Home राज्य स्वतंत्र विदर्भ राज्य म्हणजे खर्‍या अर्थाने विकास आणि समृद्धी ...

स्वतंत्र विदर्भ राज्य म्हणजे खर्‍या अर्थाने विकास आणि समृद्धी – ॲड. वामनराव चटप * विराआंस, स्वभाप व शेतकरी संघटनेची संयुक्त बैठक

65
0

* स्वतंत्र विदर्भ राज्य म्हणजे खर्‍या अर्थाने विकास आणि समृद्धी
ॲड. वामनराव चटप
* विराआंस, स्वभाप व शेतकरी संघटनेची संयुक्त बैठक

 

राजुरा,दिनांक 20 ( तालुका प्रतिनिधी ) –
स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती हे केवळ भौगोलिक दृष्ट्या दोन प्रदेश निर्माण होणे नसून विदर्भाचा पर्यायाने येथील सर्व अकरा जिल्ह्यांचा खऱ्या अर्थाने विकास व समृद्धी होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे, असे प्रतिपादन विदर्भ आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांनी केले. राजुरा येथील साने गुरुजी सभागृहात शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष व विदर्भ राज्य आंदोलन समिती यांची आंदोलनाच्या तयारीसाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ॲड. चटप बोलत होते.
बैठकीला प्रमुख अतिथी ॲड.मुरलीधर देवाळकर, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, युवा नेते कपिल इद्दे, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद बारसिंगे, बाजार समिती माजी सभापती हरिदास बोरकुटे, माजी नगरसेवक दिलीप देरकर, मधुकर चिंचोळकर, भाऊजी कन्नाके, दिलीप देठे, नरेंद्र काकडे, राहुल बानकर, गजानन पहानपटे, मारोती येरने, विठ्ठल पाल इत्यादी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ॲड. वामनराव चटप म्हणाले की, नागपूर अधिवेशन मुंबईला होणार असले तरी पहिल्याच दिवशी दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला नागपूर येथील व्हेरायटी चौकात मानवी शृंखला करून विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलनाचा बिगुल फुंकणार आहे. घटनेच्या कलम ३ प्रमाणे राज्य निर्मितीचा अधिकार केंद्र सरकारचा व संसदेचा असल्यामुळे पहिल्यांदा दिनांक ११ मार्च २०२२ रोजी केंद्र सरकारच्या नागपूर येथील सेमिनरी हिल्स संकुलासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यातील काळात दिनांक ७ एप्रिल २०२२ रोजी जंतरमंतरवरून संसदेवर हल्लाबोल आंदोलन होणार आहे. या सर्व आंदोलनाच्या प्रचारासाठी सर्व जिल्ह्यात सभा होत असून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. चटप यांनी केले आहे.
स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीला ११७ वर्षे लोटली असून राजकिय पक्षांनी या जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि पुढील पिढीचे भविष्य ठरविणाऱ्या प्रश्नाला आपल्या राजकिय सोयीनुसार बाजूला सारले. यामुळे विदर्भात सर्वच विकास कामातील निधीचा अनुशेष,सिंचनाकडे दुर्लक्ष, वीजप्रश्न,शेतकरी आत्महत्या, गरिबी,बेरोजगारी,नक्षलवाद, प्रदूषण,कुपोषण,बालमृत्यू, जनतेची कमी झालेली क्रयशक्ती अशा अनेक समस्या निर्माण झाल्या. आता राज्यावर मोठे कर्ज असून विदर्भाला न्याय मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात हा स्वतंत्र विदर्भाचा विचार, त्यामागील उद्दिष्टे आणि स्वतंत्र विदर्भ झाल्यास होणारी समस्यांची सोडवणूक व होणारे फायदे यासंदर्भात सविस्तर जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती वक्त्यांनी दिली.
बैठकीत आगामी सहकारी संस्थांच्या होणार्‍या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, बाजार समितीचे माजी पदाधिकारी, विदर्भ राज्य आंदोलन समिती, शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here