Home विशेष आपण सारे “अंगुलीमाल”

आपण सारे “अंगुलीमाल”

17
0

प्रतिकार

“त्या अहिंसक” सारखाच आमचाही जन्म “अहिंसक” असतो. आमच्या जन्मापासून ते बोबड्या बोलापर्यंत किंवा फारफार तर 8व्या वर्षांपर्यंत खरंच आम्हीं “अहिंसक” असतो. आम्हांला जात, धर्म, संस्कृती, यांचा स्पर्श तोपर्यंत झालेला नसतो. नंतर आपल्यावर संस्कार घडविल्याने मग आम्हांला आमच्यावर “लादलेल्या स्वत्व” गवसते. लादले यासाठीच कारण आम्हीं ते स्वतः शोधलेले नसते.

“त्या अहिंसक” प्रमाणेच कधीतरी आमच्यावर अन्याय झालेला असतो किंवा आपल्या समाजावर किंवा कुटुंबावर अन्याय झाल्याची जाणीव होते. मग आम्हीही तशीच खूणगाठ घेऊन फिरत असतो. अशावेळेस आपल्यातील “अंगुलीमाल” जागृत झालेला असतो. मग मानसिक, वाचिक व कायिक या क्रमाने आम्हीं हिंसा करायला सुरुवात करतो. हे इतक्या सुप्तपणे होत जाते की नकळतपणे त्या व्यक्ती किंवा समूहावर आपण राग, द्वेष, मत्सर, टीका, संशयीपणा या दृष्टीने पाहतो आणि मग आपले संस्कार दृढ होत जातात. एक खुनशी किंवा बदल्याची भावना घेऊन जगत राहतो. इतरांचे सोडा, आम्हीं आमच्या जवळच्या व्यक्तींचा देखील अनेक मार्गाने, अनेक कारणाने अपमान करतो. हा मानसिक किंवा वाचिक किंवा कायिक किंवा तिन्ही प्रकारे देखील असू शकतो. आपला अंगुलीमाल हा दिवसंदिवस जास्तच अक्राळ विक्राळ होत जातो.

“तो अंगुलीमाल” कमीतकमी खुनी दरोडेखोर म्हणून माहीत तरी होता. “आजचा अंगुलीमाल” मात्र सुसंस्कारित पडद्याच्या मागे लपलेला असतो! त्याचा खरा चेहरा कधीतरी दिसत असतो मात्र स्वतःला तो कधीच “अंगुलीमाल” समजत नसल्यामुळे त्याच्या विकार नष्ट करण्याची प्रक्रिया सुरूच होत नसते! एका false narrative मध्ये आम्हीं जगत राहतो.

खरी गरज आहे ती आपल्यातील “अंगुलीमाल” समजून घेण्याची. सध्याच्या युगात तो सर्वत्र असतोच असतो. गरज असते तो ओळखण्याची!

“त्या अंगुलीमाल”ला भ.बुद्ध भेटले आणि त्याच्यावर झालेल्या द्वेषपूर्ण संस्कारांची विफलता लक्षात आल्यानंतर त्याचे विकार नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्या अंगुलीमालाने आजच्या “अंगुलीमाल”साठी एक उदाहरण देऊन गेला आहे! “आजच्या अंगुलीमालने आपली जातीयतेच्या, धार्मिक अहंभाव, श्रेष्ठतत्वाची झापडं काढली की खऱ्या अर्थाने त्याला त्याच्या “स्वत्वाची” जाणीव होऊ शकेल! एका “अहिंसक” कडे मग आपला प्रवास सुरु होईल! अस्थिर कडून स्थिरते कडे आमचा प्रवास सुरू होऊ शकेल.
(चित्रे प्रासंगिक)

अतुल मुरलीधर भोसेकर
9545277410

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here