Home विशेष क्रांतिकारी विचारांची भिमजयंती साजरी करा!

क्रांतिकारी विचारांची भिमजयंती साजरी करा!

82
0

संपादकीय……✍️✍️✍️✍️✍️

कोरोना मुळे राज्याराज्यात धोका वाढत चालला आहे. काही लोक बिनफिकीर बेजबाबदार पणे वागत आहेत. त्यांचा फटका जबाबदार लोकांना पडत आहे. लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे शासन प्रशासनाची जबाबदारी असते. केंद्रातील व राज्यातील सत्ताधारी हे मनुवादी हिंदुत्व मानणारे पक्ष आहेत. लोकांनी तडफु तडफु मारावे हीच त्यांची मनापासून इच्छा आहे. पण भारतीय संविधानातील काही महत्वपूर्ण कलमांनी त्यांच्या गळ्यात फाशीचा दोर अडकून पडला आहे. म्हणूनच ते जागतिक पातळीवरील दडपणामुळे आरोग्यासाठी काही तरी उपाययोजना करीत आहेत.कोरोना महामारीच्या संकट लक्षात घेऊन, लॉक डाऊनच्या नियमाचे योग्य प्रमाणात पालन करून भिमजयंती साजरी करा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची ताकद त्यांना माहीत आहे, पण आपल्याला माहिती नाही, भव्यदिव्य मिरवणूक, डोल ताशाच्या तालावर नाचून आंबेडकरी क्रांतिकारी विचारांचा विजय होणार नाही.

लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा बदल घडेल असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतं होते, म्हणूनच क्रांतिकारी विचारांची भिमजयंती साजरी करा!.
बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार काय ते अजूनही आपण समजून घेतले नाही. किंवा त्यांच्या विचाराची माहिती असूनही त्यांची अंमल बजावणी केली नाही. म्हणजेच भिमजयंती साजरी करण्याचे प्रचंड ढोंग आहे. असे इतर समाजाचे लोक आपसात म्हणतात, भिम जयंतीला यांच्या मंडळांच्या कार्यकर्त्याला मोठी रक्कम दिली की ते कायमच आपल्याला सलाम ठोकतील. कारण वर्षभर आपण कसे वागतो ते इतरांना स्पष्टपणे दिसून येते.नगर,वॉर्ड विभाग, मतदारसंघात आपली मतदार संख्या मतदार यादी नुसार जाहीर केलेली असते.त्यानुसार आपली सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या एकजूट कुठेच दिसत नाही. त्यामुळे कोणीच पाहिजे त्याप्रमाणात दखल घेत नाही. त्यासाठी ते आपल्या समाजात अनेक चमचे निर्माण करून ठेवतात.प्लास्टिकचा चमचा बाहेर खाण्यासाठी वापरतात.स्टीलचा वेगवेगळ्या साईजचा हॉटेलमध्ये वापरतात,चांदी,सोन्याचा चमचा फक्त दाखविण्यासाठी असतो.कोणताही चमचा स्वतः कोणते काम करीत नाही, त्यांच्याकडून काम करून घेतली जाते.

निवडणूकीत जिंकायचे असेल तर भिम जयंतीला मोठ्या प्रमाणात मदत करा.चमचाला होडिंग बॅनर बनवून द्या घराघरात त्या चमच्याचे नांव होते.गोरगरीब असंघटित कष्टकरी मजुरांना त्यांच्या मार्फत महापरिनिर्वाण दिनी भोजन दान द्या,महाड चवदार तळे, भीमा कोरेगाव येथे जाण्यासाठी बसची व्यवस्था करून दिली की सर्व भिम सैनिक घोषणाबाजी करणारे,होडिंग वर चमकणारे आणि कॅडर बेस सुद्धा आपल्याच पक्षाच्या उमेदवाराची लायकी दाखवून सर्व मतदान फिरवतील. यामुळे दरवर्षी भिमजयंती दणक्यात भव्यदिव्य साजरी करण्यात येते.पण आंबेडकरी क्रांतिकारी विचारांचा विजय होत नाही. मतदारसंघात असलेली लक्षवेधी संख्या भिमजयंती मध्ये एकजुटीने दिसते,मात्र मतदान केंद्रावर आंबेडकरी विचारांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या मतदान पेटीत का दिसत नाही यांचे उत्तर भव्यदिव्य भिमजयंती साजरी करणाऱ्यांनी दिले पाहिजे. यावर्षी कितवी भिमजयंती साजरी करता?.एकशे तीसवी?. व्यक्तिगत बदल लक्षवेधी झाला,सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय बद्दल किती झाला. दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मार्च वर्षभरातील ऑडिट सादर करावा लागतो.हा नियम आपल्याला लागू आहे काय??.

परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमा नुसार बदलत राहतो. त्यानुसार मानव प्राणी सुद्धा बदलत राहतात.वेळ,काळ आणि संकट कधीच सांगुन येत नाही.म्हणुन वेळचे आणि काळाचे नियोजन करून संकट टाळता येतात.उन्हाळ्यात आणि पाऊसाळ्यात कोणत्याही मोठ्या उत्सवाचे नियोजन कोणी करीत नाही.म्हणुन आता ग्रामीण भागातही मोठमोठे हॉल, सभागृह बांधण्यात आले आहेत.१९५६ पूर्वी सर्व समाजा करीता हे हॉल सभागृह उपलब्ध नव्हते.आता आहेत ते सभागृह आमची आमच्या समाजाची हक्कांची किती आहेत.दरवर्षी लाखों रुपये डी जे,मंडप डेकोरेशन वर ब्रेकडान्स वर खर्च करणारे स्वतःचे भव्यदिव्य सभागृह असावे,त्यात व्यायाम शाळा, वाचनालय असावे यासाठी काय तरतूद करतात. दरवर्षी आपल्या समाजाच्या मुलामुलींचे लग्न कोणाच्या सभागृहात होतात त्यांचा एकूण वर्षे भरातील कार्यक्रमात होणार खर्च यांचा कधी हिशेब केला काय?. स्वयंप्रकाशित स्वयंप्रेरणेने पण आता समाजाने बदलेलच पाहिजे.

आम्ही खेडे सोडुन शहरात आलो,शेणाने सारवणाऱ्या गवताच्या झोपडीतुन सिमेंट काँक्रेटच्या चकचकीत लादी स्टाईलच्या घरात आज राहतो. हा बदल एकदिवसात नाही घडला.खूप कष्टाची कामे करून आणि झोपडी वाचविण्या साठी संघर्ष करून आता स्वतःच्या घरात राहत आहोत.तेव्हा झोपडी आणि झोपडपट्टी वाचविण्या साठी आम्ही निळा व पंचशील झेंडा लावला होता.सोबत बुद्ध विहार आणि जयभिम चबुतरा पण बांधला होता.आता आम्ही बदललो तेव्हा विहार व चबुतरा पण बदलला पाहिजे होता.झोपडपट्टी वाचविण्या साठी बुद्ध विहार होती.म्हणुन आम्ही नियमित एकत्र येत होतो.बसत होतो,चर्चा करून कार्यक्रम घेत होतो.आता त्यांची गरज वाटत नाही. कारण झोपडीसह पिण्याच्या पाण्याचे मीटर, लाईट मीटर नांवावर झाली आहेत.आता तुटण्याची भिती नाही.म्हणुन एकत्र बसण्याची गरज राहली नाही.

आताच्या घडीला प्रत्येक नगरात बुद्ध विहार आहेत. पण ती स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या राजकीय स्पर्धेमुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली बंद आहेत. कारण बाबासाहेब सर्वांचा एकच असला तरी प्रत्येकाचा आर्थिक पोशिंदा वेगळा वेगळा आहे.म्हणुन एकत्र बसल्यास एकच बुद्ध एकच बाबासाहेब स्विकारावा लागेल.बावीस प्रतिज्ञा नाही पाळता आल्या तर कमीत कमी पंचशील तर पाळावेच लागेल. ते शक्य होत नसल्यामुळे कार्यकर्ते नेते बुद्धविहारा ऐवजी नाक्यावरील बियरबार मध्ये बसण्यास तयार आहेत.आणि विशेष म्हणजे पिणारे खाणारे एकत्र बसू शकतात. सुशिक्षित आणि सुरक्षित नोकरी करणारे यांची इथे गरज नाही.ते असंघटीत समाजाला चालत नाही.कारण ते पित नाही.किंवा तोडपाणी करून खाऊ पिऊ घालत नाही. त्यांनी शहाणपण शिकवू नये त्यांनी वर्गणी देऊन शांत बसावे.समाजात ढवळाढवळ करू नये.

जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र येतो.हीच एकजूट निवडणूका मध्ये का दाखवीत नाही?.भरपूर नाही तरी यथा शक्ती खुप पैसा गोळा करतो,पण तो लायटिंग,डेकोरेशन, ब्रेक डांस, कव्वाली वर खर्च करतो.आम्ही किती मोठी जयंती साजरी केली यांचा तोरा मिळवितो.पण नगरातील बुद्ध विहार बांधकाम दुरुस्ती साठी नगरसेवक,आमदार किंवा राजकीय चमचाला पकडावे लागते.

विभागात बुद्ध विहार खूप आहेत,पण मालकी हक्क आणि देखभालीसाठी न मिटणारी भांडण आहेत. त्यातुन चैत्यभूमी, दीक्षाभूमी, पीपल्स सोसायटी, आंबेडकर भवन सारखी ऐतिहासिक वास्तू संस्था सुटले नाही.मग विभागात नगरात नवीन बुद्ध विहार किंवा मंदिर बांधण्या पेक्षा विभागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी,गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारी संस्था निर्माण करून तिच्यात दरवर्षी गुंतवणूक वाढवा तीच खरी आंबेडकरी क्रांतिकारी विचारांची चळवळ असेल. जयंतीनिमित्त जशी एकजूट दाखविल्या जाते तशीच एकजूट निवडणूका मध्ये दाखविली तर नगरसेवक,आमदार व खासदार आपला होऊ शकतो.

महाराष्ट्रात सर्व नेते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचा स्वतःचा मतदार संघ आहे काय?. एकही नेत्यांचा मतदारसंघा नाही.म्हणूनच राज्यातील किती मतदारसंघात आपण आमदार निवडून आणू शकतो?. यांचा गांभीर्याने विचार कोणी करीत नाही.वार्डात निवडून न येणारा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्याची स्वप्ने पाहतो केवळ पैसे कमविणे हाच मेन उद्देश असेल तर समाजाने त्याला आपली जागा दाखविली पाहिजे की नाही?.असे लोक पक्ष संघटनेत काम करण्यापेक्षा स्वसंघटना कडून राजकीय दलाली करतात त्यांना चोप दिल्या शिवाय आपण शत्रूला नामोहरम करू शकत नाही. राष्ट्रीय पातळीवर एकमेव पक्ष कोण असेल तर तो बहुजन समाज पक्ष त्यांच्या नेतृत्वाचे काही ध्येय धोरण चुकले होते ते दुरुस्त करून त्यात सुधारणा करून राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना उभी राहू शकते आणि दोन राष्ट्रीय पक्षांना आव्हान देऊ शकते.करीता बहुजन समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की बहुजन समाजातील लोकांचे काय?. कार्यकर्ते,नेते बुद्ध फुले शाहु आणि आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वैचारिक वारसा सांगतात आणि शत्रु पेक्षा मित्रा सोबत लढतात आणि व्यक्तीगत व वैचारिक संबंध कायमस्वरूपी तुटतील असे वागतात,आणि राजकीय दुष्टचक्रात फसतात.

आताच्या घडीला मनुवादी मानसिकता असलेला पक्ष सर्व आघाडी वर मात करीत आहे.केवळ जन आंदोलन करून त्यांना रोखणे अशक्य आहे.म्हणूनच प्रत्येक मतदारसंघात समान विचारांच्या मित्र संस्था,संघटना आणि पक्षांना एकत्र येऊन एकास एक पर्याय दिल्यास शत्रूला आपण शह देऊ शकतो. करीता विचारांची जयंती साजरी करण्यात यावी. नाच गाणे ब्रेकड्रॉन्स बंद करण्यात यावे.पूर्णपणे बंद करा असे म्हणणार नाही.कारण ज्या परिस्थितीत असंघटीत कामगार, मजुरी करून जगतो त्यांच्या कडे पाहिल्यास लोकांना त्यांची एवढी संघ शक्ती जयंती साजरी करण्यासाठी कुठून येते हा मोठा प्रश्न पडतो.नेहमी तिरस्कार करणारे लोक आंबेडकरी चळवळीतील भिम जयंती साजरी करण्याचा जोश पाहून त्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता निर्माण होत असते.आंबेडकरी समाज जोश मध्ये होश गमावून बसतो हे आता पर्यंतच्या निवडणूकात आपण पाहिले आहे.येत्या काळात स्वाभिमानाने जगायचे असेल तर भिमजयंती साजरी करण्याची पद्धत बदली करावी लागेल.आणि विचारांची देवाणघेवाण करून राजकीय परिवर्तन घडवा नाही तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही.

आंबेडकरी चळवळीतील नेत्याकडे कोणताही ठोस कृती कार्यक्रम,योजना नाही.व्यक्ती पूजा, मूर्ती पूजा करून आपण जयंती साजरी करत असाल तर क्रांतिकारी विचारांचे काय?.तो जर पराजित होत असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग आहे की नाही?. लाचारांच्या फौजा निर्माण करण्यापेक्षा विचारांचं वादळ निर्माण करा बदल घडेल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते आम्ही ते कधीच मनावर घेतले नाही.यांचे प्रत्येक भिम सैनिकांनी आत्मचिंतन करावे हेच १३० व्या भिम जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतांना जाहीर आवाहन.

✒️:-  निलेश   नगराळे ८९७५४०४५४०

प्रतिकार न्युज नेटवर्क 

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here