नागपूर ः कोरोनाचे जीवघेणे संकट कोसळल्यांतर जिल्हा प्रशासनाने कोविड हॉस्पिटल उभारण्याचा सपाटा लावला. सुमारे सव्वाशेवर कोविड हॉस्पिटल व कोविड सेंटर उभारण्यात आले. सप्टेंबर, ऑगस्ट महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्णांना खाटा मिळणे कठिण झाले होते. मात्र नोव्हेंबरमध्ये कोरोनावर नियंत्रण आले. सद्या नागपुरातील पन्नास रुग्णालयात एकही कोरोनाबाधित रुग्ण दाखल नसल्याची माहिती पुढे आली आहे. मागील २४ तासांमध्ये ५ जणांचा कोरोनाच्या बाधेने मृत्यू झाला असून ३०० नवीन बाधितांची नोंद झाली आहे.
जिल्ह्ह्यात दिवाळीच्या मौसमात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या संख्येने घटली होती. मात्र दिवाळीनंतर काही आठवड्यांनी दैनिक करोनामुक्तांहून नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतांना दिसू लागली. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात १२ डिसेंबर २०२० रोजी सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजारावर पोहचली. यातील ५ हजार १०१ रुग्ण शहरातील आहेत. तर ८६९ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.
रविवारी (ता.१३) ४ हजार ८९६ चाचण्या झाल्या असून यातील ३०० नवीन बाधित आढळले. यामुळे तापर्यंतच १ लाख १७ हजार २११ वर कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला आहे. तर शहरात ४ आणि ग्रामीण भागात १ अशा ५ मृत्यूंची नोंद झाल्याने आतापर्यंत ३ हजार ७९७ मृत्यूंची संख्या झाली आहे. आजघडीला जिल्ह्यात ११५ कोव्हिड केअर सेंटर, कोव्हिड रुग्णालयांमध्ये १ हजार १२६ गंभीर संवर्गातील करोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. ही संख्या ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तिप्पट होती. दरम्यान आता शहरातील कोरोनावर मात करणाऱ्यांची टक्केवारी ९१.८३ टक्यांवर पोहचली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालातून पुढे आली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या मनात कोरोनाची असलेली भिती कमी झाली.
विशेष असे की, वेळीच उपचार मिळत असल्याने गंभीर होणाऱ्या रुग्णांचीही संख्या तुलनेत कमी होत आहे. दरम्यान हल्ली बऱ्याच खासगी रुग्णालयांत रुग्ण नसल्याने व तेथे कोविड हॉस्पिटल असल्याने इतर आजाराचे रुग्ण उपचारासाठी येत नसल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे रुग्णालयांना आर्थिक अडचण़ींना समोर जावे लागत आहे. त्यामुळे बऱ्याच खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या खर्चाचे गणित कोलमडले असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
१५ दिवसानंतर कोरोनामुक्तांची संख्या अधिक
तब्बल पंधरा दिवसानंतर नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्ऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले. २४ तासांमध्ये ३०० जणांना कोरोनाची बाधा झाली. तर ५३४ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ लाख ६ हजार ६३२ झाली आहे. यात शहरातील ८५ हजार २३८ तर ग्रामीण भागातील २२ हजार ३९४ जणाचा समावेश आहे.
मेडिकल, मेयोत रुग्णांची संख्या अधिक
जिल्ह्ह्यातील असो की, बाहेरच्या जिल्ह्यातून रेफर करण्यात आलेल्या रुग्णांची उपचारासाठी मेडिकल हेच रुग्णालय नजरेपुढे येते. यामुळेच सर्वाधिक २१५ रुग्ण मेडिकलमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यापाठोपाठ मेयोत ८३ रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. एम्समध्ये २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष असे की, २२ खासगी रुग्णालयात पाचपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकाच्या अहवालातून पुढे आले आहे.