Home राज्य हुतात्मा जवान भूषण सतई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

हुतात्मा जवान भूषण सतई यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

13
0

प्रतिकार/प्रतिनिधी

काटोल ( जि. नागपूर ) : भारत-पाक सीमेवर शहीद झालेले काटोलचे सुपूत्र हुतात्मा जवान भूषण रमेश सतई (२८)यांच्यावर आज २ वाजण्याच्या सुमारास आयुडीपी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, क्रीडा मंत्री सुनील केदार, खासदार कृपाल तुमाणे, माजी मंत्री चंद्रशेख बावनकुळे आदी उपस्थित होते.

श्रीनगरमधील गुरेज सेक्टर येथे पाकिस्ताने केलेल्या भ्याड हल्ल्यात जवान भूषण सतई यांना वीरमरण आले होते. घरी दिवाळीची तयारी सुरू होती अन् ऐन दिवाळीच्या पूर्वसंध्येला जवानाच्या वीरमरणाची बातमी समजली. त्यामुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले असून ते केवळ २८ वर्षांचे होते.

भूषण सतई यांनी महाविद्यालयात असतानाच सैन्यात भर्ती होण्यासाठी तयारी केली होती. ते वयाच्या वीसाव्या वर्षी भारतीय सैन्यात सहभागी झाले होते. दिवाळीच्या पूर्वसंध्येला गुरेज सेक्टरमध्ये भूषण कर्तव्य बजावत होते. यावेळी पाकिस्तानी लष्कराने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्यावेळी भारतीय जवानांनी शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिले. यामध्ये तीन सामान्य नागरिकांसह आठ भारतीय जवानांना वीरमरण आले. यामध्ये भूषण सतई यांचाही समावेश होता. त्यांचे पार्थिव रविवारी कामठी येथील सैनिकी कॅम्प येथे आणले. त्याठिकाणी मानवंदना देण्यात आली.

आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काटोल येथे पार्थिव दाखल झाले. रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या गर्दीने पुष्पवृष्टी करत व घोषणा देत पार्थिवाला सलामी दिली. त्यांचे मूळगाव फैलापुरा येथे पार्थिव पोहोचताच मातोश्री मीरा, वडील रमेश, धाका भाऊ रोशन आणि बहीण सविता यांना टाहो फोडला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परिवाराचे सांत्वन केले. एक तास नियोजित ठिकाणी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवून काटोलच्या मुख्य मार्गाने अंतिम यात्रा निघाली. अतिशय शोकाकुल वातावरणात काटोल व परिसरातील जनतेने  रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून अतिशय शांतपणे श्रद्धांजली दिली. आयुडीपी येथे पार्थिव पोहोचताच गायिका अंजली रत्नाकर ठाकरे हिने ‘ये मेरे वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी’ हे गीत गायले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले.

पार्थिवाला धाकटा भाऊ रोशन यांनी मुखाग्नी देताच प्रथम पोलीस व त्यानंतर आर्मीतर्फे 21 तोफ फैरी आकाशात झाडण्यात आल्या. ‘शहीद भूषण अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या. अखेर हुतात्मा जवान भूषण सतई अनंतात विलिन झाले.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here