Pratikar News
चंद्रपूर, दि. 25 मार्च : जिल्ह्यात कोरोनाबाधीतांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. या वाढीव बांधीतांच्या प्रमाणात पुढील दिवसात लागणाऱ्या कोविड केअर सेंटर (सीसीसी) साठी वसतीगृह, शाळा किंवा इतर जागा उपलब्ध करून घेण्याच्या दृष्टीने तसेच इतर आवश्यक उपाययोजनांचे आतापासून नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कोरोना टास्क समितीच्या आढावा बैठकीत आज दिल्या.
बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहण घुगे, महानगरपालीका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र सुरपाम, पोलीस उपअधिक्षक शेखर देशमुख, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर, जिल्हा लसीकरण अधिकारी संदिप गेडाम प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण केंद्रे सुरू करण्याचे तसेच कोरोना तपासणीसाठी जिल्ह्यात अतिरिक्त प्रयोगशाळा उभारण्याबाबत व ऑक्सीजन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या. कोरोना हॉटस्पॉट जाहिर करणे, 350 खाटांचे महिला रुग्णालय पुर्ण क्षमतेने सुरू करणे, औषधसाठा व मनुष्यबळ उपलब्धतेबाबतही त्यांनी आढावा घेतला.
यावेळी निवसी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत कन्नाके, महानगरपालीकेचे वैद्यकीय अधिकारी अविष्कार खंडारे, डॉ. सुधीर मेश्राम, डॉ. प्रतिक बोरकर व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.