निलेश नगराळे
चंद्रपूर/प्रमुख | 10.41 PM
घुग्घुस (जि. चंद्रपूर) ः वर्धा नदीत पोहण्यासाठी गेलेली तीन मुले बुडाल्याची घटना आज, शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीला आली. पृथ्वीराज आसुटकर (वय १५), प्रेम गेडाम (वय १५) आणि प्रचन रामटेके (वय १६) अशी बुडालेल्यांची नावे आहे. अनिल गोगला, सुजल वनकर ही मुले थोडक्यात बचावली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घुग्घुस येथील अमराई वॉर्ड येथील पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके, अनिल गोगला आणि सुजन वनकर हे वर्गमित्र होते. सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे दररोज घरच्या घरी राहणाऱ्या या वर्गमित्रांनी आज, शनिवारी वर्धा नदीवर पोहोण्यासाठी जाण्याचा बेत आखला. त्यामुळे सकाळीच पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके, अनिल गोगला आणि सुजन वनकर हे अमराई वॉर्डापासून काही अंतरावर असलेल्या वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले.
यंदा जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे नदीपात्रात बऱ्यापैकी पाणी आहे. पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचन रामटेके हे वर्धा नदीत पोहण्यासाठी उतरले. परंतु पाणी खोल असल्याने तसेच त्यांना पोहता येत नसल्याने तिघेही बुडाले. अनिल गोगला आणि सुजल वनकर ही मुले त्यांच्या जवळच पोहत होते. तिघेही बुडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा जीव वाचविण्यासाठी मदत मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, नदीवर कुणीच नव्हते. त्यामुळे त्यांनी तातडीने अमराई वॉर्डात येऊन कुटुंबीयांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही या घटनेची माहिती देण्यात आली
माहिती मिळताच कामगार नेते सय्यद अन्वर आणि सरपंच संतोष नूने घटनास्थळी पोहोचले. वृत्त लिहिस्तोवर बुडालेल्या मुलांचा पोलिस शोध घेत होते. या घटनेमुळे घुग्घुस परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बातम्या व जाहीरात साठि संपर्क साधा
प्रतिकार न्युज
8975404540