हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमोत्तर दिशेने सरकत असून, वादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे.


नागपूर : गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर विदर्भावर पुन्हा पावसाचे सावट निर्माण झाले आहे. प्रादेशिक हवामान विभागाने येत्या गुरुवारी व शुक्रवारी विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमोत्तर दिशेने सरकत असून, वादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तमिळनाडू, तेलंगण व आंध्रप्रदेशसह आजूबाजूच्या राज्यांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
वादळाचा प्रभाव विदर्भातही दिसून येणार आहे. त्यामुळे गुरुवारी व शुक्रवारी विदर्भातील नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ व वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार वादळी तडाखा बसण्याची शक्यता आहे. पावसाळी वातावरण दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.
त्यानंतर कडाक्याची थंडी अपेक्षित आहे. विदर्भात सोमवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये थंडी जाणवली. नागपूरचा पारा आणखी दीड अंशाने घसरून १२.६ अंशांवर आला. विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया येथे १०.८ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून असलेले पाऊस आणि ढगाळ वातावरण नाहिसे होताच विदर्भात पुन्हा थंडीचा कडाका वाढला. गेल्या चोविस तासांत नागपूरच्या तापमानात सहा अंशांची मोठी घट होऊन पारा १३.८ अंशांवर आला. गारठा आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे. हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश पहाडी भागांमध्ये पुन्हा बर्फवृष्टी सुरू झाली आहे. तेथील गारठायुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यामुळे २६ ऑक्टोबरनंतर विदर्भात पावसाचीही शक्यता आहे. काही जिल्ह्यांना मेघगर्जनेसह वादळी तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा वैदर्भींना कडाक्याच्या थंडी अनुभवता येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. हवामान विभागाने यंदाही विदर्भात कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविली आहे. नागपुरात दोन वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी पारा विक्रमी ३.५ अंशांपर्यंत घसरला होता.