प्रतिकार न्युज
शिल्पा मेश्राम….
नागपूर
👏 सुर्यपूत्र यशवंत तथा भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांचा आज जन्मदिवस तसेच जयंती
यशवंत भीमराव आंबेडकर (१२ डिसेंबर १९१२ – १७ सप्टेंबर
१९७७), भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे प्रथम व एकमेव पुत्र होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर यशवंतरावांनी स्वतःला धम्मकार्यासाठी झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या सामाजिक समतेचे काम वेगाने सुरू ठेवले.
त्यांचे धार्मिक कार्य :
● ‘मी सारा भारत बौद्धमय करीन’ हा बाबासाहेबांचा संकल्प उराशी घेऊन भैय्यासाहेबांनी काम सुरु केले. त्यांनी अनेक ठिकाणी धम्मदीक्षेचे कार्यक्रम घेतले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे सर्वत्र होत होते.
● भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी श्रीलंका, थायलंड, म्यानमार, सारनाथ व दिल्ली येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदांमध्ये भारतीय बौद्धांच्या समस्या मांडल्या.
● खेड्यापाड्यातील बौद्ध विहारांचे उद्घाटन केले. १९६८ साली मुंबई येथे धम्म परिषद भरविण्यात आली व प्रमुख पाहुणे म्हणून १४ वे दलाई लामा यांना बोलविण्यात आले.
● ह्या धम्म परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. त्यात संस्कार विषयक आचार संहिता सर्वानुमते मान्य करण्यात आली.
● बौद्ध जीवन संस्कार पाठ या नावाचे पुस्तक तयार करण्यात आले. धम्म प्रसार कार्याचा एक भाग म्हणून १९६७ मध्ये ११व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी भैय्यासाहेबांनी स्वतः श्रामणेरची दीक्षा घेतली व त्या कालावधीत ते चैत्यभूमीतच राहत होते.
● त्यांचे नाव ‘महापंडित काश्यप’ असे ठेवण्यात आले होते. १९५९ मध्ये ब्रिटिश भिक्खू महास्थविर संघरक्षित लंडनहून आले असता त्यांनी भैय्यासाहेबांची भेट घेतली होती.
राजकीय काराकीर्द :
◆ १९६२ ते ६८ दरम्यान महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य (आमदार) असताना भैय्यासाहेबांनी विधानपरिषदेत नवबौद्धांच्या हक्कांबद्दल हिरीरीने बाजू मांडली तसेच या नवीन बौद्धांच्या सवलतीविषयी ते तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाईंनाही भेटले होते.
बाबासाहेबांच्या सानिध्यात राहून कार्य :
■ १९४४ पासून बाबासाहेबांच्या जनता, प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन तेच पाहत होते.
■ बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये बाबासाहेबांचा थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी छापला होता.
■ बाबासाहेबांनी हा ग्रंथ भैय्यासाहेब व मुकुंदराव यांना अर्पण केलेला आहे. बाबासाहेबांचे फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथही भैय्यासाहेबांनी छापले.
■ त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्यांनी वा.गो. आपटे लिखित बौद्धपर्व हा ग्रंथही आपल्या छापखान्यात छापून प्रसिद्ध केला.
आणखी काही वाचण्याजोगे भैय्यासाहेबांचे कार्य :
🔹भैय्यासाहेबांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक स्मारके उभारली.
🔹पहिले स्मारक त्यांनी मुंबई येथे उभारले. या डॉ. आंबेडकर सभागृहाचे भूमिपूजन २ एप्रिल १९५८ रोजी भुमीपूजन व २२ जून १९५८ रोजी उद्घाटन झाले.
🔹मुंबई नागरिकांच्या वतीने कफ परेड येथे बाबासाहेबांचा पुतळा बसविण्याचे ठरले. भैय्यासाहेबांनी आग्रह धरला की २६ जानेवारी १९६२ रोजीच पुतळ्याचे अनावरण झाले पाहिजे.
🔹म्हणून शेवटच्या क्षणी कमी पडत असलेली रक्कम महापौरांना दिली व ठरल्याप्रमाणे २६ जानेवारी १९६२ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल प्रकाश यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले.
प्रतिकार न्युज