Home सांस्कृतिक महाराष्ट्र शासनाने जुन्नर येथील बौध्द लेण्या अजिंठा लेणीच्या धर्तीवर पर्यटन क्षेत्र घोषित...

महाराष्ट्र शासनाने जुन्नर येथील बौध्द लेण्या अजिंठा लेणीच्या धर्तीवर पर्यटन क्षेत्र घोषित करा…

20
0

पुणे…अनिल जगताप . पुणे

जुन्नरप्राचिन बौध्द लेण्या व शिवनेर किल्ला
भारतातील एकूण 1200 लेण्यापैकी सुमारे 800 लेणी एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे.

 

त्यापैकी शेकडो लेणी जुन्नर या परिसरामध्ये आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांना भारताच्या प्राचिन इतिहासापासून अतिशय महत्वाचे स्थान आहे. या जून्नर तालुक्यातील शिवनेर किल्ला ऐतिहासीक दृष्टया अतिशय महत्वाचा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शिवनेरच्या किल्ल्यास विशेष स्थान आहे. प्राचिन इतिहासातील सातवाहन काळापासून शिवनेर डोंगरास महत्व आहे. शिवनेर डोंगरावरील किल्ला अनेक वैशिठ्यपूर्ण घडामोडीबाबत प्रसिध्द आहे. पुणे शहरापासून सुमारे 100 कि. मी. जून्नर तालुका बौध्द लेण्यांचा परिसर आहे. जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वीचा ऐतिहासिक व सांस्कृतीक ठेवा असलेला शिवनेर डोंगर आहे. यातील बौध्द लेण्या व त्यामधील चैत्यस्तूप हे एक प्रमुख वैशिष्ठ्य आहे. या बौध्द लेण्या नागवंशीय बौध्द सातवाहन राजवटीपासून म्हणजे इ.स.पूर्व पहिल्या ते चौथ्या शतकामध्ये या आकारास आल्याचे इतिहास तज्ञांचे संशोधन आहे. शिवनेर डोंगरावरील शिवनेर, मानमोड, तुळजा, गणेश, अंबा, अंबिका, भूत लेणे या बौध्द लेणी गट समुहामध्ये एकंदर आदमासे 250 बौध्द लेणी आहेत. शिवनेर डोंगरावरील सर्व लेणी सातवाहन काळातील आहे. लेणीसमुहामध्ये अनेक विहार कोरलेले आहे. विहारामध्ये अनेक चैत्यस्तूप, लेण्या आहेत. शिवनेर किल्ल्याच्या दिशेला भूतलिंग लेणीसमुहामध्ये 50 लेण्या आहेत. दक्षिंण व पश्चिम कुशीत 65 लेण्या, लेण्याद्री पर्वत रांगेत गणेश गटामध्ये 26 लेण्या आहेत. भिक्षूंच्या निवासासाठी, उपासनेसाठी तसेच व्यापारी लोक लेण्यांचा व्यापारासाठी उपयोग करीत असत. बौध्द भिक्षू वर्षभर धम्मप्रचारासाठी फिरत असत. पावसाळ्यामध्ये सर्व भिक्षू एका ठिकाणी वर्षावासासाठी रहात असत. या लेण्यांमध्ये भिक्षूसंघ अभ्यास, ध्यान, चिंतन-मनन, वाचन करीत असत तसेच धम्म प्रशिक्षण व समाजातील सर्व नागरीकांसाठी अनेक विषयाची शिकवण व धम्मदेसना देत असत. लेण्या म्हणजे धम्म विद्यापीठच असे.
महाराष्ट्रातील पहिले साम्राज्य सातवाहनांचे होते. गोदावरी नदीकाठचा विस्तिर्ण प्रदेशावर सातवाहनांची सत्ता होती. सातवाहन काळ हा प्राचिन ऐतिहासिक काळाचा उत्कर्षबिंदू होय. सर्वात जूने नगर म्हणून जीर्णनगर असे जुन्नर चे पहिले नाव होते. शिवनेर डोंगरावरील किल्ला हे दुसरे महत्वाचे वैशिष्ठ्य आहे. लांब व उंच डोंगररांगांनी वेढलेल्या टेकडीवर उंच कडे असल्याने चहुबाजूनी चढण्यास कठीण व आवश्यक असलेल्या सोई सुविधा पुरविणे अशक्य असलेला प्राचिन ऐतिहासीक साधनांमध्ये जुन्नरचा गड किंवा जुन्नरचा डोंगर असा याचा उल्लेख आहे. याचे प्राचिन नाव जिर्णनगर हे जीन या भगवान गौतम बुध्दांच्या एक विशेषनामापैकी आहे. जुन्नर, शिवनेर परिसर अत्यंत संपन्न होता. सातवाहन काळी जून्नर राजधानीचा प्रदेश म्हणून प्रसिध्द असावे. जुन्नर ही सातवाहनांची पहिली किंवा प्रांतिक राजधानी असली पाहिजे. प्रतिष्ठाण म्हणजे पैठण ही सातवहनांची नंतरची राजधानी असावी. सातवाहन काळामध्ये शिवनेर किल्ला म्हणून प्रसिध्द नव्हता. शिवनेर डोंगराच्या कडेकपारीमध्ये सातवाहनांनी बौध्द भिक्खूंच्या वास्तव्यासाठी लेणी अनेक कोरविल्या. सर्व लेणी प्राचिन हमरस्त्यावर कोरलेल्या असत. प्राचीन काळातील कल्याण ते प्रतिष्ठाण आजचे पैठण हा व्यापारी मार्ग शिवनेरच्या पायथ्यावळून जात होता. जून्नर ही मोठी व्यापारी पेठ होती. सातवाहन काळी व्यापारास महत्व प्राप्त झाले होते. स्थानिक, परदेशी व्यापार वाढला होता. शेतीमध्ये नांगराचा वापर करुन आधुनिक पध्दतीने शेती करण्यास सुरवात झाली होती. सर्व समाजामध्ये सुबत्ता व समृध्दी होती. बौध्द लेण्यास दान व मदत करण्यासाठी तसेच बौध्द धम्म प्रसारासाठी दान करणाऱ्यांमध्ये राजे, राजघराणी, राज-अधिकारी, मंत्री, सावकार, सधन शेतकऱ्यांबरोबरच सुतार, लोहार, कुंभार, तांबट, सोनार, बुरुड, वैद्य, साळी, माळी, कोष्टी, सराफ, अत्तरे, वाहतुकीचा व्यवसाय करणारे, निरनिराळे पदार्थ-धान्य इ. चा व्यापार करणारे व्यापारी वैयक्तीक तसेच सामुदायिक संघ स्थापन करुन धम्मदान देत असत. सातवाहन काळामध्ये अनेक ग्रीक व रोमन व्यापारी येथे राहिले होते. त्यांनी अनेक लेण्यांना दान दिले होते. अनेक ग्रीक, रोमन, यवनांनी बौध्द धम्म स्विकारला होता. येथील लेण्यांमध्ये त्यांचे शिल्प व दानशिलालेख पहावयास मिळतात. माळशेज घाट, नाणेघाट हे दोन घाट कोकण व घाटमाथा, सपाटीचा प्रदेश यांना जोडणारा रस्ता या लेण्यांजवळून गेला आहे. शिवनेरी डोंगरावरील सर्व लेणी सातवाहन काळातील आहे. अनेक राजवटींनी या डोंगरवर किल्ल्याचे थोडे थोडे बांधकाम केले आहे. शिवनेर किल्ल्याचा सातवाहन, क्षत्रप, अभीर, भोज, बहामनी, शिलाहार, यादव, निजामशाही, मुघल, मराठे आणि इंग्रज इत्यादी राजवटींशी संबंध आला आहे. मध्ययुगीन सरंजामशाही व राजेशाहीमध्ये महाराष्ट्रातील रयतेचे राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म राजमाता जिजाई यांचे पोटी इ.स. 19 फेब्रूवारी, 1630 साली याच किल्ल्यावर झाला. धम्म व आधात्म आणि विर्य व शौर्याचे प्रतिक हा किल्ला आहे म्हणून भारताच्या इतिहासातील शिवनेरी किल्ला म्हणजे एक सोनेरी पान आहे. अहमदनगरच्या अहमदशाहीची पहिली राजधानी जुन्नर होती पुढे ती अहमदनगर येथे हलविण्यात आली.
शिवनेर किल्ल्यावर 65 बौध्द लेण्या आहेत. शिवनेरी येथील सर्व लेण्या हिनयान पध्दतीच्या आहेत. कोणत्याही लेणीमध्ये भगवान गौतम बुध्दाची मूर्ती नाही. काही लेण्यांमध्ये चैत्यस्तूप, अष्टकोनी खांब, नक्षीकाम, बोधीद्वार म्हणजे पिंपळपान प्रवेशद्वार आढळतात. काही लेण्यांवर ब्रांह्मी शिलालेख आढळून येतात. निरनिराळ्या आकारातील पाण्याचे टाके हे येथील एक वैशिठय आहे. किल्ल्यावर शिवस्मारकासमोर कमानीची मशीद आहे. मशीदीच्या पुढे खालच्या बाजूस बौध्द लेण्या आहेत. या लेण्यांकडे येण्यासाठी कमान मशीद व शिवस्मारक यांचेमधून साखळदंडाची अतिशय अवघड पायवाट आहे. एका लेणीच्या प्रवेशद्वारावर वेलबुट्टी नक्षी कोरलेली आहे. दुसऱ्या लेणीसभागृहामध्ये अनेक लेण्या असून सभागृहामध्ये प्रकाश येण्यासाठी खिडकी आहे. लेणी जवळ पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोढी व आंघोळीसाठी डोंगरकपारीमध्ये न्हाणपोढी आहे. एका लेणीसभागृहामध्ये बसण्यासाठी सलग कठडे आहे. येथे एक लेणी असलेला विहार, अनेक लेणी असलेला विहार तसेच एका मोठ्‌या ओसरीला लागून अनेक लेण्या अशा अनेक प्रकारच्या लेण्या आढळतात. या लेण्यांवरुन खाली अवघट पायवाटेने सपाटीला येता येते. किल्ल्यास जाण्यायेण्यासाठी किल्ल्याच्या बालेकिल्ल्यापासून बौध्द लेण्यांवरुन दगडी पायऱ्या व साखळदंडाच्या साह्याने चढउताराची वाट आहे. मात्र ही वाट अत्यंत धोकादायक व अवघड आहे. तिचा वापर जाणकारच करु शकतात.
शिवनेर किल्ल्यास जातांना गणेश दरवाज्याचे डाव्या बाजूस दोन लेण्या आहेत तसेच पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूस एका मोठ्या लेणीमध्ये शिवाई देवीचे मंदीर नंतरच्या काळात बनविले आहे. शिवाई देवीच्या लेणीमागे अनेक लेण्या कोरलेल्या आहेत. एका मोठ्या लेणीमध्ये चैत्यस्तूप आहे. चैत्यस्तूपाबाहेरील अष्टकोनी खांब तुटलेल्या आवस्थेमध्ये आहे. दुसऱ्या लेणीसभागृहामध्ये अनेक लेण्या आहेत. शिवाई देवी मंदीर ते शिवनेरचा पाचवा दरवाजा यामध्ये लेणी व पाण्याचे टाके आहेत. शिवाई देवी जून्नर परिसरातील आदिवासी लोकांची कुलदेवता आहे. शिवाई देवीच्या नावावरुन या किल्ल्यास शिवनेरी व छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवाजी हे नाव पडले आहे. शिवनेर किल्ल्याचा वापर यादव काळापासून सुरु झाला आहे. सातवाहन काळामध्ये बौध्द लेणी, शिलाहार राजवटीमध्ये तटबंदी, यादव काळात बुरुज, तटबंदी, दरवाजे, पाण्यासाठी हौद इ. तर किल्ल्यावरील इतर इमारतींचे बांधकाम बहामणी राज्यात झाले. सध्या दिसणारे छत्रपती शिवाजीच्या जन्मस्थळाचे बांधकाम मराठेशाहीमध्ये झाले.
शिवनेर किल्ल्यामागे तुळजा गावापासून अर्धा कि.मी. अंतरावर हिनयान तुळजा लेण्यांचा समुह आहे. तुळजा लेणीसमुहातील स्तूप अतिशय भव्य देखणा आहे. चैत्यस्तूपाची ऊंची सुमारे 10 फूट, अष्टकोणी खांबांची उंची 12 फूट तर गोल छताची उंची24 फूट आहे. चैत्यस्तूपाचा व्यास 6 ते 7 फूट आहे. भारतातील 3 महत्वाच्या चैत्यस्तूपापैकी हा एक चैत्यस्तूप आहे. स्तूपावर मोकळ्या भागवर गोलाकार छत आहे. स्तूपाभोवती दोन प्रदक्षिंणामार्ग आहे. स्तूपाभोवती प्रदक्षिंणा मार्गावर गोल 12 अष्टकोणी खांब आहेत. स्तूपाच्या लेणीच्या छतांवर अजंठा लेणीसारखे चित्रशैलीचे अवशेष आढळतात. चित्रशैली आता सर्व नष्ट झाली आहे. स्तूपाच्या प्रवेशाचे पुढील अष्टकोणी खांबापैकी एकाच्या वरच्या बाजूला चौकोनी भाग आहे तर दुसऱ्या खांबाच्या वरच्या बाजूला गोल भाग आहे. स्तूपाच्या उजव्या बाजूकडील एका मोठ्या सभागृहातील लेणीमध्ये तुळजा देवीची प्रतिस्थापना करण्यात आली आहे. त्यापुढे एका मोठ्या लेणी सभागृहामध्ये बसण्यासाठी कठडे आहेत. लेण्यांच्या खाली जाण्यासाठी काटकोणी पायऱ्या केल्या आहेत. लेणीचेखाली आलेनंतर पाण्यासाठी मोठे कुंड आहे. लेण्यांच्या वर अनेक पिंपळद्वार, छत्री असलेले स्तूपांच्या रांगा पहावयास मिळतात. मखर, वेलबुट्टी व बरेच नक्षीकाम केलेले दिसते.
लेण्याद्री लेणी समुहामध्ये अनेक लेण्या आहे. त्यामध्ये एका मोठ्या लेणीमध्ये चैत्यस्तूप असून अनेक अष्टकोणी खांब आहे. खांबांच्या माथ्यावर कलाकृती आहेत. चैत्यस्तूप व अष्टकोणी खांबाभोवती प्रदक्षिणामार्ग आहेत. त्यापुढील एका मोठ्या सभागृहाचे मध्ययुगीन काळामध्ये गणेशाची ओबडढोबड आकृती कोरलेली आहे. त्यास अष्टविनायकांपैकी लेण्याद्री गणपती म्हणून ओळखले जाते.
नागवंशीय महार, मांग व आदिवासी लोकांचा शिवनेर किल्ल्याशी अत्यंत जवळचा संबंध आहे. एका बौध्द लेणीतील शिलालेखामध्ये विरसेनाक व नंदनाक असा दानकर्त्याचा उल्लेख केला आहे. नागवंशीय महार आपल्या नावामध्ये नाग, नाक या शब्दाचा वापर करीत असत. उदा. अमृतनाक, रायनाक, येसनाक, रामनाक इ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी रायगड किल्ल्याचे रायनाक हे किल्लेदार होते. मायनाक भंडारी हे आरमाराचे सरदार होते. मालवण जवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सागरी सिंधुदूर्ग किल्ल्यामध्ये आजही महार, मुस्लिम व मराठा एकत्र लोक रहात आहे. त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा केली, किंल्ले बांधण्यास मदत केली हे अभिमानाने ते सांगतात. शिवरायांची मूर्ती असणारा हा एकमेव किल्ला आहे. छत्रपती संभाजी राजे व त्यांचे शाक्त गुरु कवी कलश यांना वडू-बुद्रूक येथे अमानुषपणे मारल्यानंतर त्यांचा मृतदेहावर शिवले, भंडारे व गोविंद गोपाल (वडू या गावचे गायकवाड अडनावाचे महार जातीचे लोक येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे वतनाच्या जमिनीमध्ये छत्रपती संभाजी राजे व त्यांचा शाक्त गुरु कवी कलश यांच्या समाध्या बांधण्यात आल्या आहेत.) या लोकांनी उत्तरक्रिया केली. यातील शिवले हे मराठा व गोविंद गोपाल हे महार जातीचे होते. छत्रपती संभाजी राजे व त्यांचा शाक्त गुरु कवी कलश यांच्या महारांच्या जमिनीमध्ये उत्तरक्रिया करुन तेथे त्यांच्या समाध्या बांधण्यात आल्या आहेत. प्राचिन काळापासून नागवंशीय महार नाक लोक लढाऊ, प्रामाणिक व कर्तव्यनिष्ठ म्हणून ओळखले जातात. किल्ल्याच्या जडणघडणीत व संरक्षणामध्ये महार नाक लोकांचा महत्वाचा वाटा आहे. सातवाहन काळात नाग, नाक लोकांना महत्वाचे स्थान प्राप्त झाले होते. नागलोकांनी बौध्द धम्म स्विकारुन प्रचार व प्रसार केला होता. किल्ले तयार करण्याच्या बाबतीत गौड लोक आघाडीवर होते. अगदी मोहोंजोदरो तेथील भग्न आवस्थेतील किल्ले असो कि शिवकालीन दूर्ग त्यांच्या निर्मितीमध्ये गोंडांचा हातभार लागला असावा. बौध्द वज्रयानी गुह्यसमाज तंत्रमार्गाचा अबलंब केलेले नाग हेच आजचे गौंड होय. किल्ल्यातील एका बुरुजाचे नाव मांग बुरुज आहे. मातंग जातीच्या लोकांची तटबंदी संरक्षणाची जबाबदारी होती असे लक्षात येते. मातंग लोकही मूळचे बौध्द आहेत. आदिवासी लोकांची कुलदेवता शिवाई देवीची मध्ययुगीन काळामध्ये एका मोठ्या लेणीमध्ये प्रतिस्थापना करण्यात आली आहे. एा मोठ्या लेणीचे मंदीरामध्ये रुपांतर केले आहे. त्याचे बांधकाम पेशवाई मध्ये झाले आहे. जून्नरचा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी लोक रहातात. आदिवासी लोकांचा नाग बौध्द राजवटीशी जवळचा संबंध आहे. प्राचिन राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक होते. सह्याद्रीच्या रांगांमध्ये डोगरदऱ्यांचा ठाणे, कल्याण, रायगड, मावळ, नाशिक, पुणे व जून्नर या प्रदेशामध्ये बौध्द लेण्यांच्या भागात प्रामुख्याने आदिवासी लोक रहातात. पूर्वीचे मूळनिवासी आदिवासी लोक बौध्द धम्मीय होते. बौध्द वज्रयानातील तारा या देवतेची तुळजा, शिवाई ही रुपे होय.
महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून शिवनेरी किल्ला विकसित करण्याची काम हाती घेतले आहे. कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे शिवनेरीचा इतिहास जपण्यास मदत होणार आहे. परंतू, तेथे असलेल्या शेकडो प्राचिन बौध्द लेण्यांचे काय ? सातवाहन साम्राज्याप्रमाणे छत्रपती शिवाजीमहाराजांनी रयतेचे राज्य निर्माण केले. सम्राट अशोकाप्रमाणे धम्मशासन निर्माण केले. सम्राट हर्षवर्धनाच्या राज्यकारभाराप्रमाणे सर्वधर्म सहिष्णूतेचे राज्य निर्माण केले. महाराजांनी समतेचा कारभारामध्ये सर्व जाती-जमातींना समाविष्ठ करुन घेतले. सर्व जाती-जमातींना, धर्मियांना राज्यात समान न्याय दिला. परंतू, केंद्र व राज्य शासनाचे या बौध्द लेण्यांकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. जुन्नर एस. टी. स्टॅन्ड व इतर मध्यवर्ती ठिकाणी बौध्द लेण्यांविषयी माहितीचा फलक नाही. जून्नर तालुक्यातील या लेण्यांजवळ जाण्यासाठी रस्ते तर नाहीच पण साधी पायवाट सुध्दा नाही. केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या पुरातत्व खात्याचा बोर्ड नाही. लेण्यांवर, चैत्यस्तूपांवर प्रेमी युगूलांनी अश्लील वाक्ये लिहिले आहे. वेडेवाकडी चित्रे काढली आहेत. अनेक वर्षे लेणींची साफसफाई केलेली नाही. भूतलेणीमध्ये कचऱ्याचा ढिग पडलेला आढळतो. लेण्यांची पडझड झालेली आहे. लेणीस रखवालदार नाही त्यामुळे लेणीचे संरक्षण होत नाही. लेण्यातील रंगीत कलाकृती तर नष्ट झालीच आहे. आता चैत्यस्तूप व कलाकुसरीचे कोरीव कामही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अंबा, अंबालिका लेण्यांमध्ये देव-देवतांच्या तसबिरी व मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. लेण्यांमध्ये अनेक ठिकाणी कोरुन विचित्र आकृत्या काढण्यात आल्या आहेत. लेण्यांचे सौदर्य नष्ट करुन विद्रूप व विकृत करण्यात आले आहे. अनेक लेण्यामध्ये तोडफोड करण्यात आली आहे. चैत्यस्तूप तोडण्यात, फोडण्यात आले आहे, रंगविण्यात आले आहे. लेण्यांचे अष्टकोणी खांब तोडण्यात आले आहे. लेण्यामध्ये नविन बांधकाम करण्यात आले आहे. शिवनेर लेण्यांमध्ये असलेला चैत्यस्तूप तर भिंत बांधून दडपण्याचा प्रयत्न केलेला दिसत आहे.
महाराष्ट्र शासनाने जुन्नर येथील बौध्द लेण्या अजिंठा लेणीच्या धर्तीवर पर्यटन क्षेत्र घोषित केल्यास जगातील बौध्द राष्ट्रांचे तेथे पर्यटन वाढेल. बौध्द राष्ट्रांची आर्थिक मदत होईल. जुन्नर नगरपालिकेस उत्पन्नाचा स्त्रोत वाढण्यास मदत होईल. जागतिक पर्यटनाच्या दृष्टिने जुन्नरचे महत्व वाढेल. आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोस्कोची मदत होईल.
भारतीय कला संस्कृतीच्या ऐतिहासिक परंपरेत बौध्द कला संस्कृती आडीच हजार वर्षापासून प्रतिनिधित्व करीत आहे. बौध्द लेणी स्थापत्य, चित्रकला, शिल्पकला, मूर्तीकलेचा भारताच्या संस्कृतीवर वेगळा ठसा आहे. ही कला भारताची अनुपम कला व समृध्द बौध्द संस्कृतीचे दर्शन घडविते. काळाच्या ओघात या कला-संस्कृतीचे विद्रूपीकरण, विकृतीकरण झाले आहे. परंतू, आज आपले कर्तव्य आहे की, ही असामान्य, अनुपम कला-संस्कृती टिकली पाहिजे हाच भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. शासनाचे हे कर्तव्य आहे की, किल्ल्यांच्या संरक्षण व विकासाच्या कामाबरोबरच बौध्द लेणी स्थापत्याचे जतन केले पाहिजे. संरक्षण, संवर्धन केले पाहिजे कारण याच बौध्द कला-संस्कृती हीच भारताचा सांस्कृतीक वारसा आहे.

संकलन
अनिल जगताप, पुणे. 9423013178

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here