दि.3 जाने. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त.
प्रतिकार
(निलेश पाझारे)
जिल्ह्याच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रात अभिनव आंदोलन व आक्रमकतेसाठी ओळखल्या जाणारे तसेच आपल्या शैलीने महानगरपालिकेच्या राजकारणात सत्ताधारी व प्रशासनाला वारंवार कोंडीत पकडणारे चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख सध्या एका मोहल्ला स्कुलमध्ये ‘गुरूजी’ बनून प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत.
पप्पू देशमुख यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने 22 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्या सहकाऱ्यांनी एका आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सुरुवात केली. कोविड-१९ आपत्तीमुळे शाळा व शिक्षणापासून तुटलेल्या विद्यार्थ्यांसाठी “झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला स्कूल’ची सुरुवात त्यांच्या सहकाऱ्यांनी केली व आपल्या सहकार्यांसह नगरसेवक पप्पू देशमुख सुध्दा या शाळेचे गुरुजी बनले.
लहान मुलांची मागील अनेक महिने शाळेपासून ताटातूट झालेली आहे.सरासरी वर्षभर शाळेपासून दूर गेल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर खोल परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईलची सुविधा आहे त्यांना ऑनलाइन माध्यमाद्वारे किमान शिक्षकांच्या संपर्कात राहता येते.परंतु ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, किंवा वारंवार रिचार्ज मारण्याची सोय नाही अशा विद्यार्थ्यांची मात्र शाळा व शिक्षणाशी नाळ पूर्णपणे तुटलेली आहे.
एकीकडे संपर्कात येऊन कोविडचे संक्रमण होऊ नये म्हणून शासनाने शाळा बंद केलेल्या आहेत. परंतु दुसरीकडे शाळेपासून तुटलेले विद्यार्थी घोळका करून खेळताना दिसतात.मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे तसेच वारंवार हात धुणे या गोष्टीचे पालन लहान मुलांकडून होतांना दिसत नाही. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील महाविद्यालयाच्या युवकांनी सुरू केलेल्या उपक्रमातून प्रेरणा घेऊन नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘कोरोना विरुद्ध प्रशिक्षण व कोरोना काळात शिक्षण’ असे ब्रीद वाक्य ठेवून ‘झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला’ स्कूलचा उपक्रम सुरू केला. आज या उपक्रमाला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. वडगाव येथील हनुमान मंदिराच्या बाजूला मनपाच्या प्राथमिक शाळेसमोर सकाळी ८ ते १० च्या दरम्यान ही शाळा भरत असते. विशेष म्हणजे स्वतः नगरसेवक पप्पू देशमुख या शाळेमध्ये शिकवतात. त्यांचे सहकारी गितेश शेंडे,अक्षय येरगुडे, मनीषा बोबडे,गोलू दखणे या शाळेची संपूर्ण जबाबदारी सांभाळतात.
‘झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला स्कूल’मध्ये गणित,इंग्रजी,योगासन,स्पोर्टस् इत्यादी विषयांसाठी प्रीती बैरम पोटदुखे, धनश्री पुनवटकर,आकाश लोडे, रमा देशमुख,अशोक नंदूरकर,गोजे मॅडम यांचे विशेष योगदान मिळत आहे.भद्रावती पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी फटींग सर व डायटच्या सराफ मॅडम,प्रथम संस्थेचे विनोद ठाकरे यांनी सुध्दा मोहल्ला शाळेकरिता वेळोवेळी मार्गदर्शन केले. चाळीसच्या वर विद्यार्थी या शाळेत हजेरी लावतात.नर्सरी ते आठवीपर्यंत सर्व वर्गातील विद्यार्थी एकाच ठिकाणी अंतरावर बसून ग्रुपने शिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर याची एक किट तयार करून देण्यात आलेली आहे. सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे पालन करणे, मास्क लावणे, वारंवार हात धुणे,सॅनेटायझरचा वापर याबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. या उपक्रमासाठी वैभव ऐनप्रड्डीवार, भूषण फुसे,आशिष महातळे यांनी वेळोवेळी आर्थिक सहकार्य केलेले आहे.
प्रभागात इतर ठिकाणी सुद्धा ‘झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला स्कूल’ सुरू करणार
नगरसेवक पप्पू देशमुख यांची प्रतिक्रिया
वडगाव प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर वडगाव येथे ‘झिरो कॉन्टॅक्ट मोहल्ला स्कूल’ सुरू करण्यात आलेली आहे. मागील एक महिन्यापासून या उपक्रमातील सर्व बारकावे तपासण्यात आले. आता प्रभागातील इतर सात ते आठ ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा मानस आहे. स्थानिक पालकांनी लेखी मागणी केल्यानंतरच त्यांच्या संमतीने कोविड -19 च्या सर्व नियमांचे पालन करून हा उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिलेली आहे.