êराजुरा…
कोळसा कामगारांचा देशव्यापी संप 75 टक्के यशस्वी
* किरकोळ उत्खनन – कोट्यवधीचे नुकसान
राजुरा.
दिनांक 26 नोव्हेंबर ला देशातील अकरा राष्ट्रीय कामगार संघटना व फेडरेशन आणि राज्य व केंद्र स्तरावरील कर्मचारी संघटना यांनी पुकारलेल्या बंदला येथे चांगला प्रतिसाद मिळाला. वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रात असलेल्या आठही कोळसा खाणीत संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे किरकोळ उत्पादन झाले. वेकोलिचे कोट्यावधीचे नुकसान झाले असून खाजगी कंत्राटी माती उत्खनन पूर्णपणे बंद होते. येथे बँक व पोस्ट कार्यालय पूर्णपणे बंद होते. या क्षेत्रात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
वेकोलिच्या आयटक, इंटक, एचएमएस व सिटू या चार कामगार संघटनांनी कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी बंद पुकारला होता. भारतीय मजदूर संघ या संपात सहभागी नव्हता. बल्लारपूर क्षेत्रात सास्ती, गोवरी, पोवनी, बल्लारपूर, गोवरी डीप या ओपनकास्ट कोळसा खाणी आणि बल्लारपूर 3 – 4 पीट व सास्ती भूमिगत कोळसा खाणी असून आज बल्लारपूर व पोवनी या दोन खाणी वगळता अन्य खाणीत संप पूर्णपणे यशस्वी झाला. या दोन कोळसा खाणीत काही कामगार कामावर गेल्याने किरकोळ उत्पादन झाले. वेकोलिच्या खाणीत कार्यरत खाजगी माती उत्खनन कार्य आज पूर्णपणे बंद होते.
या आंदोलनाचे नेतृत्व नंदकिशोर म्हस्के,मधुकर ठाकरे, आर.शंकरदास,अशोक चिवंडे,दिलीप कनकुलवार,रायलिंगु झुपाका,गणपत कुडे,ईश्वर गिरी,रवी डाहूले,विजय कानकाटे, दिनेश जावरे,रंगराव कुलसंगे,गणेश नाथे यांच्यासह अनेक नेत्यांनी केले.
राजुरा येथील सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका व पोस्ट कार्यालय बंद होते.येथून आज कुठलेही व्यवहार झाले नाही.
प्रतिकार न्युज