Pratikar News
(Nilesh Nagrale)
नागपूर: :उपराजधानीत रेमडेसिव्हिरचा काळाबाजार सुरूच असून, पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांच्या विशेष पथकाने रामदासपेठ परिसरात सापळा रचून न्यूरॉन हॉस्पिटलच्या वॉर्ड बॉयसह तिघांना अटक केली. शुभम संजय पानतावने (वय २४, रा. मूळ रा. सेवाग्राम), प्रणय दिनकरराव येरपुडे ( वय २१, रा. महाल) व मनमोहन नरेश मदन (वय २१, दोन्ही रा.महाल), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम हा धंतोलीतील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉय आहे. प्रणय व मनमोहन हे बीबीएचे शिक्षण घेत आहेत. एका तरुणीला रेमडेसिव्हिरची गरज होती. तिने प्रणय याच्याशी संपर्क साधला. प्रणय याने एका औषध विक्रेत्याकडे विचारणा केली. त्याने प्रणय याला शुभम याचा मोबाइल क्रमांक दिला. प्रणयने शुभम याच्याशी संपर्क साधला. ३० हजार रुपयांमध्ये रेमडेसिव्हिर देतो, असे शुभम हा प्रणय याला म्हणाला. शुभम याने प्रणयला जनता चौकात बोलाविले.
दरम्यान या व्यवहाराची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे यांना मिळाली. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कुरेवाड , हेडकॉन्स्टेबल अजय यादव, चंद्रशेखर फिस्के, शिपाई सचिन चौधरी यांनी जनता चौकात सापळा रचला. प्रणय व त्याचा मित्र मनमोहन जनता चौकात आले. प्रणय याने शुभम याच्याकडून इंजेक्शन घेताच पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून दोन रेमडेसिव्हिर, दोन मोबाइलसह ८७ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले. तिघांविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सीताबर्डी पोलिसांनी तिघांनाही बुधवारी अवकाशकालीन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तिघांची एक दिवसासाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.