नागपूर
यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले असून, निर्बंधही घातले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे न चुकता चैत्यभूमीवर जाणाऱ्या हजारो अनुयायींना यावेळी जाता येणार नाही.
नागपूर : कोरोनानिमित्त यंदा चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष हजर न राहता घरून अभिवादन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. याला प्रतिसाद देत त्यांच्या नावे एक पत्रच चैत्यभूमीवर पाठविण्याचा अभिनव उपक्रम तरुणांकडून राबविण्यात येत आहे. नागपुरातून हजारो पत्रे डाक विभागाच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहेत.
महापरिनिर्वाणदिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. कोरोनामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले असून, निर्बंधही घातले आहेत. त्यामुळे वर्षानुवर्षे न चुकता चैत्यभूमीवर जाणाऱ्या हजारो अनुयायींना यावेळी जाता येणार नाही.
मात्र, यावर्षी आगळे अभिवादन व मनातील भावना अनोख्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचत्या करीत आहेत. ‘एक पत्र’ त्यांच्या नावे पाठविण्यात येत आहे. देशभरातून जे अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत, ते चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येने पत्रे पाठवीत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजीसह इतर भाषांमधून ही पत्रे पाठवली जात आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून उपक्रम
पत्र पाठविण्याचा उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू करण्यात आला. आंबेडकरी अनुयायी असल्याने मीही या अभियानात सामील झालो. शंभरवर पोस्ट कार्ड खरेदी करून अनुयायांना देत आहे. घरातूनच त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. पोस्ट विभागालाही या माध्यमातून सक्षम करण्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न आहे.
– प्रदीप गणवीर,
समता सैनिक दल
या उपक्रमात सामील व्हा
कोरोनामुळे यंदा चैत्यभूमीवर जाता येणार नाही. पोस्ट कार्डच्या माध्यमातून आमच्या भावना पोहोचत्या करीत आहोत. ज्यांना जाता येणार नाही, त्यांनीही पत्र पाठवून या उपक्रमात सामील व्हावे.
– अनिकेत कुत्तरमारे,
समता सैनिक दल
असे पाठवा पत्र
‘अभिवादन महामानवाला’ हा संदेश आणि स्वतःचे नाव तसेच स्वतःचा पत्ता लिहून एक पोस्टकार्ड चैत्यभूमी_स्मारक_दादर_पश्चिम_मुंबई_४०००२८ या पत्त्यावर पाठवावे.’
संपादन – शिल्पा