Home आपला जिल्हा उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांची...

उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन तंत्रज्ञान जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांची माहिती

1
0

प्रतिकार

चंद्रपूर, दि. 19 जानेवारी : सन २०२० च्या माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे शारिरीक पक्वतेच्या अवस्थेत बियाणे भिजले असल्याने येत्या खरीप २०२१ च्या हंगामामध्ये पेरणीसाठी वापरल्यास उगवणशक्ती कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी स्वत: उन्हाळी सोयाबीनचे बिजोत्पादन घेवून पुढील हंगामाकरिता घरच्याघरी दर्जेदार बिजोत्पादन निर्मिती करावी. त्याकरिता पुढील तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादनासाठी आवश्यक बाबी-
१. जमीन-सोयाबीन लागवडीसाठी मध्यम ते भारी जमीन आवश्यक आहे. अत्यंत हलक्या जमीनीत सोयाबीनचे अपेक्षित उत्पादन येत नाही. जास्त आम्लयुक्त्, क्षारयुक्त तथा रेताड जमीनीत सोयाबीनचे पीक घेऊ नये. जमीनीत सेंद्रीय कर्बाची मात्रा चांगल्या प्रामाणात असली पाहिजे.
२ .हवामान-सोयाबीन हे पीक सुर्यप्रकाशास संवेदनशील आहे. सोयाबीन पीकासाठी समशितोष्ण हवमान अनुकूल असते. त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये पिकाची कायिक वाढीची अवस्था थोडीफार लांबण्याची शक्यता असते.सोयाबीन पीक २२ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात चांगले येते; परंतू, कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले तर फूले व शेंगा गळतात, शेंगाची योग्य वाढ होत नाही व दाण्याचा आकार कमी होतो.
३. वाण-पेरणीसाठी किमान ७० टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे आवश्यक आहे. पेरणीसाठी वनामकृवि, परभणीने विकसीत केलेल्या एमएयुएस ७१ , एमएयुएस १५८ व एमएयुएस ६१२ या वाणांची किंवा महात्मा फुले कृषि विदयापीठ, राहुरीने विकसीत केलेल्या केडीएस ७२६, केडीएस ७५३ या वाणांची किंवा जवाहरलाल नेहरू कृषि विश्वविदयालय, जबलपूर ने विकसीत केलेल्या जेएस ३३५, जेएस ९३-०५, जेएस २०-२९, जेएस २०-६९, जेएस २०-११६ या वाणांची निवड कराव. वरील वाण जर शेतकरी बंधूनी खरीप २०२० मध्ये पेरलेले असतील व त्या बियाण्याची उगवणशक्ती चांगली असेल तर घरचे बियाणे स्वच्छ करून बिज प्रक्रिया करून पेरणी करावी.
४. जमीनीची पूर्व मशागत- खरीप हंगामातील पिकाच्या काढणीनंतर नांगरणी करून विरूध्द दिशेने मोगडणी करावी व नंतर पाटा मारून जमीन समतोल करावी.
५. बिजप्रक्रिया, पेरणी, खते व आंतरमशागत
बिजप्रक्रिया- सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे मोठया प्रमाणात नुकसान होते. रोग आल्यानंतर बुरशीनाशकाची फवारणी घेण्यापेक्षा पेरणीपूर्वी बिज प्रक्रिया केल्यास रोगाचे व्यवस्थापन व्यवस्थीतरित्या होते. सोयाबीन बियाण्यास पेरणीपूर्वीच मिश्र उत्पादन कार्बोक्झीन ३७.५ % + थायरम ३७.५% ची (व्यापारी नाव-व्हिटावॅक्स पॉवर) ३ ग्रॅम प्रति कि.ग्रॅ. बिज प्रक्रिया करावी. या बिजप्रक्रियेमुळे सोयाबीनचे कॉलर रॉट, चारकोल रॉट व रोपावस्थेतील इतर रोगांपासून संरक्षण होते. या शिवाय बिजप्रक्रियेसाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी (८-१० ग्रॅम/कि.ग्रॅ. बियाणे) चा वापर सुध्दा करावा. या बुरशी नाशकांच्या बिज प्रक्रियेनंतर बियाण्यास रायझोबियम जिवाणू खत (ब्रेडी रायझोबियम) + स्फुरद विरघळणारे जिवाणू खताची (पीएसबी) २५० ग्रॅम प्रति १० कि.ग्रॅ.किंवा १०० मिली/१० कि.ग्रॅ.(द्रपरूप असेल तर) याची बिजप्रक्रिया करावी.
पेरणी-
पेरणीची वेळ-
उन्हाळी हंगामी सोयाबीनच्या बिजोत्पादनाकरिता डिसेंबरचा शेवटचा आठवडा ते जानेवारीच्या पहिल्या पंधरवडया पर्यंत पिकाची पेरणी करावी. जर पेरणीस उशीर झाला तर पिक फुलो-यात असतांना व दाणे भरण्याच्या अवस्थेत असतांना म्हणजेच मार्च व एप्रिल महिण्यात जास्त तापमानामुळे फुले व शेंगा गळ होते व दण्याचा आकार लहान होतो. त्यामुळे उत्पदनात मोठया प्रमाणात घट होऊ शकते.जर डिसेंबरच्या शेवटच्या आठवडयात किंमान तापमान १० अंश सेल्सीअसच्या खाली गेले असेल तर पेरणी थोडी लांबवून तापमान साधारणत: १५ अंश झाल्यास पेरणी करावी. कमी तापमानात पेरणी केल्यास उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागतात.
लागवडीचे अंतर व पध्दत- सोयाबीनची पेरणी ४५x५ सें.मी. अंतरावर व २.५ ते ३.० सें.मी. खोलीवर करावी. पेरणीच्या वेळेस बियाणे जास्त खोलीवर पडल्यास व्यवस्थित उगवण होत नाही.
बियाण्याचे प्रमाण-सोयाबीन लागवडीसाठी हेक्टरी ६५ कि.ग्रॅ.बियाणे वापरावे (एकरी २६ किलो)
खते-
शेणखत/कंपोस्ट खत- सोयाबीनसाठी हेक्टरी २० गाडया (५टन) शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकून जमिनीत चांगले मिसळावे.
रासायिनक खते: सोयाबीनला हेक्टरी ३० कि.ग्रॅ. नत्र + ६० कि.ग्रॅ. स्फुरद+ ३० कि.ग्रॅ. पालाश + २० कि.ग्रॅ गंधक पेरणीच्या वेळेसच दयावे. पेरणी करतेवेळी खते ही बियाण्याच्या खालीच पडतील त्यांचा बियाण्याशी सरळ संपर्क येणार नाही. याची काळजी घ्यावी. गंधकाचा वापर सोयाबीनसाठी अत्यंत आवश्यक आहे.
त्याच प्रमाणे हेक्टरी २५ किलो झिंक सल्फेट आणि १० कि.ग्रॅ. बोरॅक्स् दयावे. या पिकास नत्र, स्फुरद, पालाश, मॅग्नेशअम, गंधक, कॅल्शियम, मॉलिब्डेनम, बोरॉन, लोह, जस्त व मँगनीज ही अन्नद्रव्ये वाढीसाठी,
फुलधारणेसाठी व शेंगात दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. उन्हाळी हंगामात पाणी देण्यामध्ये खंड पडल्यास पोटॅशियम नायट्रेटच्या दोन फवारण्या अनुक्रमे ३५ व्या व ५५ व्या दिवशी १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये टाकूण फवारणी करावी. पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा तसेच माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी जास्त करावी. पिक २० ते २५ दिवसाचे असतांना जर सुक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास मायक्रोला (ग्रेड-२) या सुक्ष्मअन्नद्रव्यांची ५० ते ७५ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी. पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत असतांना १९:१९:१९ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये टाकूण फवारणी करावी. तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना ०:५२:३४ या लिक्विड रासायनिक खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी. रसायनिक खते देण्यासाठी खालील पैकी कोणत्याही एक पर्यायाचा वापर करता येईल.
अ.क्र. खते प्रति हेक्टरी
१ युरिया (४० कि.ग्रॅ.)+१०:२६:२६ (११५ कि.ग्रॅ.)+सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ कि.ग्रॅ)
२ युरिया (६५ कि.ग्रॅ.)+सिंगल सुपर फॉस्फेट (३७५कि.ग्रॅ.)+म्युरेट ऑफ पोटॅश (५० कि.ग्रॅ)
३ १०:१५:१५ (२०० कि.ग्रॅ.)+सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ कि.ग्रॅ)
४ १८:१८:१० (१६६ कि.ग्रॅ.)+सिंगल सुपर फॉस्फेट (१८७.५ कि.ग्रॅ)+ म्युरेट ऑफ पोटॅश (२३:३३ कि.ग्रॅ.)
आंतरमशागत: पिक २० ते ३५ दिवसाचे असतांना दोन कोळपण्या (१५ ते २० दिवस पहिली आणि 30 ते 35 दिवसांनी दुसरी) व एक निंदणी करून शेत तणिवरिहत ठेवावे. एकदा सोयाबीनला फुले लागली की कोळपणी करू नये अन्यथा सोयाबीनच्या मुळा तुटून नुकसान होते
पाण्याचे नियोजन- पेरणीच्या अगोदर तुषार सिंचनाने पाणी देवून पेरणी करावी. थंडीमुळे तापमान कमी असेल तर पुर्णत: उगवणीसाठी १० ते १२ दिवस लागू शकतात. चांगल्या उगवणीसाठी पेरणीनंतर ५ दिवसांनी पुन्हा तुषार सिंचनाने हलके पाणी दयावे. जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तसेच मार्च व एप्रिल महिन्यात ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी दयावे. सोयाबीनमध्ये रोप, फुलो-याची व शेंगा भरण्याची अवस्था या पाण्याचा ताणास संवेदनशील असल्यामुळे या कालावधीत पाटाने पाणी दयावे. ज्या शेतात बिजोत्पादन घ्यावयाचे आहे. त्या शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. पिक पेरणी ते काढणी या कालावधीत साधारणत: जमीनीच्या मगदुराप्रमाणे ८ ते १० पाणी पाळयाची आवश्यकता आहे.
भेसळ काढणे -सोयाबीन पिकामध्ये झाडांची उंची, पानाचा आकार, झाडावरील लव, पान, खोड व फुलांचा रंग इत्यादी लक्षणांनुसार भेसळ ओळखून नष्ट करावी.
पीक संरक्षण- उन्हाळी सोयाबीन पिकावर तंबाखुवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी, वाटाण्यावरील शेंगा पोखरणारी अळी तसेच पांढरी माशी व तुडतुडे इ. किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. सदर किडींच्या नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस ५० ईसी (२० मिली) किंवा लँबडा सायहॅलोथ्रीन ४.९% सी.एस.(६ मिली) किंवा थायमिथोक्झाम १२.६० % + लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५ झेडसी (२.५ मिली) किंवा क्लोरँट्रानीलीप्रोल १८.५ एस.सी. (३ मिली) या किटकनाशकाचा वापर करावा. सदर किटकनाशकाची मात्रा तीनपट करावी. उन्हाळी सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास ती उपटून नष्ट करावी. पांढ-यामाशीचा प्रादुर्भाव वाढल्यास या रोगाचा प्रसार वेगाने होतो. त्यामुळे पांढ-यामाशीचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. त्यासाठी थायमिथोक्झाम १२.६०% लँबडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी (२.५ मिली/१० लीटर पाणी (साधा पंप) या किटकनाशकाचा वापर करावा.
काढणी व मळणी-शेंगा पिवळया पडून पक्व होताच पीकाची काढणी करावी. कापणी नंतर पिकाचे छोटे छोटे ढीग करून २-३ दिवस उन्हात चांगले वाळवून मळणी यंत्राची गती कमी करून मळणी करावी व बियाण्याच्या बाहय आवरणाला ईजा पोहचणार नाही याकडे लक्ष दयावे. मळणी करतांना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्के पर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फे-यांची गती ४०० ते ५०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी व बियाण्याची आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के पर्यंत असेल तर गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट इतकी ठेवावी. साधारणत: उन्हाळी हंगामामध्ये तयार झालेल्या बियाण्याचा रंग पिवळसर हिरवट असतो.
साठवण-
मळणी नंतर बियाणे ताडपत्री/सिंमेटच्या खळयावर पातळ पसरून बियाण्यातील आद्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्के पर्यंत आणावे. बियाणे स्वच्छ करून पोत्यात भरून साठवण करावी. साठवणीचे ठिकाण थंड, ओलावारहित व हवेशीर असले पाहिजे.साठवण करतांना एकावर एक चार पेक्षा जास्त पोती ठेवू नये.
उत्पादन- उन्हाळी सोयाबीनचे एकरी ३ ते ५ क्विंटल पर्यंत सरासरी उत्पादन येऊ शकते.
टिप- उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन खरीप हंगामासारखे होत नाही. दाण्याचा आकार लहान असतो १०० दाण्याचे वजन ८ ते १० ग्रॅम असते. उन्हाळी सोयाबीनचा हंगाम फक्त घरच्याघरी बिजोत्पादन करण्यासाठी चांगला आहे. खरीप २०२० मध्ये सोयाबीन काढणीच्यावेळेस आलेल्या पावसामुळे सोयाबीनचे बियाणे मोठया प्रामणात भिजलेले असल्यामुळे अशा बियाण्याची उगवणक्षमता कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांकडे पाण्याची सोय आहे. अशा शेतक-यांची उन्हाळी सोयाबीन बिजोत्पादन घेण्यास हरकत नाही. अधिक माहिती www.atmachandrapur.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील कळविले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here