Home शैक्षणिक पदवी प्रवेशाला शुक्रवारपासून सुरुवात; वाणिज्य, विज्ञानसाठी चुरस वाढणार

पदवी प्रवेशाला शुक्रवारपासून सुरुवात; वाणिज्य, विज्ञानसाठी चुरस वाढणार

46
0

Pratikar News

By

Nilesh Nagrale

नागपूर : बारावीचा निकाल कधी नव्हे तो ८ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची टक्केवारीही वाढली. याचा परिणाम आता प्रवेशावर (graduation admission) होताना दिसून येत आहे. नामवंत महाविद्यालयात वाणिज्य आणि विज्ञान शाखेमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढली आहे. शुक्रवारपासून महाविद्यालयांमध्ये प्रवेशास सुरुवात होणार आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे बारावीचा निकाल ९९.६२ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी निकालात वाढ झाली. यावर्षी विभागात ६५ हजार ७६५ विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले. त्यात एकट्या नागपूर जिल्ह्यातील ५४ हजार १४२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश विद्यार्थी विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे आहेत. त्यामुळे या शाखांमधील नामवंत महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून रांगा लावण्यात येत आहे. त्यामध्ये शिवाजी विज्ञान महाविद्यालय, शासकीय विज्ञान संस्था, हिस्लॉप, कमला नेहरू, मोहता सायन्स, वाणिज्य शाखेसाठी जी.एस. कॉमर्स, डीएनसी आणि इतर महाविद्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे या महाविद्यालयांच्या प्रवेशाचा कट ऑफ वाढणार आहे. दुसरीकडे कला शाखेतील जागांच्या तुलनेत विद्यार्थी अधिक उत्तीर्ण झाल्याने कला शाखेतील रिक्त जागांचे गुऱ्हाळ यंदा संपणार असल्याचे दिसून येणार आहे. कला शाखेत प्रवेशासाठी हिस्लॉप, मॉरिस आणि एसएफएसला विद्यार्थी नेहमीच पहिली पसंती दर्शवितात. त्यामुळे यावर्षी या महाविद्यालयात गर्दी वाढणार आहे.

विद्यापीठ नोंदणीला अल्पप्रतिसाद –

एकीकडे विद्यार्थ्यांमध्ये नामवंत महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चुरस वाढणार असताना, दुसरीकडे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर केवळ २० हजारावर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. आज प्रवेशासाठी नोंदणीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे प्रवेश नोंदणीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बारावीतील ग्रेडनिहाय निकाल

  • प्राविण्यप्राप्त – ६५,७६५
  • प्रथम श्रेणी – ६३,८९९
  • द्वितीय श्रेणी – १०,५५०,
  • तृतीय श्रेणी – ११०

नागपूर विभागातील एकूण विद्यार्थी – १,४१, १२२

  • विज्ञान – ६५,६८०
  • वाणिज्य – १९,६३८
  • कला – ४९,००५
  • एमसीव्हीसी – ६,६५२

निकालात वाढ झाल्याने निश्‍चितच चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असणार आहेत. शिवाय यावर्षी सेंट्रलाईज प्रवेश नसल्याने या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा कस लागणार आहे.

डॉ. महेंद्र ढोरे, प्राचार्य, श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here