Home सांस्कृतिक संघर्षातून मिळाले !’लहानपणी लोकांचे संडास आणि वस्तीतले उकिरडे साफ करणारा मुलगा...

संघर्षातून मिळाले !’लहानपणी लोकांचे संडास आणि वस्तीतले उकिरडे साफ करणारा मुलगा डायरेक्टर झाला…’

5
0

मुंबई…

🔷संघर्षाची परिसीमा 🔷

 

      ‘लहानपणी लोकांचे संडास     आणि वस्तीतले उकिरडे           साफ करणारा मुलगा.       डायरेक्टर झाला’!

 

 

बंधूंनो, खरेतर सांगू नये ते सांगतोय…

इतरांना प्रेरणा मिळेल कदाचित म्हणून…

 

 

आम्हा सहा भावंडांना सोडून बाप रघुनाथ अवघ्या चाळीसाव्या वर्षी सरणावर गेला. तेव्हा मी फक्त 3 वर्षाचा होतो. बाप गेल्या नंतर अशी परवड झाली कि आजतागायत विसरणे शक्य झाले नाही.
आईला काही सुचेना. दादा नोट प्रेस ला कामाला होते. पण कुणास ठाऊक काय आजार झाला होता 2 वर्ष अंथरुण रक्ताने ओले होत होते. होतं नव्हतं ते सगळं संपलं होतं. आता सहा जणांच्या पोटाची धग रोज सकाळ संध्याकाळ कशी शंमवायची या विचाराने आई रोज रडायची. रडून रडून तिची दातखिळी बसायची.
आम्ही चार बहिणी आणि दोघे भाऊ घाबरून जायचो. आईने लोकांच्या घरी विहिरीचे पाणी ओढून वाहण्याचे काम पत्करले.
मी दुसरीत होतो तेव्हा दोन बहिणी आमच्या घर मालकाच्या बंगल्यावर काम करू लागल्या आणि मला देखील सोबत नेऊ लागल्या. मालकाच्या घरी असलेले दुसरे घरगडी मला संडास साफ करायला सांगायचे.
मी ही चुपचाप साफ करायचो. संडास साफ करून झाल्यावर
मला ते बाहेरच्या पायरीवरच बसवायचे. असेल नसेल ते शिळे पाके खाऊ घालायचे.
हे बरे कि घरमालक ब्राह्मण किंवा मराठा नव्हते.. मुसलमान होते म्हणून जास्त जाच नव्हता.

  1. मला आमच्या वाडीतली आपलीच एक बाई उकिरडा साफ करायला बोलवायची. मी ही मुकाट्याने साफ करायचो. ती लई सोवळं ओवळं पाळायची माझ्यावर गोमूत्र शिंपडायची, तिचा मुलगा नी मी एकाच शाळेत वर्गात असूनही ती मला नेहमी उंबरठ्या बाहेरच बसवायची आणि दुधाचा चहा द्यायची.

दारिद्र्य खच्चून भरलेले असूनही मी शाळेत सर्व तुकड्यात पहिला यायचो. पण खाकी पॅन्ट नसायची त्यामुळे आमचा धोतर सदरा घालणारा जाधव हेडमास्तर मला खूप मारायचा, वाघमारे म्हटल्यावर जास्तच कातवून कातवून मारायचा. 3/3 दिवस हात दुखायचे, आईला येऊन सांगायचो पण आई म्हणायची.. छडी लागे छम छम विद्या येई घम घम.. आईला मला सांगता येत नव्हतं कि जाधव मास्तर मला चड्डी फाटकी असल्या मुळे हाणायचा!

आई मला शाळेत जातांना खिशात खारवलेले शिळ्या भाकरीचे तुकडे द्यायची. त्यात खिसेही साले मोठे मोठे भोक पडलेले मग काय थैली च्या दप्तरा मध्येच सगळं
.. एकदा पिकनिक आली. आईला म्हटलं काहीतरी चांगलं दे. तेव्हा आईने डब्यात दोन टपोरे नागपुरी बोर घेऊन दिले आणि एकाच्या दहाव्याला मिळालेल्या लापशीचे आंबलेले, वाळवलेले तुकडे डब्ब्यात दिले.
असो सकाळी संडास साफ करायचे आणि दुपारी शाळेत गेलो की आमचा हेड मास्तर देखील मला शिक्षा म्हणून तेच करायला सांगायचा. नाहीतर रुळांची छडी हातावर बसलीच म्हणून समजा. कातोरे मास्तर तर मूठ आवळू आवळू पाठीत असे दणके द्यायचा की जणू जात्यातच खुट्टा ठोकतोय.

काहीही प्रश्न विचारला कि उत्तर देण्यासाठी माझंच बोट वर असायचं.. पण कातोरे मास्तर अशा नजरेने बघायचा जणू मी मेलेलं जनावर.

चौथीचा रिझल्ट चा दिवस आला सर्वाना माहित होतं कि सुदाम सर्व तुकड्यां मधी पहिला येणार, त्यावेळी पोस्टाने घरी रिझल्ट यायचा, आम्ही पोस्टमन दिसला रे दिसला कि मागे मागे धावायचो पण तो भलत्याच वाडीचा निघायचा.

एकदाचा निकाल हाथी पडला आणि काय सांगु !.. कातोरे मास्तरच्या शेजारी राहणारा मराठा पोरगा शाळेत पहिला आला आणि मी चक्क एका विषयात नापास..
माझ्या आईने मग कमरेला पदर खोसला बहिणींनी पण जोर पकडला आणि मास्तरला अशा शिव्या घातल्या की बस.. तेव्हा त्याने सांगितलं चुकून झालं मग त्याने माझं नवीन कार्ड बनवलं गेलं 600 पैकी 596 मार्क मिळालेले होते. जातीयतेची बाराखडी हळू हळू मला कळू लागली होती
गोरेवाडीत बाइस्कोप वाला आला रे आला की माझ्यात वेगळंच वारं संचारायचं. पण पैसे नसायचे. बाइस्कोप च्या पेटीवर फिरणारी ती गाण्याची काळी तबकडी आणि तो कोपऱ्यात लावलेला भोंगा मला खूप अट्रॅक्ट करायचा. त्याचा हॅन्डल तो असा फिरवायचा की मोहंमद रफीचा आवाज बाईचा होऊन जायचा आणि कधी कधी इतका स्लो व्हायचा की लता मंगेशकर चा आवाज भसाड्या माणसा सारखा व्हायचा.

मला बाईस्कोप बघायला नाही मिळायचा मग मी स्वतःचाच बाईस्कोप बनवला. रोज नवे नवे चित्र जोडायचो आणि भाऊ ते फिरवत गाणे म्हणत मला दाखवायचा.

 

मला लहान लहान मंडप बांधण्याचा, मातीचे बैल, मातीचे घर, मंदिर बनवायला जाम आवडत असायचे. विहिरीचे छोटे मॉडेल बनवने, पाणी भरलेल्या बल्ब मधून आरसा चमकवून फिल्मचे तुकडे बघणे तर भयंकर आवडायचे..
वाडीतले पोट्टे मला सहसा खेळायला घेत नसत. नकट्या नफऱ्या फाटक्या म्हणून चिडवायचे. मग मी सोडा लेमन च्या बाटल्यांची बूच जमवून झांझरी बनवून वाजवत बसायचो.

मी सहावीत गेलो आणि खान साहेबाच्या बंगल्यात शूटिंगवाले आले. शत्रुघ्न सिन्हा, राज कपूर,
आलेले तोबा गर्दी झालेली. मी संडास साफ करणारा म्हणून मागच्या दाराने मला हमीद ने आत घेतलं. पण बंगल्यात घुसायची परवानगी नसल्याने काही दिसायचं नाही. पण लई थाट माट त्यांचा. शत्रुघ्न सिन्हा टॉयलेट मध्ये आले मी टॉयलेट च्या बाजूलाच असल्यामुळे त्यांचे दर्शन झाले, माझ्याकडे बघून हसले. पण माझी बोलायची डेरिंग नाही झाली. कारण ह्या जाती पाती च्या भिंती आणि वरून बक्खळ मिळालेलं दारिद्र्य माणसा मध्ये प्रचंड न्यूनगंड निर्माण करत असते. त्यामुळे तेव्हा चुकूनही वाटलं नाही की हा इतका मोठा माणूस एक दिवस माझ्या डायरेक्शन खाली माझ्या सिनेमांत काम करेल.

गोरेवाडीत बाबासाहेबांची जयंतीची मिरवणूक निघाली की मला काय करू आणि काय नाही असं व्हायचं कारण आई बाबां बद्दल आणि बुद्धा बद्दल इतकं सांगायची की तिला हे कसे काय माहित याचं आश्चर्य वाटायचं. एकदा विचारलं तर तिने मला एक
कापडात गुंडाळलेला एक भला मोठा गठ्ठा काढून दिला.. बघतो तर काय त्यात बहिष्कृत भारत, मूकनायक, जनता, प्रबुद्ध भारत या सर्व बाबासाहेबांच्या पेपरांचे अंक होते. म्हणाली तुझ्या बापाला खूप वेड होतं हे वाचण्याचं. निळी टोपी घालायचा तुझा बाप. आता तू वाच हे सगळं !

आई बाबाची आणि बुद्धाची जयंती अशी साजरी करायची की आख्खी गोरेवाडी बघायची. स्वतः जुनेर जोड नेसायची पण पोरांना नवे कपडे घ्यायची म्हणजे घ्यायचीच!
एकदा गोरेवाडीत बाबासाहेबांचे चिरंजीव भिक्षुक होऊन आले आईने चक्क त्यांच्या पुढे वंदन केले आणि कसे करायचे ते मलाही शिकवले.

सहावीचीच गोष्ट. शाळा लई मोठी नाव होतं पुरुषोत्तम शाळा.
शाळेच्या नावाने उर भरून यायचा.. वाटायचं की उत्तम पुरुष घडविणारी शाळा.. पण हळू हळू पँथर संघटनेशी जुळल्या मुळे पुस्तकं हाती पडायला लागली.. शंकर काकळीज, रंजन जगताप रवी खंडांगळे, प्रियकीर्ती त्रिभुवन, भीमराव पगारे सर यांच्यामुळे चळवळ कळायला लागली. मी शाळेत भाषण करायला लागलो.
ऑगस्ट महिना आला मला नांदुरकर मास्तराने भाषण करायला सांगितलं .. मी शंकर भाऊकडे गेलो म्हणालो टिळका बद्दल बोलायचंय… म्हणे लिही ज्याची कायम पुण्यतिथीच लक्षात ठेवावी असा नेता. आमच्या महात्मा फुलेंच्या केसाची ही सर नसलेला भट! टिळक म्हणजे गणपतीचं खूळ आणून आमच्या शिवाजी महाराजांना डावलणारा महा जातीवादी बामन,
पँथर मुळे बाबासाहेब कळायला लागले, बाबुराव बागुल वाचले, तेव्हा समजायला लागलं की ही पुरुषोत्तम शाळा तर भटोत्तम शाळा आहे सगळी भटा बामणांचीचं भरती,
पुरुषोत्तम म्हणजे दुसरा तिसरा कुणी नसून सीतेवर संशय घेणारा राम, आपल्यावर प्रेम करणाऱ्या बाईचे नाक कापायला लावणारा स्त्री अत्याचाराचा जनक, शंबुक नावाच्या शूद्र ऋषींचा खून करणारा राम म्हणजे पुरुषोत्तम ! शाळे बद्दलचा सगळा अभिमान गळून पडला.
असो रिझल्टचा दिवस उगवला काळे नावाचा मास्तर माझा निकाल देईनाच म्हणे आईलाच घेऊन ये तुझ्या. दोन किलोमीटर पळत पळत घरी गेलो आईला शाळेत नेलं.. आई पण जाम घाबरलेली. काळे सर आईला म्हणाले .. पेढे कुठेय पेढे? आठ तुकड्यां मध्ये पहिला आलाय तुमचा पोरगा.
आईला रडूच कोसळलं. सरांनी स्वतःच पेढे दिले.. आठवीला गेल्यावर, वर्तक बाई क्लास टीचर म्हणून आल्या, बाई कुणास ठाऊक कशासाठी रोज डब्बा उरवायच्या आणि खूप प्रेमाने माझ्या पर्यंत पोहोचवायच्या.

संगीताचा पंडित मास्तर बामणच . मी चांगला गात असूनही मला तो समूहात घेत नव्हता.. कारण एक तर माझी जात आणि माझे कपडे.. मला आठवते कधी कधी तर चक्क बहिणींचे आपरे शर्ट सारखे ब्लाउज घालून शाळेत जायचो.

मोठी बहीण कामाला लागली थोडं फार सगळं सुरळीत सुरु झालं. आम्ही सर्व भावंड बहिणीला रोज सायंकाळी बस स्टॅन्ड वरून आणायला जायचो. कारण वाडी पासून बस स्टॅन्ड दोन मैल लांब आणि सुनसान रस्ता, ती आम्हाला बस मधून उतरल्यावर उसाचा रस, गोडी शेव, कधी कधी डोसा वगैरे खाऊ घालायची.
एक दिवस आम्ही भावंड सायंकाळी स्टॅण्डवर पोहोचलो एक तास गेला दोन तास गेले अगदी रात्रीचे बारा वाजले पण बहीण आलीचं नाही.

दोन दिवसांनी कळलं की तिने लग्न केलं. बरे झाले भाऊ नोट प्रेस ला कामाला लागला.. पुन्हा सगळं छान छान होऊ लागलं.. माझी आठवीची परीक्षा आली. दुसऱ्या दिवशी पेपर म्हणून मी माळ्यावर बत्ती च्या उजेडात अभ्यास करत होतो रात्रीचे दोन वाजले अन आमची दाणादाणच उडाली..
आई थरथरायला लागली, मोठमोठ्याने ओरडू लागली, भिंतीवर डोकं आपटू लागली, डोकं फुटलं रक्त ठिपकू लागलं. आई जवळ कुणीही गेलं की ढकलून द्यायची. चार चार माणसं मिळून देखील तिला आवरू शकली नाही.

आम्हा भावंडांना काही सुचेना, कुणी बोलायचं भूत बाधा झाली तर कुणी बोलायचं येडी झाली. मग काय दुसऱ्या दिवसापासून रोज भगत घरी येऊ लागले, आईला झाडूने, चाबकाने चपलेने मारू लागले. भूत उतरवू लागले.. परिणामी काहीच दिवसात आई ची शुद्ध हरपली आई मुकी झाली.. आईला दिसेनासे झाले.

शेजारच्या मुस्लिम लोकांनी सुचवले म्हणून आम्ही नादान भावंडांनी होकार दिला. काही मौलाना भूत उतरावयास येऊ लागले.. काळी बाहुली जाळने, बाटलीत भूत धरून जमिनीत गाडणे. लिंबू काय अंडे काय लई लई विचित्र प्रकार पाहिले, दोन वर्षात आठ भगत केले. साले आईला खूप मारायचे साले मी खूप शिव्या द्यायचो त्यांना. एका अंबाबाई ला तर मी चपलाच फेकून मारून पळवून लावले. एकीच्या अंगात संतोषी माता यायची तिला मी सुया टोचायचो.
ती घुमणे सोडून द्यायची.

असो काही केल्या आई बरी होईना एकाने सुचवले चाळीसगावला तिथे डोंगरावर पीर मुसा कादरी बाबाचा दर्गा आहे..असे आजार तिथले मौलाना, फकीर, एका झटक्यात ठीक करतात.
मग काय गेलो आम्ही आईला घेऊन. माझी मुकी आंधळी आई रात्रंदिवस दिवस उपाशी पोटीच तिथल्या दर्ग्याच्या लोखंडी जाळीला पुतळ्या सारखी धरून बसायची.

भाऊ आणि मी दोन दिवसा आड चकरा मारायचो चार महिन्यात दर्ग्यावर जे पाहिले ते खूप भयंकर होतं.. एक मौलवी म्हणाला मा अब ठीक हो गयी तुम्हारी, लोगों को न्याज खिलाओ, मग आम्ही 500 लोकांना अन्नदान केले, थडग्यावर हिरवी चादर आणि चांदीचा घोडे वाहिले.. घरी आलो पण आई जशीच्या तशीच.

अखेर दोन वर्षांनी आई बरी झाली पण एका मानसोपचार तज्ञ डॉक्टर मुळे.
पण सगळ्या तुकड्यात पहिला येणारा मी दहावीला जेमतेम 50 टक्के मार्कांनी पास झालो.
11 वी ला एका मित्रा ने छात्रभारती नावाच्या विद्यार्थी संगठनेत सामील केले. काही बैठका दोन तीन शिबीर अटेंड केले. अंधश्रद्धा म्हणजे काय समजलं. ना य डोळे, नरेंद्र दाभोलकर, अर्जुन जाधव शाम मानव सारख्या लोकांकडून जे शिकायला मिळालं त्याने आयुष्यच पालटलं.. जाती पातीच्या बाहेर बघायला शिकलो पँथर ने विद्रोही बनवलं तर छात्रभारतीने संतुलन दिलं. खऱ्या अर्थाने जीवन व्यापक झालं. बुद्ध मला तिथेच जास्त समजला आणि दिसला.
बुद्धाच्या समाजवादाचा माझ्यावर असा असर झाला की मी माझ्या पेक्षा 2 वर्षांनी मोठ्या असलेल्या मुलीशी आणि ते देखील विधवा मुलीशी लग्न केले.
जिला मुलं बाळ होणे शक्यच नव्हते.

पुढे आमची आई बरी झाली आणि काही दिवसांनी माझ्या बहिणीला देखील सिझोफ्रेनिया cheअटॅक येऊ लागले… नवी संकट उभे राहिले.

तिचा त्रास इतका भयानक होता की सांगायलाच नको. रोजच हाणामाऱ्या होऊ लागल्या, ती रात्री बेरात्री रेल्वे ट्रॅक वर जाऊन झोपायची, ट्रॅक मधून चालायची. मी आणायला गेलो की दगड मारायची. पुढे पुढे ती जागेवरच सगळं म्हणजे सगळंच करू लागली. खूप भांडण तंटे होऊ लागले. अनेकदा हाणामाऱ्या झाल्या, अनेक तक्रारी झाल्या.पोलीस येउ लागले. तिला कोठडीत डांबू लागले.
एकदा सर्व घरच्यांनी मिटिंग घेतली आणि ठरवले कि बहिणीला लांब कुठे तरी उत्तर प्रदेशात सोडून यायचे.. हे आमचं अज्ञानच होतं.. पण छात्रभारती सारख्या विचारमंचाने भानावर आणलं होतं. अखेर ठाण्याचे मेंटल हॉस्पिटलला पोलिसांच्या मदतीने पोहोचलो. भाऊ आणि मी महिन्या पंधरा दिवसातून ठाण्याला येऊ लागलो बहिणीला भेटू लागलो..

बाकी बहिणींचे वय वाढू लागले लग्न जमेनात आईची तर दृष्टीच गेली होती, त्यामुळे एकूण सगळ्यांचीच वाताहत झालेली होती. भाऊंची देखील तिशी उलटली…
अखेर 33 व्या वर्षी मामाच्या पोरीशी भाऊचे लग्न लावले… काही दिवसात मला NSD च्या interview साठी मुंबईला बोलावलं. वेळेत पोहोचावे म्हणून मी आदल्या दिवशीच जोगेश्वरीला एका मित्राकडे जाऊन थांबलो.नेहरू सेन्टर मध्ये 14 व्या माळ्यावर सकाळी 10 ला लेखी परीक्षा होती.
मी आठ ला जोगेश्वरी स्टेशनवर पोहोचलो पण लोकल मध्ये चढताच येईना. 11 वाजता वरळीला पोहोचलो.
आयुष्यात पदोपदी इतकी नाटकं वाट्याला आली कि साली एक फिल्म बनेल. 14 व्या माळ्यावर जातांना नेमकी 7 व्या माळ्यावर लिफ्ट बंद पडली मी मध्येच अटकलो.. पुढे जेव्हा पोहोचलो तेव्हा सर्वांची लेखी परीक्षा संपलेली होती. त्यांनी अर्धा तास दिला कसा बसा पेपर लिहिला. अर्धा तास तोंडी परीक्षा झाली.

निराश होऊनच नाशिकला घरी परतलो. आणि दुपारी चार वाजता डायरेक्ट तार आली की मी पास झालोय. दिल्लीला फायनल interview ला बोलावलंय. गिरीश कर्नाड विजया मेहता, रोहिणी हट्टणगडी, रतन थीय्याम असे 10 /12 लोक बसलेले. आणि तिथेही selection झालंच.

दिल्लीला गेलो.. नवीन विश्व होतं सगळं. खायची राहायची कपड्याची अजिबात चिंता नव्हती.. चिंता होती ती फक्त घरची. बहिणींच्या लग्नाची.
पुढे बहिणीचं काय झालं हे इथे लिहिणे खूपच अवघड आहे.. एक मोठी कादंबरी होईल इतकी संघर्षमय गोष्ट आहे तिची.

मी दिल्लीहून एका वर्षाने सुट्टीत घरी आलो, मे महिना होता, भाऊला मुलगी झाली.. आणि एक नवीनच tragedy सुरु झाली.. जन्मलेली मुलगी डोळेच उघडेना.. म्हणजे तिच्या पापण्या चिपकलेल्या निघाल्या… आता नवीन संघर्ष सुरु झाला.. मुलीला दृष्टी आणण्याचा…
पोटातच मुलींना मारण्याच्या महान हिंदू संस्कृतीत आम्ही मुलीला दृष्टी आणण्यासाठी साठी झगडू लागलो.., *तोच संघर्ष मी उम्मीद चित्रपटात मांडला ! शत्रुघ्न सिन्हा साहेबाना घेतलं. पूनम धिल्लोन, मृणाल कुलकर्णी, सुलभा देशपांडे, हिमानी शिवपुरी, अशोक लोखंडे, मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, निदा खान असे 15 ऍक्टर घेतले.*
सिनेमा संपला तेव्हा एक मित्र म्हणाला… *विश्वास बसत नाही लहानपणी लोकांचे संडास आणि उकिरडे साफ करणारा मुलगा आज डायरेक्टर झाला’!*
शत्रुघ्न सिन्हा साहेबांनी विचारले पुढे त्या अंध मुलीचे काय झालं?
म्हटलो अब वो इस दुनियामे नही है सर ! doctor से सलाह मशवरा लेके भाई को और एक बेटी हुई लेकिन वो भी….
साहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. आई गेली भाऊ गेला, मुलगी गेली, आता करोनाच्या काळात 22 वर्षाचा मुलगा ही गेला…
माझ्या संघर्षाची परिसीमा खूप लांब लचक आहे लिहीन लवकरच आत्म कथेत …
एव्हढे मात्र खरे की कितीही संकटे आली, परिस्थिती लाख वाईट झाली *तरी पण बाबांची बुद्धाची लेकरं आम्ही हार कधी मानत नाही. आत्महत्या तर मुळीच करत नाही हे नक्की.*

लेख आवडला तर नक्कीच share करा. फोन करा. आणि आमचा खैरलांजीवर आधारित *उतरंड* चित्रपट बघा!
सुदाम वाघमारे
*लेखक/ दिग्दर्शक*
9820208028/
9833777250

प्रतिकार न्यूज

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here