Home क्राइम मटन मार्केटमध्ये दारूविक्री व सट्टापट्टी, पोलिसांची भूमिका संशयास्पद?

मटन मार्केटमध्ये दारूविक्री व सट्टापट्टी, पोलिसांची भूमिका संशयास्पद?

42
0

गडचांदूर/:-
कोरपना तालुक्यातील नांदा गाव येथील मटन,चिकन मार्केटमध्ये अवैध दारूविक्री,सट्टापट्टी बेदरकारपणे सुरू असल्याने परिसरातील नागरिक विशेषतः महिलांना मोठ्याप्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.सदर मार्केट हटवण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतकडे व सुरू असलेली दारूविक्री,सट्टापट्टी बंद करण्यासाठी अनेकदा पोलीस व स्थानिक ग्रामपंचायतकडे तक्रार करण्यात आली.मात्र आजपर्यंत सकारात्मक काहिच घडले नाही.अंदाजे १४,१५ वर्षांपासून येथील मटन मार्केट हटवण्यासाठी महिलांचा लढा सुरू असल्याचे बोलले जात असून यांना यश केव्हा मिळणार हा मात्र संशोधनाचा विषय बनला असून ग्रा.पं.याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप होत आहे.
दारू बाजांमुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती वारंवार पोलीसांना देऊनही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.असे चित्र असताना 29 जानेवरी रोजी रात्रीच्या सुमारास परिसरातील काही महिलांना सदर मार्केटमध्ये दारूविक्री होत असल्याची शंका आली.सदर ठिकाणी गेले असता खुल्या बॉक्समधून दारूविक्री होत असल्याचे दिसून आले.महिलांना पाहून दारू विक्रेत्यांनी पळ काढला.येथील अवैध धंदे करणारे व पोलिसात मधूर संबंध असल्याने याभागात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे आरोप होत असून दारू पकडल्याची माहिती मिळताच गावकरी मोठ्यासंखेने सदर ठिकाणी पोहोचले.
दारू संबंधीची माहिती जि.प.सदस्य शिवचंद्र काळे,अभय मुनोत,कमलाकर ढवस यांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी त्याठिकाणी पोहोचून एका दुकानातून दारूच्या ५ पेट्या जप्त केली.आरोपी विरूद्ध पोलिसांनी कोणती कारवाई केली असावी ! याविषयी नागरिक अनभिज्ञ असून सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः देशोधडीला लागत असल्याचे चित्र आहे. असे असताना सुद्धा यानिमित्ताने मात्र अवैध व्यवसायीक व काही पोलिसांना “अच्छे दिन” आल्याची चर्चा सुरू जोरात सुरू आहे.पोलिसांनी लवकरात लवकर नांदाफाटा व परिसरातील अवैद्य व्यावसायिकांच्या मुसक्या आवळण्यासाठी कडक पावले उचलावी तसेच नांदा ग्रामपंचायत यांनी येथील मटन,चिकन मार्केट इतरत्र हलवावे अन्यथा नाईलाजास्तव महिलांना रस्त्यावर उतरावे लागेल अशी विनंती वजा इशारा गावातील महिलांनी दिला आहे.अवैध धंद्यांमुळे सुज्ञ नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून सध्या यामुळे गावातील शांत वातावरण कमालीचे तापलेले दिसत आहे.पोलिसांबद्दल असंतोषाची भावना व्यक्त होत असून कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांनी याकडे जातीने लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here