Home Breaking News खासगी रुग्णालयांत होत आहे भेदभाव ? श्रीमंतांना खाटा, गरिबांना ‘टाटा’!

खासगी रुग्णालयांत होत आहे भेदभाव ? श्रीमंतांना खाटा, गरिबांना ‘टाटा’!

21
0

Pratikar News

नागपूर : शहरातील मोठय़ा खासगी रुग्णालयात श्रीमंत, उद्योजक, राजकीय पक्षाचे नेते व त्यांच्या नातेवाईकांना तात्काळ खाटा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र त्याचवेळी सर्वसामान्य, गरीब कुटुंबातील गरजूंनी विचारणा केल्यास त्यांना खाटा उपलब्ध नाही, असे सांगून त्यांना मेयो-मेडिकल रुग्णालयात पाठवले जाते. महापालिकेने अशा खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनता करीत आहे.

शहरात गेल्या काही दिवसात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वच रुग्णालयात खाटांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मेडिकल व मेयो ही गोरगरिबांची रुग्णालये आहेत. मात्र येथेही तिच स्थिती आहे. त्यामुळे अनेक गरजू रुग्ण खासगी दवाखान्याचे दरवाजे ठोठावतात. मात्र तेथे खाटा असूनही त्यांना नाही असे सांगितले जाते. महापालिके च्या नियंत्रण कक्षात खाटा रिकाम्या असलेल्या रुग्णालयांची माहिती दिली जाते. मात्र प्रत्यक्षात हे रुग्णालय रुग्णांची आर्थिक स्थिती पाहून त्यांना दाखल करून घेतात. दुसरीकडे श्रीमंत, उद्योगपती, बडे नेते, त्यांच्या नातेवाईकांना मात्र खासगी दवाखान्यात सहज खाटा उपलब्ध करून दिल्या जातात. काही खाजगी रुग्णालयात तर राजकीय पक्षाशी संबंधित, उद्योजक किंवा व्यापारी असलेल्या करोना बाधित रुग्णांना दाखल होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त झाले असताना व त्यांची प्रकृती उत्तम असताना रुग्णालय प्रशासनाकडून सुटी दिली जात नाही. एकप्रकारे हा खाटा अडवून ठेवण्याचाच प्रकार आहे. त्यामुळे गरजूंना उपचार मिळत नाही. नागपुरातील सेव्हन स्टार, वोक्हार्ट, विवेका, ऑरेंज सिटी हॉस्पिटल, मेडिट्रीना, सेंटर पॉईंट, गेटवेल, शुअरटेक, अर्नेजा, एलेक्सिस, किंगज्वे, होप, कोलंबिया, अवंती हार्ट, न्यूरॉन, सेंट्रल हॉस्पिटल सिम्स, कल्पवृक्ष आदी खाजगी रुग्णालयांतील उपचाराचे दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत. प्रारंभी ५० हजार ते एक लाख रुपये द्यावे लागते.

सरकारी रुग्णालयात जागा नाही, खासगी रुग्णालयातील उपचार झेपत नाही, त्यामुळे अनेक जण घरीच उपचार करतात, यादरम्यान अनेकांची प्रकृती ढासळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचेही उघडकीस आले आहे. महापालिका प्रशासनाकडून अशा खाजगी रुग्णालयावर कुठलाही वचक नाही.

प्रशासनाचा वचक नाही

महापालिकेने ८०-२० च्या फाम्र्युल्यानुसार शहरातील १२७ खासगी रुग्णालयांना करोना केअर केंद्र म्हणून मान्यता देत खाटा वाढवण्याची मंजुरी दिली. तेथे गरीब रुग्णांना उपचार मिळावे हा यामागचा हेतू होता. मात्र खासगी इस्पितळ सर्वच्या सर्व खाटा व्यावसायिक दरानुसार उपचारासाठी वापरतात. काही मोठय़ा रुग्णालयाने हॉटेलमध्ये रुग्णालय सुरू केले. तेथील दरही सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. शहरात खाजगी रुग्णालयाची संख्या वाढवली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला. तरी या रुग्णालयांवर प्रशासनाचा वचक नसल्यामुळे सामान्य रुग्णांची फरफट होत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here