शिल्पा मेक्षाम
नागपूर (कामठी) | 09.25 AM
नागपूर ः मेडिकल-सुपरच्या श्वसनरोग विभागाच्या निरीक्षणातून मास्क घातल्यामुळे प्रदूषणापासून बचाव होत असल्याचे पुढे आले आहे. येथे उपचारासाठी येणाऱ्या सीओपीडी तसेच दमा रुग्णांमध्ये ॲटकचे प्रमाण कमी झाले आहे. श्वसनविकारावर मास्क वरदान ठरत असून रुग्णसंख्येत ७५ टक्के घट झाल्याची नोंद आहे.
मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटीत श्वसनरोग विभाग कार्यरत आहे. येथे श्वसन, फुप्फुस, छातीशी संबंधित आजाराचे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी या विभागात उपचाराला येणाऱ्या शंभर रुग्णांपैकी ३० ते ४० टक्के रुग्णांमध्ये गंभीर दमा, सीओपीडी, श्वसनाशी संबंधित गंभीर आजार दिसून येत होते.फुप्फुसाशी संबंधित गंभीर आजाराचे रुग्णांची संख्या बऱ्यापैकी होती. परंतु कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मास्क आणि इतर सुरक्षित साधनांचा वापर वाढला.
प्रदूषण, धुलीकणामुळे होणारा दमा, सीओपीडी तसेच श्वसनाच्या इतरही आजाराचे रुग्ण कमी झाल्याचे विभागाच्या निरीक्षणातून पुढे आले. कोरोनानंतर लॉकडाउन शिथिल झाल्यावर हळू-हळू रुग्ण वाढू लागले असले तरी त्यात गंभीर संवर्गातील रुग्णांची संख्या सुमारे ७५ टक्क्यांनी घटली आहे. सध्या विभागात दिवसाला २५ ते ३० रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचाराला येतात. त्यातील १० टक्क्यांपेक्षा कमी व्यक्तींमध्ये गंभीर दमा दिसतो.
संभ्रम होणार दूर
शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करणारा संरक्षक म्हणून मास्ककडे बघितले जात आहे. मात्र मास्क घातल्याने श्वसनाचे आजार जडतात, असा संभ्रम सामाजिक माध्यमांवर पसरत होता. तो या नोंदीतून दूर व्हायला मदत मिळणार आहे, असा विश्वास मेडिकलच्या डॉक्टरांनी व्यक्त केला.
हवेतून कोरोना पसरण्यााची भिती लक्षात घेता कोरोना प्रतिबंधासाठी मास्क वापरणे सुरू झाले. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांपासून बचाव मास्कमुळे होतोच. पण, हवेतील प्रदूषणांपासून मास्क बऱ्यापैकी संरक्षण करू शकतो, हे सत्य श्वसनविकाराच्या रुग्णांच्या नोंदीतून पुढे आले आहे. ‘ड’ जीवनसत्त्वासाठी हिवाळ्यामध्ये सकाळी तासभर सूर्यप्रकाशात उभं राहणं फायदेशीर ठरेल.
– प्रा. डॉ. सुशांत मेश्राम,
विभागप्रमुख, श्वसनरोग विभाग, मेडिकल, नागपूर.
संपादन – शिल्पा मेक्षाम