चंद्रपूर… सिध्दार्थ गोसावी..
*आज राष्ट्रीय पत्रकारिता दिवस*
लोकशाही शासन प्रणालीत निर्भय पत्रकारितेचं अतोनात महत्व आहे.
म्हणूनच पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी सार्थ उपमा दिली जाते. जेम्स ऑगस्ट्स हिकी या इंग्रजाने १७८० साली ” बेंगाल गॅझेट ” हे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करून भारतीय पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली.पण भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत ब्रिटिश सरकारचा पत्रकारितेवर अंकुश होता. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर पत्रकारितेची निकोप वाढ व्हावी या दृष्टीने भारत सरकारने प्रेस कमिशन नेमले. या कमिशनच्या शिफारशीनुसार पत्रकारितेचं स्वातंत्र्य अबाधित रहावं , भारतातील पत्रकारितेची निकोप वाढ व गुणवत्तापूर्ण विकास व्हावा, यासाठी संसदेने कायदा करून ४ जुलै १९६६ रोजी प्रेस कॉऊंसिल ऑफ इंडियाची स्थापना केली.सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या कॉऊंसिलचे अध्यक्ष असतात. एकूण २८ सदस्यांपैकी २० सदस्य हे पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर असतात. न्या. सी के प्रसाद हे कॉऊंसिलचे विद्यमान अध्यक्ष आहेत. प्रेस कौन्सिलचे प्रत्यक्ष कामकाज १६ नोव्हेंबर १९६६ रोजी सुरू झाले. म्हणून हा दिवस दरवर्षी “राष्ट्रीय पत्रकारिता दिन ” म्हणून साजरा होऊ लागला. दरवर्षी या दिवसासाठी एक संकल्पना निश्चित करण्यात येते. त्यावर आधारित परिसंवाद, चर्चासत्रे, अनुषंगिक कार्यक्रम देशभर आयोजित व्हावेत अशी कौन्सिलची अपेक्षा असते. आधुनिक न्यूयॉर्क टाईम्सचे संस्थापक एडॉल्फ ए ओश यांनी मांडलेली ” भिती व मेहेरबानी मुक्त पत्रकारिता ” ही कल्पना या वर्षीची संकल्पना आहे. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार बंधू,भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा…..
प्रतिकार न्यूज