Home कृषी हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

हरभऱ्यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

7
0

प्रतिकार

निलेश नगराळे

चंद्रपूर, दि. 6 जानेवारी : हरभरा पिकाचे बारकाईने निरिक्षण करून घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसुन येताच व्यवस्थापनाचे उपाय योजावे. या किडींची मादी पतंग पानावर, कोवळया शेंड्यावर, कळ्यावर व फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३ दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरीत द्रव्य खरडुन खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळुन पडतात. थोडया मोठया झालेल्या अळया संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांद्याच शिल्लक राहतात. पुढे पीक फुलोऱ्यावर आल्यावर ह्या अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळ्या प्रामुख्याने फुले व घाट्यांचे नुकसान करतात. मोठया झालेल्या अळ्या घाट्याला छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधरण: ३०-४० घाट्यांचे नुकसान करते.
एकात्मिक व्यवस्थापन-
१.घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी ईत्यादी पिकामध्ये फिरून घाटे अळ्या वेचुन त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामध्ये येणार नाहीत. त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा.
२.ज्या शेतामध्ये मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे म्हणून उपयोग केला नसेल त्या शेतामध्ये बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रति हेक्टरी २० पक्षी थांबे) तयार करून शेतामध्ये लावावे. त्यामुळे पक्षांचे अळ्या वेचण्याचे काम सोपे होते.
३.कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत. सापळ्यामध्ये सतत तीन दिवस आठ ते दहा पतंग आढळल्यास व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
४.शेतकरी बंधुंनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींचा प्रादुर्भाव आढळुन आल्यास किंवा ४० ते ५० टक्के पिक फुलोऱ्यावर आल्यानंतर घाटेअळीचे व्यवस्थापनासाठी खालील दोन फवारण्या १० लिटर पाण्यात मिसळुन कराव्या.
पहिली फवारणी (५० टक्के फुलो-यावर असतांना)
१.निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि. (१x१० पिओबी/मिली)५०० एल.ई./हे. किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी.,२०मि.ली.
दुसरी फवारणी (पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसानंतर)
१.इमामेक्टीन बेझाएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा ईथिऑन ५० टक्के ई.सी. २५ मिली किंवा फ्ल्युबेंडामाईड २० टक्के डब्ल्युजी ५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एस.सी. २.५ मिली
अधिक माहितीसाठी उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील यांनी केले आहे.
0000

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here