Home Breaking News पुरोगामी महाराष्ट्र आणि अंधश्रद्धा ! पैशाचा पाऊस; अंधश्रद्धेतील विकृतीचा नवीन प्रकार*

पुरोगामी महाराष्ट्र आणि अंधश्रद्धा ! पैशाचा पाऊस; अंधश्रद्धेतील विकृतीचा नवीन प्रकार*

74
0

*पैशाचा पाऊस; अंधश्रद्धेतील विकृतीचा नवीन प्रकार*

प्रयोगात मुलीचा जीव धोक्यात घालणाऱ्या आईसह सात जणांवर गुन्हे दाखल

वर्धा : पैशाचा पाऊस पाडण्याच्या प्रयोगात मुलीचा जीव धोक्यात घालणाऱ्या आईसह सात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अंधश्रद्धेतील विकृतीचा नवाच प्रकार पुढे आला आहे.

अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य संघटक पंकज वंजारे यांनी या प्रकरणात पोलिसांना सहकार्य केल्यानंतर आश्चर्यकारक घटना पुढे आली. विज्ञान शाखेत पदवीला शिकणाऱ्या व स्थानिक कारला चौकात राहणाऱ्या एका वीस वर्षीय युवतीवर ही आपत्ती ओढवली. ती हरवल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी स्थानिक रामनगर पोलिसांकडे केली होती. तपास सुरू झाल्यानंतर यात मांत्रिकाची बाब पुढे आली. मुलीच्या आईच्या संपर्कात आलेल्या एका युवतीने पैशाचा पाऊस पडण्याचा प्रयोग सांगितला. मुलीवर चंद्रपूरचा मांत्रिक मंत्रशक्तीने प्रयोग करेल. त्यामुळे पैशाचा पाऊस पडेल. गुप्तधनाचा शोध लागेल. लग्नासाठी पैसा लागेल, कर्ज फेडल्या जाईल, असे सांगत मुलीच्या आईने मुलीला प्रयोगासाठी तयार केले. हिंगणघाट तालुक्यातील नांदगावच्या प्रवीण मागरूटकर हा मध्यस्थी होता. निर्वस्त्र अवस्थेत अघोरी पूजा करावी लागणार असल्याचे प्रवीणने पटवून दिले. मुलीने विरोध केल्यावर आईसह काका व काकूने जबरदस्तीने प्रवीणच्या शेतात नेले. तेथे मुलीवर अघोरी प्रयोग झाले.

मुलीने सुटण्याचा प्रयत्न केल्यावर आईनेच मुलीला जबरीने पकडून ठेवले. दुसऱ्या दिवशी काकाच्या घरी परत याच प्रयोगाची पुनरावृत्ती झाली. प्रवीण म्हणेल तसे न केल्यास मारून टाकण्याची धमकी आईने दिल्याची बाब पीडित मुलीने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद आहे. पंधरा-वीस दिवसानंतर पुन्हा तीन टप्प्यात तपासणी करायची असल्याचे सांगण्यात आले. यावेळी मांत्रिक एक आत्मा आपल्यासोबत आणणार असून आत्म्याच्या मदतीने पैशाचा पाऊस पडणार असल्याची बतावणी झाली. प्रवीणने यावेळी एक अश्लील चित्रफि त पीडितेला दाखवून असाच पैशाचा पाऊस पडणार असल्याचे मुलीला सांगितले. या प्रकारानंतर आई व मुलीसह चौघेजण काटोलला गेले. तेथून दोनतीन गावी आरोपींनी मुलीला फि रवले. शेवटी कशीबशी सुटका करून घेत मुलीने आपल्या आतेभावाच्या मदतीने वध्रेत रामनगर पोलीस ठाण्याला भेट देऊन आपबिती सांगितली.

मुलीने दिलेल्या तक्रारीत सात व्यक्तींची नावे आहेत. यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून आई व अन्य दोन महिलांची चौकशी केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांनी सांगितले. १ नोव्हेंबर २०१९ ते ६ एप्रिल २०२१ दरम्यान झालेली घडामोड मुलीने पोलिसांकडे कथन केली. मुख्य आरोपी प्रवीण मांगरूटकर याची अधिक चौकशी झाल्यानंतर अनेक रहस्यमय बाबी पुढे येण्याची शक्यता पंकज वंजारे यांनी व्यक्त केली. सदर मुलीला सध्या ‘सखी वन स्टॉप’ या शासकीय आधारगृहात ठेवण्यात आले आहे. यातील आरोपीचे संबंध राज्यातील विविध जिल्हय़ातील मांत्रिकांशी असल्याची दाट शक्यता आहे. सदर मुलीला न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका पंकज वंजारे यांनी मांडली.

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here