घुग्घुस (जि. चंद्रपूर) : पतीने पहाटेच्या सुमारास घराच्या बाहेर कडूलिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. काही वेळातच पत्नीला रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. मात्र, पत्नीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त होत आहे. तिने आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे, तर पोलिसांच्या मते पतीच्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. १७) घुग्घुस येथील अमराई वॉर्डात सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
सूरज गंगाधर माने (वय २८) असे पतीचे, तर रत्नमाला उर्फ सोनी सूरज माने (वय २५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास येथील अमराई वॉर्डात सूरज माने याने घराच्या अंगणातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळातच त्याची पत्नी रत्नमाला ऊर्फ सोनी हिलाही गंभीर अवस्थेत तातडीने घुग्घुस प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु, स्थिती गंभीर असल्याने तिला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सायंकाळी तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न नव्हे, तर पतीने आत्महत्या करण्यापूर्वी तिला जबर मारहाण केली. यात तिच्या डोक्याला जबर मार लागला. यात ती गंभीर जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सूरज व रत्नमाला यांचा प्रेमाविवाह असून त्यांना ४ वर्षांचा आयूष व २ वर्षांचा आर्यन अशी दोन लहान मुले आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, दोघांच्याही मृत्यूने दोन्ही मुले उघड्यावर आली आहेत. पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहे.