Home विशेष युनियन जॅक उतरविला अन् तिरंगा फडकला, १९४२ ला स्वतंत्र झालं होतं रामटेक

युनियन जॅक उतरविला अन् तिरंगा फडकला, १९४२ ला स्वतंत्र झालं होतं रामटेक

39
0
Pratikar News
Friday, August 13, 2021
independence day

Pratikar News

By

Nilesh Nagrale

रामटेक (जि. नागपूर) : महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी ९ ऑगस्ट १९४२ रोजी भारत छोडो आंदोलनाची हाक दिल्यानंतर देशभर चैतन्याची लाट पसरली. ब्रिटिश साम्राज्याला (British Era) शेवटचा धक्का देण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली. रामटेकही त्यात मागे नव्हते. मायभूमीच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी सरसावलेल्या स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांना पळता भूई थोडी केली होती. कचेरीच्या छतावरील इंग्रजांचा युनियन जॅक काढून त्याजागी तिरंगा (Tricolor) फडकावला. एक दिवसासाठी रामटेक स्वतंत्र (Ramtek Independence) झाले होते आणि तो दिवस होता १३ ऑगस्ट १९४२. १३ ऑगस्ट १९४२ हा दिवस रामटेक तालुक्याच्या इतिहासातील एक सुवर्णपान होय.

महात्मा गांधींनी १९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलनाची हाक दिली. शहरात गांधी चौकात यानिमित्त मोठी सभा झाली. रामटेकच्या स्वातंत्र्यवीरांनी महात्मा गांधींचा ‘करू किंवा मरू’ हा संदेश कृतीत उतरविण्याच्या निर्धार केला. १२ ऑगस्ट १९४२ रोजी जाहीर भाषणांद्वारे लोकांनी ‘उत्पाती चळवळ’ करण्याची चिथावणी दिल्याचे कारण पुढे करून इंग्रजांनी स्वातंत्र्यवीर बकारामजी उरडे, सुरजलाल गुप्ता, हरी शिवराम शेंडे (हरी पिताजी) यांना अटक केली. १३ ऑगस्टला त्यांना नागपूरला घेऊन जाण्यासाठी मतापूरकर हे सब-इन्स्पेक्टर व चार पोलिस आले. स्वातंत्र्यवीरांना हातकड्या घालून सकाळी रेल्वे स्टेशनकडे घेऊन जात असताना शंकररराव कटकमवार, झिंगरजी परतेती, छान्नू लक्ष्मण बिसमोगरे, सीताराम हेडाऊ, महादेव वलोकर, मोरबाजी बिसन यांसह १५० स्वातंत्र्यवीर हाती तिरंगा घेऊन जयघोष करीत तेथे दाखल झाले आणि स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या तावडीतून मुक्त केले. रेल्वे स्टेशनवर असलेले नायब तहसीलदार जालमसिंग व सब-इन्स्पेक्टर मिश्रा यांना खादीचे कपडे घालून त्यांच्या हाती तिरंगा दिला. ते अधिकाऱ्यांना घेऊन रामटेक शहरातील तहसील कार्यालयाजवळ पोहोचले. स्वातंत्र्यवीर व पोलिस समोरासमोर उभे ठाकले. तहसीलदार हाकरे यांचीही गोळीबाराचे आदेश देण्याची हिंमत नव्हती. संधी साधून हरी शिवराम शेंडे यांनी कचेरीच्या छपरावरील ‘युनियन जॅक’ काढून त्या जागी तिरंगा फडकावला. त्यावेळी एकच जल्लोष झाला. रामटेक तालुका ब्रिटिश तावडीतून मुक्त झाला. स्वातंत्र्याची ग्वाही फिरवण्यात आली. तालुक्यावर एक दिवसासाठी स्वातंत्र्यवीरांचा ताबा होता.

ब्रिटिश लष्कराने घेतला ताबा –

स्वातंत्र्यसैनिकांनी तहसील कचेरी, पोलिस ठाणे, दिवाणी कचेरी, केअर हाऊस, म्युन्सिपल ऑफिस, पोस्ट ऑफिस जाळून भस्म केले. ‘लंकादहना’चे हे दृश्य जनता डोळ्यात साठवून घेत होती. रात्री नागरिकांची जबाबदारी सांभाळण्याकरिता गटागटाने शहरात स्वातंत्र्यवीर गस्त घालत होते. दुसऱ्या दिवशी ब्रिटिश लष्कर येऊन धडकले. ताबडतोब मोर्चेबंदी, मोक्याच्या ठिकाणी तोफा बसवून धरपकड करण्यास सुरुवात करण्यात आली. स्वातंत्र्यवीरांना गुरा-ढोरांसारखे लहानशा कोठडीत डांबण्यात आले. त्यांचा अतोनात छळ करण्यात आला.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here