यामुळे अनेक रुग्णांची प्रकृती खालावत असल्याचे सर्वेक्षणात प्रामुख्याने आढळून आले.
याच पार्श्वभूमीवर नागपूर सिटिझन्स फोरमने ‘दवा दान’ हा उपक्रम सुरू केला आहे. फोरमने शहरातील दानदात्यांना मदतीचे आवाहन करीत मेडिसिन बॅंक उभारली आहे. या मेडिसिन बॅंकेतून शहरातील गरीब व गरजू रुग्णांना मोफत औषधे पुरवली जात आहेत. पाच लाभार्थी कुटुंबियांना औषध किट देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रतिक बैरागी, अभिजित सिंह चंदेल, अभिजित झा, गजेंद्रसिंग लोहिया, अमित बांदुरकर व वैभव शिंदे पाटील उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांच्या औषधीचे वितरण केले जाणार आहे. यासाठी औषध किट तयार करण्यात आली आहे. या किटमध्ये फेविपिरावीर, पॅरासिटामॉल, आयवरमॅक्टिन, लिमची, एझिथ्रोमायसिन, डॉक्सी, झिंक, डी 3 रिस्क, एलेक्स कफ सिरप या औषधांचा १४ दिवसांचा डोस व मास्क आणि सॅनिटायजर देण्यात येत आहे.
नागपूर महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांकडे दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिका रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात अपयशी ठरल्याची खंत नागपूर सिटिझन्स फोरमचे सदस्य व दवा दान अभियानाचे प्रमुख प्रतिक बैरागी यांनी केला आहे. औषधे महाग असल्याने अनेक रुग्ण ते विकत घेण्याचे टाळतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे ते पुढे येत आहे. फेरीपिरावीर सारखे महागडे औषध घेणे प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. मात्र हे औषध घेतले नाही तर रुग्णांना अधिक त्रास होतो व प्रकृती खालावत जाते. त्यामुळेच नागपूर सिटिझन्स फोरमने या विषयाला हात घातला व प्रशासनावर अवलंबून न रहाता काम सुरू केले आहे.
नागपूर सिटिझन्स फोरमने सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपूर सिटिझन्स फोरमने शहरातील दानदात्यांना मदतीची साद घातली होती. शहरातील अनेक दानशुरांनी याला सकारात्मक प्रतिसाद देत मदत केली. काहींनी औषध स्वरुपात तर काहींनी आर्थिक स्वरुपात या उपक्रमाला हातभार लावल्याचे या अभियानाचे प्रमुख अभिजित सिंह चंदेल यांनी सांगितले. शहरातील गरीब व गरजू रुग्णांनी या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी या अभियानाचे प्रमुख प्रतिक बैरागी 7720076560, अभिजित सिंह चंदेल 9730015177 यांच्याशी संपर्क साधता येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या टेस्टिंग सेंटरवरील कोव्हिड पॉझिटिव्ह अहवाल, आधार कार्ड व डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन या आधारावर लाभार्थी निवडून त्यांच्या नातेवाईकांना या किट देण्यात येणार आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here