Home Breaking News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ; बी.ए. ‘ॲडिशनल’सह बहि:शाल अभ्यासक्रम बंद ! विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ; बी.ए. ‘ॲडिशनल’सह बहि:शाल अभ्यासक्रम बंद ! विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

24
0

Pratikar News

By Nilesh Nagrale  | : March 23, 2022 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने बी.ए. ‘ॲडिशनल’ अभ्यासक्रमासह आता बी.ए. बहि:शाल अभ्यासक्रमदेखील बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे काम करीत असताना पदवी संपादन करण्यात विद्यार्थ्यांना अडचणी येणार आहेत. या विद्यार्थ्यांचे यंदाच्या उन्हाळी परीक्षांपासून अर्ज स्वीकारू नयेत, असे निर्देशच परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी जारी केले आहेत.

कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या कार्यकाळात विद्यार्थी हिताच्या निर्णयांपेक्षा इतर मुद्द्यांवरच जास्त चर्चा होत असल्याचे चित्र आहे. नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अनेक विद्यार्थी पदवी घेतल्यानंतर विशिष्ट विषयात देखील पदवी मिळावी यासाठी बी.ए. ‘ॲडिशनल’ला प्रवेश घ्यायचे. याशिवाय काम करीत असताना महाविद्यालयात जाणे शक्य नसल्याने अनेक जण बहि:शाल विद्यार्थी म्हणून अर्ज भरायचे. मात्र, बी.ए. ‘ॲडिशनल’सह बी.ए., एम.ए. व एलएलएमचे बहि:शाल अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव विद्यापीठात मांडण्यात आला. ११ नोव्हेंबर २०२१ रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर सखोल चर्चा झाली व या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. पुढे हा प्रस्ताव विद्वत्त परिषदेकडे पाठविण्यात आला. २५ जानेवारी २०२२ रोजी झालेल्या विद्वत्त परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला संमती देण्यात आली. व्यवस्थापन परिषदेत याला विरोध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही झाले नाही व ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत याला हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यानुसार विद्यापीठाने हे अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला व त्याला तातडीने लागू करण्याचेदेखील निर्देश दिले.

आता विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा तोंडावर आहेत. अशा स्थितीत बी.ए. ‘ॲडिशनल’सह बी.ए., एम.ए. व एलएलएमच्या बहि:शाल विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्जच महाविद्यालयांनी स्वीकारू नयेत, असे निर्देश विद्यापीठाने जारी केले आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये नाराजी

विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. याबाबत व्यवस्थापन परिषदेतील सदस्यांनी विरोध करण्याची आवश्यकता होती. मात्र, प्राधिकरण सदस्य व विद्यापीठ प्रशासन विद्यार्थीहिताबाबतच्या मुद्द्यांना बगल देत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. विशेष म्हणजे विद्यार्थी संघटना गप्प का, असा सवालदेखील उपस्थित करण्यात येत आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here