Home राष्ट्रीय संविधान दिनी, 26 नोव्हेंबरला, “घरोघरी संविधान वाचन उपक्रम” देशभर राबवावा*

संविधान दिनी, 26 नोव्हेंबरला, “घरोघरी संविधान वाचन उपक्रम” देशभर राबवावा*

4
0

नागपूर…

*संविधान दिनी, 26 नोव्हेंबरला, “घरोघरी संविधान वाचन उपक्रम” देशभर राबवावा*
———————————–

संविधान फाऊंडेशनचे इ. झेड. खोब्रागडे, भाप्रêसे (नि.) यांची अपील :

_

संविधानिक मूल्यांचा जागर जनमाणसात होण्यासाठी शासकीय स्तरावर या वर्षाच्या संविधान दिनी “घरोघरी_ _संविधान वाचन” उपक्रम देशभर राबवण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी संविधान_ _फाऊंडेशनचे प्रमुख तथा माजी सनदी अधिकारी इ. झेड. खोब्रागडे यांनी, देशाचे मान. प्रधानमंत्री यांना दि 26ऑक्टोबर 2020 आणि_ _राज्याचे मान. मुख्यमंत्री यांना दि 20 ऑक्टोबर 2020 च्या एका निवेदनाद्वारे केली आहे._

2. आम्ही, संविधान फाऊंडेशन नागपूरचे वतीने गेल्या अनेक वर्षापासून संविधान जागराच्या प्रसार आणि प्रचारासाठी झटत आहोत. नागपूर जिल्हा परिषदेला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना, इ. झेड. खोब्रागडे, भाप्रसे यांनी शाळांमधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे दररोज वाचन हा उपक्रम, स्वतःच्या अधिकारात, “संविधान ओळख” या नावाने, वर्ष 2005 मध्ये सुरू केला. संविधानाची प्रास्ताविका शाळा, कार्यालयात लावण्यात आली. दि. 26 नोव्हेंबरला, 2005 मध्ये नागपूर येथे संविधान दिवस साजरा केला. देशात प्रथमच अशा प्रकारचा संविधान जागृतीचा उपक्रम, इ. झेड. खोब्रागडे यांच्या कल्पकतेतून व पुढाकाराने सुरू झाला. संविधानाने दिलेल्या अधिकाराचा वापर करून, शालेय मुलामुलींच्या माध्यमातून घरोघरी संविधान पोहचविण्याचे काम त्यांनी सुरू केले. पुढे या उपक्रमाने गती घेतली व त्यांच्या पाठपुराव्यामुळे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस महाराष्ट्राभर 2008 पासून तर देशभर 2015 पासून सुरू झाला. सर्व कार्यालये, शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे , इत्यादी ठिकाणी संविधान प्रास्ताविका वाचून संविधानिक मूलभूत तत्वांचा जागर होऊ लागला. संविधान फाऊंडेशनचे वतीने संविधान जागराचे अनेक कार्यक्रम, संविधान परिषद, संविधान व्याख्यानमाला, वॉक फॉर संविधान, संविधान साहित्य संमेलन, संविधानाची शाळा, संविधान दूत, संविधानावर कार्यशाळा इ. उपक्रम आजही सुरू आहेत. सध्या, आठवडा पंधरवाड्यात ऑनलाइन कार्यक्रम, “संविधानाची शाळा” या सदराखाली सुरू आहे. आम्ही केले आणि करतो आहोत म्हणून आपणास अपील करीत आहोत. कारण, संविधानाचा जागर हे राष्ट्र निर्माणाचे काम आहे .

3. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता, यावर्षीचा “26 नोव्हेंबर-संविधान दिवस ” ‘घरोघरी संविधान वाचन’ करून साजरा करावा, प्रास्ताविकेचे वाचन करावे. प्रास्ताविकेतील शब्दांचा अर्थ, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, समजून घेण्यावर भर द्यावा जेणेकरून संविधानाची ओळख, घरोघरी कुटुंबात निर्माण होईल. जसे, “आपले कुटुंब-आपली जबाबदारी” तसेच, “आपले सामर्थ्य-आपले संविधान” आहे. संविधान माणसे जोडतो, समाज व देश घडवितो. माणसांच्या जीवनातील दुःख, दैन्य, प्रश्न, समस्या दूर करण्याचे सामर्थ्य संविधानात आहे. त्यासाठी, संविधान समजून घेण्याची व त्यानुसार कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी व दायित्व,भारताचे नागरिक म्हणून प्रत्येकाची आहे. कारण, हे देशाचे संविधान आहे, संगळ्याचे आहे, संगळ्याचे कल्याण व विकास साधणारे आहे. लोकशाही मजबूत करणारे व लोकहीत, समाजहित, देशहित सुरक्षित करणारे आहे. त्यासाठी, संविधान वाचणे, समजणे व अनुपालन करणे यासाठी, “घरोघरी संविधान वाचन” हे अभियान महत्वपूर्ण ठरते.

4. भारताच्या संविधान निर्मितीचा इतिहास, संविधान सभेची वाटचाल, संविधानाची प्रास्ताविका, मूलभूत अधिकार, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत कर्तव्य, संविधानाची नीतिमूल्ये आणि कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका यांची संविधानिक जबाबदारी व उत्तरदायित्व, संविधानाची शपथ हे विषय प्राधान्याने संविधान जागृतीसाठी घेण्याची गरज आहे. संविधानाच्या जागरासाठी राज्यातील सर्व शाळा-कॉलेजेस, विद्यापीठे, सर्व कार्यालये इत्यादी सर्व ठिकाणी संविधानाची प्रास्ताविका (Preamble) लावण्यात यावे आणि वर्षभर संविधानाचे कार्यक्रम घ्यावेत.

5. सामान्य प्रशासन विभागाने राज्य स्तरावर यासाठी समन्वय करावा, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यावर या कार्यक्रमाची जबाबदारी सोपवावी. संविधान सांगताना, केंद्र व राज्य सरकारच्या काही महत्वाच्या योजना, कार्यक्रम, अभियान सुद्धा लोकांना सांगावे, प्रचार प्रसार करावा. महाराष्ट्र शासनाने 24 नोव्हेंबर 2008 ला संविधानाच्या जागराच्या संदर्भात अध्यादेश काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने दिनांक 4 फेब्रुवारी 2013 ला GR काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी परिणामकारकपणे होणे आवश्यक आहे. त्यानुसार संविधान दिनी, गावागावात संविधान सभा, विशेष ग्रामसभा घेण्यात याव्यात, घरोघरी संविधान वाचनाचा उपक्रम राबवावा, संविधान मार्च, मानवी साखळी, इत्यादींच्या माध्यमातून संविधान जागृती करावी. शालेय शिक्षण विभागाच्या वतीने प्रौढ शिक्षणासाठी जसे वर्ग चालवले जात होते त्या धर्तीवर “संविधानाची शाळा” ग्रामपंचायत स्तरावर भरविण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारला दिनांक 07 जानेवारी 2020 च्या पत्रांन्वये दिला आहे.

6. मागील सरकारने सामाजिक न्याय विभागाच्या वतीने 22 नोव्हेंबर 2019 ला राज्याचे मुख्य सचिव यांच्या स्वाक्षरीने एक शासन निर्णय काढला होता. त्यामध्ये 26 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2020 या वर्षभरात संविधानाचे अनेक कार्यक्रम राबविण्याचे नियोजन होते. पण कोरोनामुळे कुठल्याही प्रकारचे संविधानाची अंमलबजावणीचे कार्यक्रम झालेले नाहीत. त्यामुळे पुन्हा नव्याने 26 नोव्हेंबर 2020 ते 26 नोव्हेंबर 2021 पर्यंत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने संविधान जागर हे अभियान सुरू करावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. सर्व ऑफिसेस, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, इतर शैक्षणिक संस्थांमध्ये ‘संविधान जागर’चे कार्यक्रम ऑनलाईन व्हावेत अशीही विनंती केली आहे. संविधान हा विषय सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमात सर्व स्तरावर अनिवार्य करावा. अधिकारी कर्मचारी, शिक्षक-प्राध्यापक, लोकप्रतिनिधी यांच्यासाठी संविधानावर आधारित कार्यशाळा आयोजित कराव्यात जेणेकरून संविधानाचे संस्कार होतील आणि संविधान शपथेनुसार कारभार होऊन, “आपले सरकार-न्यायाचे सरकार”, ही संकल्पना अंमलात येईल. सर्व सामान्यांना संविधान समजेल अशाप्रकारे कार्यक्रम राबवावे व त्यासाठी सोपे सोपे साहित्य निर्माण करण्याची ही गरज आहे. शालेय व महाविद्यालयीन मुलामुलींमध्ये संविधान वाचण्याची आवड व गोडी निर्माण होईल, अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित करावेत. एक पात्री प्रयोग, पथनाट्य, नाटिका-नाटक, समूह गीत, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर द्यावा. शासनाच्या दि. 24 नोव्हेंबर 2008 आणि दि. 4 फेब्रुवारी 2013 च्या GR मध्ये वरील उल्लेख आहे. संविधानाचे शिक्षण देणे काळाची गरज आहे.

7. “संविधान दिवस” हा
संविधान शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सर्व मान्यवर सदस्य यांच्या योगदानाबद्दल, त्यासर्वाना अभिवादन करण्याचा सुद्धा दिवस आहे. भारताच्या या संविधानाने भारताच्या 130 कोटी जनतेला, कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही जीवन पद्धती दिली आहे. अनेकांना हे माहीतच नाही . या जीवन मूल्याचा स्वीकार व त्यानुसार वर्तन म्हणजेच ‘देशप्रेम – राष्ट्रनिर्माण’साठी योगदान ठरते हे अनेकांना माहीतच नाही. कारण संविधानाबाबत ते अनभिज्ञ आहेत. भारताचे संविधान मध्ये संविधानिक भारत घडविण्याची ताकत आहे. जर आम्ही भारतीय संविधानाप्रमाणे आचरण करू लागलो तर आत्मनिर्भर भारत घडेल. म्हणून संविधान जागर करणे आवश्यक झाले आहे. आम्ही अशीही मागणी केली आहे की भारताच्या संसद मध्ये, अधिवेशन सत्राची सुरुवात संविधान प्रास्ताविका वाचनाने व्हावी. तेच, राज्यांच्या विधानसभा व विधानपरिषदेत व्हावे, ग्रामसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगर पालिका सभेची सुरुवात प्रास्ताविका वाचनाने व्हावी. संविधान जागृतीसाठी हे आवश्यक आहे.

8. तेव्हा, संविधानाची उर्जा घेऊन, शासन प्रशासनाने संविधानाच्या प्रचार-प्रसारासाठी काम करावे , संविधाननिष्ठ समाजनिर्मिती मधूनच आत्मनिर्भर भारत घडू शकतो. यासाठी, संविधान दूत म्हणून, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी, सिनेकलावंत, खेडाळू, महिला, युवायुवती, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी-विद्यार्थिनी, बुद्धीजीवी, नामवंत व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, संस्था, संघटना, सिव्हिल सोसायटी इत्यादीना नामनिर्देशित केल्यास (मानधन न देता), संविधान जागृतीचे अभियान लोकचळवळ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते. संविधानामुळे आणि संविधानाची शपथ घेऊन सत्तेवर असलेल्या सरकारने इच्छाशक्ती दाखवून संविधानिक अधिकाराचा वापर करून, घरोघरी संविधान वाचन आणि वर्षभर जागृतीसाठी अभियान चालवावे अशी विनंती सरकारला आहे.

संकलन
इ. झेड. खोब्रागडे, भाप्रसे (नि.)
संविधान फाऊंडेशन, नागपूर
मो. 9923756900

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here