Home Breaking News भंडारा : शहरात डेंगीचा पहिला बळी; कोरोनानंतर जिल्ह्यात डेंगीची लागण

भंडारा : शहरात डेंगीचा पहिला बळी; कोरोनानंतर जिल्ह्यात डेंगीची लागण

31
0
Pratikar News
Wednesday, August 4,
By

Nilesh Nagrale

भंडारा : पावसाची अनियमितता आणि वातावरणातील बदलामुळे साथीच्या आजारांचा फैलाव वाढत असून, डेंगीच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात बुधवारी २३ वर्षीय तरुणाचा डेंगीने मृत्यू झाला. स्वप्निल चटप असे मृताचे नाव आहे. डेंगीमुळे झालेला हा भंडारा शहरातील पहिला मृत्यू आहे.

लाला लजपतराय वाॅर्डमध्ये राहणाऱ्या स्वप्निल चटपला चार दिवसांपूर्वी ताप व डोकेदुखीसारखी लक्षणे जाणवू लागली. शहरातील खाजगी डॉक्टरांकडे दाखविले असता त्यांनी व्हायरल असल्याचे सांगितले. मात्र, तीन दिवसांनंतरही ताप कमी न झाल्याने दुसऱ्या डॉक्टरकडे नेण्यात आले. तेथे रक्त व इतर चाचण्या केल्यानंतर स्वप्नीलला डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी त्याला ताबडतोब नागपूरला हटविण्यास सांगितले.

नागपूर येथील खासगी रुग्णालयात बुधवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. स्वप्निल हा एकुलता एक असल्याने कुटुंबीयांवर दुखाचे डोंगर कोसळले आहे. सद्या जिल्ह्यात सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखीच्या रुग्ण संख्येत वाढ झाली असून, लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत डेंगीचे संशयित आढळले आहेत. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे व्हायरल ताप, कोरडा खोकला, घशात खवखव अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात २५४ संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १३ जणांना डेंगीची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. यात ५ ते ५५ वर्ष वयोगटातील असल्याची माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अदिती त्यादी यांनी दिली आहे. डेंगीचे डास घरात, घराभोवती होतात. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त नागरिकांनीच करायला हवा.

डेंगीच्या डासांचे वैशिष्ट्य म्हणजे ते साचलेल्या स्वच्छ पाण्यात होतात. घरांमध्ये राहतात व दिवसा चावतात. शाळेत, ऑफिस आदी ठिकाणी डासांचा बंदोबस्त करायला हवा. घरातील कुंड्या, फ्रीजच्या खालील ट्रे, फुलदाणी, एअर-कंडिशनर तसेच उघड्यावरील टायर, फुटके डबे, कौले, करवंट्या, गच्चीवर पाणी साठण्याच्या जागा, झाकण उघडे राहिलेल्या पाण्याच्या टाक्या आदी पाणी साठल्यास तिथे डेंगीचे डास होतात. हे सर्व टाळायला हवे. घरातील पाण्याची पिंपे आठवड्यातून एकदा पालथी करून पूर्ण रिकामी करून धुवायला हवीत. योग्य काळजी घेतल्यास डेंगी होण्यापासून बचाव व नियंत्रण मिळविता येत असल्याचे डॉ. अदिती यांनी सांगितले आहे.

डेंगी हा विशिष्ट प्रकारच्या (एडिस इजिप्ताय) डासांमार्फत पसरणारा एक प्रकारचा विषाणू-ताप आहे. त्याचे दोन उप-प्रकार आहेत. साधा डेंगी व ‘गुंतागुंतीचा डेंगी’. अचानक जोरदार ताप, तीव्र अंगदुखी, कंबरदुखी, डोळ्यांच्या खोबणीत, त्याभोवती तीव्र दुखणे, खूप थकवा अशी डेंग्यूची खास लक्षणे साध्या डेंगीमध्ये काही रुग्णांमध्ये दिसतात.

कोरोनामुळे प्रशासकीय यंत्रणा तेथे कार्यरत असल्याने इतर उपक्रमांना कार्यान्वित करण्यास उशीर झालेला आहे. तरी गावोगावी सर्वेक्षण करणे सुरू आहे. नागरिकांना स्वच्छता आणि डेंगीबद्दल जनजागृती करण्यात येत आहे.

डॉ. अदिती त्यादी, वैद्याकीय अधिकारी, भंडारा

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here