प्रतिकार
राजुरा, तालुका प्रतिनिधी-
शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून नवी दिल्ली सीमेवर लढा देत असलेल्या शेतकर्यांना पाठींबा देण्यासाठी आणि आजच्या देशव्यापी ‘ रास्ता रोको ‘ आंदोलनाला समर्थन देण्यासाठी कोल इंडियाच्या मान्यता प्राप्त संघटनांनी आज दिनांक 6 फेब्रुवारीला देशातील सर्व कोळसा खाणीत जोरदार निदर्शने आणि द्वारसभा घेऊन सरकारच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा जोरदार विरोध नोंदविला. या भागातील कोळसा खाणीत आज सरकारचा निषेध करीत शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या कामगार संघटनांनी हे आंदोलन केले.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, गोवरी, पोवनी, धोपटाळा, साखरी, गोवरी डीप या ओपनकास्ट आणि बल्लारपूर व सास्ती या भूमिगत अशा आठही खाणीत सकाळी आठ वाजता कामगारांच्या द्वारसभा झाल्या. यावेळी सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे तातडीने रद्द करावे आणि कामगारांच्या हिताचे असलेले 44 कायदे रद्द करून त्यांचे फक्त चार कोड निर्माण करून संपवण्यात आलेल्या कामगार कायद्यातील परिवर्तन रद्द करून पूर्वी प्रमाणेच 44 कायदे लागु करावे, अशी एकमुखी मागणी इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या चारही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी केली. शेतकरी व कामगारविरोधी कायदे लादून केंद्र सरकार उद्योगपतींच्या सोईचे कायदे करून उद्योगांचे खाजगीकरण आणि शेतीही उद्योगपतींच्या हवाली करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे राष्ट्रविरोधी असून अनेक कामगार नेत्यांनी आपल्या भाषणातून या धोरणांचा निषेध करीत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. यावेळी इंटक नेते आर.आर.यादव,अशोक चिवंडे, आर.एम.झुपाका, दिलीप कनकूलवार,विजय कानकाटे, रवी डाहुले,प्रभाकर सुचूवार, गणेश नाथे,राजेश्वर डेबिटवार यांची भाषणे झाली.
या सभेचे संचालन दिनेश जावरे यांनी केले. यावेळी संघटनांचे पदाधिकारी मधुकर ठाकरे,पुरुषोत्तम मोहुर्ले,नागेश मेदर,लोमेश लाडे,श्रीपूरम रामलू,शेख जाहेद,गणपत कुडे, भद्रय्या नातारकी यांचेसह शेकडो कामगार या आंदोलनात सहभागी झाले.