Home Breaking News सामाजिक क्रांतिचे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त...

सामाजिक क्रांतिचे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.!* 🌷💐

8
0

सांगली…

*सामाजिक क्रांतिचे जनक राष्ट्रपिता महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांच्या १३० व्या  स्मृतिदिना निमित्त अभिवादन.!* 🌷💐

*क्रांतिसूर्य सत्यशोधक जोतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन

 

*जोतिराव यांचे आजोबा शेटीबा यांना तीन मुले होती.(१) राणोजी, (२) कृष्णाजी आणि (३) गोविंदराव.*
*गोविंदराव यांना दोन मुले होती. (१) राजाराम (२) जोतिराव.*
*जोतिराव यांचे आजोबा शेटीबा पुणे येथे येऊन फुलांचा व्यवसाय करु लागले यास्तव त्यांचे गो-हे हे आडनांव मागे पडून फुले आडनांव झाले.*
*दि. ११ एप्रिल १८२७ रोजी चिमणामाई यांच्या पोटी जोतिराव यांचा जन्म झाला.*
*जोतिराव यांच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत दि. २५ डिसेंबर १८२७ रोजी आई चिमणामाईंचे निधन झाले. यानंतर जोतिरावांचे पालनपोषण त्यांची मावसबहिण सगुणाताई क्षीरसागर यांनी केले.*
*गोविंदराव यांनी सन १८३३ मध्ये ‘चर्च ऑफ स्काॅटलॅंड मिशन’ या शाळेत जोतीरावांचे नांव दाखल केले.*

*पुढे सन १८४० मध्ये नायगांवचे खंडोजी सिदूजी पाटील यांची मुलगी सावित्रीमाई यांच्याशी जोतिरावांचा विवाह झाला.*
*जोतिरावांच्या बागेशेजारी राहात असलेले गफारबेग मुन्शी आणि त्यांचे मित्र मिस्टर लिजिट साहेब यांनी जोतिरावांच्या शिक्षणांची आवड पाहिली आणि गोविंदराव यांना शिक्षणांचे महत्त्व सांगून जोतिरावांना १८४१ मध्ये स्काॅटिश मिशनरी शाळेत घातले. याच शाळेत जोतिरावांनी इंग्रजी माध्यमाच्या सातवी पर्यंतचे शिक्षण सफलतेने पूर्ण केले.*
*यानंतर अमेरिकन विचारवंत थाॅमस पेन यांनी लिहिलेले “मानवाचे हक्क” (Rights of man) हे पुस्तक वाचले. या पुस्तकाचा जोतिरावांच्या मनावर फार मोठा प्रभाव पडला.*
*जोतिराव यांचे व्यायाम शाळेचे शिक्षक लहूजी रंगराऊत हे ब्राह्मणी वर्ण धर्मानुसार अतिशूद्र मातंग होते.*
*वस्ताद लहूजी यांनी जोतिरावांना सन १८४७ पर्यंत दांडपट्टा, ढाल- तलवार, नेमबाजी, कसरती, भालाफेक यांचे शिक्षण दिले.*
*महात्मा जोतिरावांनी इंग्रजी माध्यमातून सातव्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण घेतले असल्याने त्यांना इंग्रजांकडे मोठ्या पदांवर नोकरी मिळणे सहज शक्य होते परंतु त्यांनी नोकरी न करता सामाजिक व्यवस्था परिवर्तनाच्या कार्यासाठी आपले तन-मन-धन आणि स्वतःला झोकून दिले.*

*जोतिराव फुले यांनी दुःख न करता त्यांच्या अपमानाची वैज्ञानिक दृष्टिकोनातून चिकित्सा केली. या अपमानाचे कारण या देशातील सामाजिक व्यवस्था असून, ब्राह्मण निर्मित वैदिक-ब्राह्मणी-वर्णधर्म आणि या धर्मातील अनेक धार्मिक विधी आणि साहित्य कारणीभूत असल्याचे त्यांनी निदान केले.*
*तसेच यावरील उपाय योजनेच्या कार्याबाबतचे सखोल चिंतन- मनन जोतिराव फुले यांनी केले.*
*यानंतर जोतिराव फुले यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर अर्थात शुद्र अतिशुद्र विरुद्ध ब्राह्मण अशी दोन भागात सामाजिक व्यवस्थेची परिवर्तनीय मांडणी करून ब्राह्मणेतरांच्या दुःखाचे, दारिद्र्याचे आणि मानसिक गुलामगिरीचे कारण अविद्या (अज्ञान) असल्याचे मूलभूत सत्यशोधन केले. यास्तव “जोतीराव फुले हेच आधुनिक भारताचे सत्यशोधक ठरतात.!”*
*यावर आपल्या गुलामगिरी पुस्तकातील अखंडात जोतिराव फुले म्हणतात,*
*”विद्येविना मती गेली! मतिविना निती गेली!*
*नितिविना गती गेली! गतिविना वित्त गेले!*
*वित्ताविना शुद्र खचले! इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले.!”*

*भारतीय समाजातील तमाम शूद्र (OBC- NT- DNT- VJNT- SBC- MBC) अतिशुद्रांच्या (SC- ST) मानसिक गुलामगिरीचे खरे कारण शोधले आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी भारतातील पहिली मुलींची शाळा दि. ०१ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात काढली.*
*शूद्र- अतिशूद्रांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. यावर जोतिराव फुले म्हणतात, “आणिक भटांनी कपटे केली, विद्या ती ठेवली आपले हाती.!”*

*इ. स. १८७६ ते १८८२ या काळात जोतिराव फुले हे पुणे नगरपालिकेचे सभासद (नगरसेवक) होते.*
*इंग्रज सरकारने शिक्षण प्रसाराच्या कार्यासाठी विद्या खात्यामार्फत दि.१६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या हस्ते ज्योतिराव फुले यांना दोन शाली आणि रुपये १९३.०० देऊन सन्मानित करण्यात आले. या विश्रामबागवाडा, पुणे येथे पार पडलेल्या समारंभाला खूप लोक उपस्थित होते.*
*जोतिराव फुले यांनी आरंभलेले एत्तदेशीय बहुजन उद्धारासाठीचे शैक्षणिक कार्य, सामाजिक जागृतीचे काम पाहून पुण्यातील ब्राह्मण फारच चिडले होते. संतप्त भटा-बामणांनी रोडे आणि धोंडीराम नामदेव कुंभार यांना हत्या करण्यासाठी प्रत्येकी एक हजाराची सुपारी देऊन पाठविले होते. परंतु जोतीरावांनी या दोन भूमिपुत्र बांधवांना आपण करीत असलेल्या सर्वंकष सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती दिली. हे सर्व ऐकून या दोन्ही मारेकऱ्यांचे ह्रदयपरिवर्तन झाले. या दोघांनी जोतीराव फुले यांची क्षमा मागितली.*
*या सर्व घटनेवरून जोतिराव फुले यांचे सामाजिक व्यवस्था परिवर्तनाचे कार्य किती महान होते.? याची जाणीव होते.*
*सन १८५७ च्या बंडाला ब्राह्मण इतिहासकार “भारताच्या स्वातंत्र्याचे आंदोलन” म्हणतात. परंतु वेगळा दृष्टिकोण असणारे इतिहासकार जोतिराव फुले या आंदोलनाला ‘भट पांड्याचे आंदोलन’ म्हणतात. पुढे जोतिराव लिहितात, “त्या लोकांचे (इंग्रजाचे) राज्य या देशात आहे, तोच आपण शूद्रांनी जलदी करुन भटांच्या वडीलोपार्जित दास्यत्वापासून मुक्त व्हावे.!”*
*बहुपत्नीत्व आणि लहान मुलींचे म्हाता-यांशी लग्न लावून देण्याची कुप्रथा असल्याने विधवा महिलांची संख्या वाढत चालली होती म्हणून जोतिरावांनी विधवांच्या पुनर्विवाहास मदत केली तसेच बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.*
*यामुळे अनेक ब्राह्मण विधवा महिलांनी जोतिराव फुले यांच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात येऊन बाळंतपण आटोपून ब्राह्मण कुटुंबाची इज्जत वाचविली.*
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जोतिराव फुले रायगडावर गेले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध घेण्यासाठी त्यांना ३ दिवस अवधी लागला होता. जोतिरावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरील जंगली झाडे झुडपे तोडून समाधी स्वच्छ धुवून समाधीवर फुले वाहिली.*
*हि बातमी रायगडाच्या पायथ्याशी राहणा-या ग्रामजोशी ब्राह्मणाल कळाली. यावर तो तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ येऊन म्हणाला, ‘अरे कुणबट शिवाजीचा देव केला. मी ग्रामजोशी असता मला दक्षिणा, शिधा देण्याचे राहिले बाजूला, केवढा हा अपमान.” आणि ग्रामजोशाने समाधीवर वाहिलेली फुले लाथेने उधळून लावली.*
*यानंतर ग्रामजोशी म्हणाला, “अरे कुणबटा, तुझा शिवाजी काय देव होता, म्हणून त्याची पूजा केलीस तो शुद्रांचा राजा होता त्याची मुंज देखील झाली नव्हती.” या घटनेने जोतीराव अत्यंत संतापले.*
*पुढे जोतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पहिली काव्य निर्मिती- पोवाडा लिहिला. इतकेच नव्हे तर जोतिरावांनी आपल्या सामाजिक कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी उभारलेले स्वराज्य प्रेरणास्त्रोत आहे यास्तव जयंती सोहळा- शिवजन्मोत्सव सुरू केला.*
*त्याचवेळी जोतिराव फुले यांनी इस्लाम धर्माचे हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या जीवनावरही पोवाडा लिहिला आहे.*
*जोतिराव फुलेंनी दि.२४ सप्टेंबर, १८७३ रोजी पुणे येथे बैठक घेऊन सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या बैठकीत पुणे, मुंबई आणि इतर अनेक भागातील जवळपास ६० सत्यशोधक कार्यकर्ते बैठकीला उपस्थित होते.*
*सत्यशोधक समाज स्थापनेचा उद्देश- शूद्र-अतिशूद्रांना ब्राह्मणांनी निर्माण केलेल्या थोतांडापासून जागे करणे आणि ब्राह्मणी गुलामगिरीतून त्यांची मुक्तता करणे हा होता.*
*जोतिराव यांच्या ६० व्या वर्षी त्यांच्या तमाम चाहत्यांनी दि. ११ मे १८८८ रोजी मुंबईत मांडवी कोळीवाडा सभागृहात हजारो लोकांच्या उपस्थितीत महात्मा हि पदवी देण्यात आली आहे.*
*राष्ट्रीय सभा म्हणजेच कांग्रेस हि भटाबामणांची आहे, असे महात्मा फुले यांचे स्पष्ट मत होते.*
*डिसेंबर १८८९ मध्ये कांग्रेसची सभा मुंबईला झाली तेव्हा जोतीराव फुले यांनी गवताने बनविलेला ३० फुटी शेतकऱ्यांचा उंच पुतळा कांग्रेसच्या मंडपासमोर ठेवून कष्टकरी शेतकरी बांधवाची स्थिती कांग्रेसला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.*
*जोतिराव फुले यांच्या दैनंदिनी बाबतच्या महत्त्वपूर्ण नोंदी म्हणजे ते पहाटे ४ वाजता उठत असत. सकाळी ५ वाजता फिरायला जात असत. दुपारचे जेवण १२ वाजता आणि रात्रीचे जेवण ७ वाजता करीत असत आणि रात्री १० वाजता झोपत असत.*
*दि.२७ नोव्हेंबर १८९० रोजी जोतिराव हे आजारी असताना देखील मुंबईचे रामस्वामी अय्यावरु, रावसाहेब नारायण मेघाजी लोखंडे, पुण्यातील डॉ.विश्राम रामजी घोले यांची भेट घेतली आणि.. “आता हे अपूर्ण कार्य पूर्ण करा.!” असा संदेश दिला.*

*क्रांतिसूर्य, सत्यशोधक- राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १३० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचार आणि कार्यास विनम्र अभिवादन.*
*भावपूर्ण आदरांजली.*

संकलन

*✒ शितल खाडे,*
*मुक्त पत्रकार, सांगली.*
*मोबाईल 9403573150*

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here