Pratikar News
15 ऑक्टोबर 2021
बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्यासाठी 21 वर्षं घेतली
‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा बाबासाहेबांनी 1935 साली केली.
हिंदू धर्मातील असमानतेवर आसूड ओढत अखेरीस 21 वर्षानंतर त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956.त्या दिवशी बाबासाहेब सकाळी लवकर उठले. कोरा करकरीत पांढरा लांब कोट, पांढरा सदरा, पांढरे धोतर परिधान करून डॉ. आंबेडकर सकाळी श्याम हॉटेलमधून दीक्षाभूमीकडे निघाले. ते आणि त्यांच्या पत्नी माई 11 ऑक्टोबरलाच नागपुरात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ची आजही गरज का आहे?
नागपूर शहराच्या मधोमध असलेल्या दीक्षाभूमीत हजारोंचा जनसमुदाय जमला होता. बाबासाहेब आणि माई तिथे पोहोचून व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. तेव्हाचे सर्वांत वयोवृद्ध भिक्खू महास्थवीर चंद्रमणी यांना या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आलं होतं. व्यासपीठावरच्या एका टेबलावर बुद्धांची लहान मूर्ती ठेवण्यात आली होती. त्याच्या बाजूंना दोन वाघ होते. व्यासपीठावर धर्मोपदेशक बसले होते. समारंभाची सुरुवात एका मराठी गीताने झाली.
आंबेडकर
नंतर चार भिख्खूंनी बाबासाहेब आणि त्यांच्या पत्नी यांच्याकडून ‘बुद्धं शरणं गच्छामि’, ‘धम्मं शरणं गच्छामि’, ‘संघं शरणं गच्छामि’ असं म्हणवून घेतलं.
जीवहत्या, चोरी, असत्य भाषण, अनाचार आणि मद्य यापासून अलिप्त राहणार असे पंचशील म्हणवून घेतले. त्यानंतर बाबासाहेबांनी भगवान बुद्धाच्या चरणी मस्तक ठेवून तीन वेळा वंदन केले. बुद्धमूर्तीला पुष्पहार वाहिला.
दीक्षाभूमी
याच दीक्षाभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती
हे झाल्यावर आंबेडकरांचे बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित करण्यात आलं. त्याबरोबर ‘बाबासाहेब आंबेडकर की जय’, ‘भगवान बुद्ध की जय’ असा जयजयकार करण्यात आला आणि विजयादशमीच्या मुहूर्तावर बाबासाहेबांचे सीमोल्लंघन झाले.
हा सोहळा झाल्यानंतर बाबासाहेबांनी घोषणा केली की, “मी माझ्या जुन्या धर्माचा त्याग करून आज पुन्हा जन्म घेत आहे. तो धर्म असमानता आणि छळवणूक यांचा प्रतिनिधी होता. अवतार कल्पनेवर माझा विश्वास नाही. मी कोणत्याही हिंदू देवदेवतेचा भक्त उरलेलो नाही, मी बुद्धाने सांगितलेला अष्टांग मार्ग कसोशीने पाळीन. बौद्ध धर्म हा खरा धर्म आहे. ज्ञान, सुमार्ग, करुणा या तत्त्वाप्रमाणे माझे आयुष्य क्रमीन.”
त्यानंतर ‘ज्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा आहे त्यांनी उभं रहावं’, असं आवाहन त्यांनी जनसमुदायाला केलं. पाहता पाहता सगळे उभे राहिले. त्यांना पंचशील आणि बावीस शपथा म्हणावयास सांगितल्या. त्यादिवशी जवळजवळ तीन लाख लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला,’ असा उल्लेख धनंजय कीर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रात केला आहे.
ढासळत्या तब्येतीमुळे अडचणी
1955 सालानंतर बाबासाहेबांची तब्येत ढासळत चालली होती. कोणत्याच उपचारांचा त्यांना फायदा होत नव्हता. त्याच काळात ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाचे कामही सुरू होते. आपण हयात असतांनाच हे पुस्तक प्रकाशित व्हावं, अशी त्यांची इच्छा होती.
जर सर्व अनुयायांनी धर्मांतर केलं नाही तर कसं करायचं, ही भीती एकाने व्यक्त केली, तेव्हा बाबासाहेब म्हणाले, “आता धर्मांतराचा विषय पुढे ढकलू शकत नाही. ज्यांना माझ्याबरोबर धर्मांतर करायचं आहे त्यांनी ते करावं,” आपली तब्येत खंगत चालली आहे, याची बाबासाहेबांना जाणीव होती.
डॉ. आंबेडकर
आयुष्याच्या अगदी शेवटच्या काळात त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. धर्मांतर केल्यानंतर अवघ्या 50 दिवसांत त्यांनी प्राण सोडले. त्यामुळे बौद्ध धम्माची माहिती लोकांपर्यंत बाबासाहेब पोहोचवू शकले नाहीत, अशी खंत अनेक अनुयायी व्यक्त करतात.
अर्थतज्ज्ञ आणि राज्यसभेचे खासदार नरेंद्र जाधव म्हणतात, “बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यावर त्यांचं महापरिनिर्वाण झालं. त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट पूर्ण झालं नाही. 14 ऑक्टोबर नंतर मुंबईत धर्मांतराचा मोठा सोहळा ठेवण्यात आला होता. त्यात प्रल्हाद केशव अत्रेंपासून अनेक नेते त्यात सहभागी होणार होते. मात्र त्यात आंबेडकरांना सहभागी होता आलं नाही.
“आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण तो आचरण्यात आणण्याची यंत्रणा त्यांना उभारता आली नाही. ती यंत्रणा उभी राहिली मात्र आपापल्या पद्धतीने. अनेक ठिकाणी बौद्ध धर्माचं आचरण करण्यात येतं पण त्याबद्दल प्रत्येकाची थिअरी असते. हे पद्धतशीरपणे व्हायला हवं होतं, ते झालं नाही हे मान्य करावं लागेल,” असं जाधव सांगतात.
का केलं धर्मांतर?
1935 साली हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केल्यानंतर बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आणि शेवटी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
डॉ. आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा
त्यांनी हिंदू धर्म सोडण्यापूर्वी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणायचे प्रयत्न केले होते.
या प्रयत्नांना फारसं यश न मिळाल्यामुळे त्यांनी धर्माचा त्याग केला, असं सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी बोधी म्हणतात: “त्यांनी हिंदू धर्माला सुधारण्याचा बराच प्रयत्न केला. त्यांनी आकसाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला नाही. महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह ही त्याचीच उदाहरणं आहेत. त्यांनी अनेक हिंदू नेत्यांशी चर्चा केली. त्यात अगदी एस. एम. जोशी, सावरकर, टिळकांचा मुलगा श्रीधर टिळक यांच्याशी चर्चा केली होती.
“अनेक वर्तमानपत्रं केली. त्यातून सवर्ण समाजाचं प्रबोधन केलं. ती वापरत असताना सद्हेतूने कान उघडणी केली. 1942 पासून तर ते राजकारणातही होते. घटनाही लिहिली. घटनेत सगळ्यांना अधिकार दिले होते. तरीही त्यांचं समाधान झालं नाही. शेवटचा उपाय म्हणून त्यांनी हिंदू धर्मावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला,” असं रूपा कुलकर्णी बोधी सांगतात.
संदर्भ:
डॉ.बाबासाहेब आंबेडकर- धनंजय कीर
बाबासाहेबांची भाषणं आणि लेखन- भाग.1