Home राजकारण नागपूर महापालिकेत महाविकास आघाडीचा पहिलाच प्रयोग

नागपूर महापालिकेत महाविकास आघाडीचा पहिलाच प्रयोग

13
0

प्रतिकार

निलेश नगराळे

नागपूर ः राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुढील महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेसोबत लढण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहे. मात्र, महापौरपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने नागपुरात प्रथमच महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात येत आहे. संख्याबळानुसार भाजपचे महापौरपदी दयाशंकर तिवारी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार आहे. परंतु त्यांच्यापुढे कॉंग्रेसचे मनोज गावंडे तर उपमहापौरपदासाठी सेनेच्या मंगला गवरे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, सत्ताधाऱ्यांना उपमहापौरपदाचा उमेदवार निवडण्यासाठी आज चांगलाच दम लागला.

महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर महापौर व उपमहापौरपदासाठी येत्या ५ जानेवारीला विशेष सभागृहात निवडीची प्रक्रिया होणार आहे. सत्ताधाऱ्यांकडून महापौरपदासाठी दयाशंकर तिवारी यांच्या नावाची घोषणा तेरा महिन्यांपूर्वीच करण्यात आली. परंतु राजीनामा देऊन नऊ दिवस लोटल्यानंतरही सत्ताधाऱ्यांना उपमहापौरपदाच्या उमेदवारासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे

मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पाच नावांवर चांगलेच घमासान झाले. त्यामुळे उशिरा रात्रीपर्यंत उपमहापौरपदाच्या उमेदवार निवडीसाठी कोअर कमिटीतील नेत्यांचा दम लागल्याचे दिसून आले. दरम्यान, कॉंग्रेस, राष्ट्रवादी व सेनेच्या नेत्यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे महापौरपदाचे उमेदवार म्हणून प्रभाग ३३ मधील कॉंग्रेसचे नगरसेवक मनोज गावंडे तर उपमहापौरपदाच्या उमेदवार म्हणून शिवसेनेच्या प्रभाग २८ मधील नगरसेविका मंगला गवरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत का होईना यानिमित्त प्रथमच महाविकास आघाडी एकत्र दिसून येणार आहे. या आघाडीमुळे पुढील महापालिका निवडणूक कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र लढण्याचे संकेत दिसून येत आहे.

बसपाचीही तयारी

महापौरपदाच्या प्रत्येक निवडणुकीत उमेदवार देऊन आपले वेगळेपण जपणाऱ्या बसपानेही महापौरपदाच्या निवडणुकीत भाग घेण्याची तयारी केली. बसपाने महापौरपदाचे उमेदवार म्हणून प्रभाग नऊमधील नगरसेवक नरेंद्र वालदे तर उपमहापौरपदासाठी प्रभाग सहामधील नगरसेविका वैशाली नारनवरे यांची नावे निश्चित केली.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here