Home विशेष #निखाऱ्यावर_भाजलेली_मुले – आचार्य प्र.के.अत्रे.

#निखाऱ्यावर_भाजलेली_मुले – आचार्य प्र.के.अत्रे.

19
0

Pratikar News

#निखाऱ्यावर_भाजलेली_मुले
– आचार्य प्र.के.अत्रे.

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. डॉ.आंबेडकरांच्या पंचावन्नाव्या वाढदिवशी नवयुगचा खास अंक काढावयाचा आम्ही ठरविले. म्हणून आम्ही त्यांच्याकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले , *’महाराचा कसला वाढदिवस साजरा करता ?* ‘ त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते ? आम्ही खाली मान घातली आणि गप्प बसलो. तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले. आमची भावना त्यांना कळाली. ते म्हणाले , *’खरे सांगू ? व्यक्तिश: माझा वाढदिवस साजरा व्हावा, हे मला मुळीच आवडत नाही. या देशात अवतारी पुरुष आणि राजकीय पुरुष ह्या दोघांचेच जन्मदिवस पाळले जातात. फार दु:खाची गोष्ट आहे ही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे . मला विभूतीपूजा कशी आवडेल ? विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याच्या बद्दल प्रेम बाळगा. आदर दाखवा. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा कसली करता? त्यामुळे पुढाऱ्यांबरोबर भक्तांचाही अध:पात होतो.’* बाबा बोलत होते आणि आम्ही कागदावर त्यांचे शब्द टिपून घेत होतो . *’हा झाला आमच्या स्पृश्यांना संदेश? ‘* डोळे अर्धवट मिटून बाबासाहेब स्वतःशीच पुटपुटले, इतक्यात त्यांना कसली तरी आठवण झाली. *’ग्रीक पुराणातील एक गोष्टच मी तुम्हाला सांगतो. होमरने आपल्या महाकाव्यात सांगितली आहे ती. डिमेटर नावाची एक देवता मनुष्यरुप धारण करुन पृथ्वीतलावर आली. तिला एका राणीने आपले तान्हे मूल सांभाळावयाला आपल्या राजवाड्यात नोकरीस ठेवले. त्या लहान मुलाला देव बनवावे, अशी त्या देवतेला इच्छा झाली. म्हणून ती रोज रात्री सारी मंडळी झोपली की सारी दारे बंद करी. मुलाला पाळण्यातून बाहेर काढी आणि त्याचे कपडे उतरवून ती त्याला जळत्या निखाऱ्यांवर ठेवी. हळूहळू निखाऱ्यांची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले. त्याचे बळ वाढू लागले . त्याच्यामध्ये अत्यंत तेजस्वी असा दैवी अंश विकसित होऊ लागला; पण एका रात्री त्याची आई एकाएकी त्या खोलीत शिरली . तिच्या दृष्टीस तो सारा प्रकार पडताच ती भयंकर संतापली. तिने आपले मूल चटकन निखाऱ्यांवरुन उचलून घेतले आणि त्या देवतेला हाकलून दिले. अर्थात राणीला तिचे मूल मिळाले; पण त्याचा ‘देव’ जो होणार होता, त्या देवाला मात्र ती मुकली! ही गोष्ट हाच अस्पृश्यांना माझा संदेश! तो हा की, विस्तवातून गेल्यावाचून देवपण येत नाही. अग्नि हा माणसाला शुद्ध करतो आणि त्याचे बळ वाढवितो. म्हणून दलित माणसाला हालअपेष्टा आणि त्यागाच्या आगीमधून जायलाच पाहिजे. तरच त्यांचा उध्दार होईल. बायबलात सांगितले आहे की, आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते. पण फक्त मोठी माणसेच ती शर्यंत जिंकू शकतात. ह्याचे कारण काय? तर पुढच्या कल्याणासाठी आज मिळणाऱ्या गोष्टींचा त्याग करावयास लागणारे धैर्य दलितांच्या अंगी नसते; म्हणून आयुष्याच्या शर्यतीत ते मागे राहतात. मला ठाऊक आहे, आम्ही अस्पृश्यांनी आजपर्यंत हजारो वर्षे हाल सोसले आहे. छळ सोसला आहे. झगडा केला आहे. पण इतके असूनही मी पुन्हा हाच संदेश देतो की, ‘ झगडा , आणखी झगडा. त्याग करा , आणखी त्याग करा . त्यागाची आणि हालांची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल, तरच तुम्हाला मुक्ती मिळेल .’ प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढविश्वास पाहिजे. आपल्यावर लादली गेलेली गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपले तन, मन, धन आणि तारुण्य कुर्बान केले पाहिजे. बऱ्याची, वाईटाची, सुखाची, दु:खाची, वादळाची, मानाची आणि अपमानाची पर्वा न करता, अस्पृश्य एकसारखे झगडत राहतील, तरच त्यांचा उध्दार होईल!*

लोहार ऐरणीवर जसे घाव घालतो, तशा त्वेषाने आणि आवेशाने बाबासाहेबांच्या तोंडातून एकेक शब्द निघत होता. इतकी वर्षे झाली तरी त्यांचे ते दिव्य शब्द आमच्या कानात अजूनही घुमत आहेत. बाबासाहेबांचा हा संदेश त्यांच्या लक्षावधी अनुयायांनी अक्षरशः पाळलेला आहे. म्हणून आज त्यांच्यात एवढे ऐक्य, सामर्थ्य आणि कडवेपणा निर्माण झालेला आहे. बाबासाहेबांचे अनुयायी म्हणजे बाजारबुणगे नव्हेत. ते एक लढाऊ सैन्य आहे. ते लढाऊ बळ आणि निर्धार बाबांनी त्यांच्यामध्ये कसा निर्माण केला? तर डिमेटर देवीप्रमाणे त्यांनी ही आपली लाखो मुले रोजच्या रोज निखाऱ्यावर भाजून काढली, कढवली, परतली, उकळली, तेव्हा वाटेल त्या दु:खाला, संकटाला आणि आपत्तीला तोंड देण्याचे सामर्थ्य आज त्यांच्यामध्ये निर्माण झाले आहे. जगामध्ये आजपर्यंत रक्ताच्या नद्या वाहवल्यावाचून धर्मप्रचार झालेला नाही, आणि इथे हा महापुरुष तथागत बुध्दाला शरण जाताच, त्याचे लाखों अनुयायी *’बुध्दं सरणं गच्छामी’* अशा गर्जना करीत त्याच्यामागून शांतपणे चालू लागतात. असा चमत्कार जगाने कधी पाहिला आहे? डिमेटर देवतेप्रमाणे आपल्या मुलांना निखाऱ्यावर भाजण्याचे काम पूर्ण होण्याच्या आधीच आंबेडकरांना येथून जावे लागले. ते उरलेले अग्निदिव्य आता स्वतःच्याच बळाने आणि धैर्याने त्यांनी संपवायला हवे.

साभार : दलितांचे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर
– आचार्य प्र.के.अत्रे

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here