* अतिवृष्टी व पुरामुळे राजुरा, कोरपना,गोंडपिपरी व जिवती तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
* तातडीने पंचनामे करण्याचे आदेश द्यावे – शेतकरी संघटना
राजुरा, तालुका प्रतिनिधी –
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, गोंडपिपरी व जिवती या चारही तालुक्यात दिनांक 22 व 23 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आपद्ग्रस्त सर्व शेतकर्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्याचे कृषीमंत्री व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांनी द्यावे, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा शेतकरी संघटनेने राज्याचे कृषीमंत्री ना. भुसे व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
गेले दोन दिवस राजुरा, कोरपणा, गोंडपिपरी व जिवती या चारही तालुक्यात जोरदार अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील शेती आणि नाल्याच्या परिसरातील शेतीत पुराचे पाणी आले. त्यामुळे अनेक शेत खरडून गेली, काही शेतात गाळ बसल्याने पिके दबून गेली आणि काही शेतात पाणी थांबून राहिल्याने पिके सडून जात आहेत. यामुळे शेतात उभे असलेल्या कापूस, सोयाबीन या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या सर्व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे शासनाने तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी ईमेल द्वारे राज्याचे कृषीमंत्री ना. दादा भुसे यांचेकडे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, जिल्हाप्रमुख अरुण पाटील नवले, अँड.शरद कारेकर, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, अँड. श्रीनिवास मुसळे, निळकंठराव कोरांगे, सुधीर सातपुते, शेषराव बोंडे. प्रा.निलकंठ गौरकार, तुकेश वानोडे, डॉ.संजय लोहे, पंढरी बोंडे, दिनकर डोहे, रघुनाथ सहारे, बालाजी पवार यांनी केली आहे.
*******
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व खरीप पिकांच्या शेतीचा तातडीने पंचनामा करून एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या निकषावर शेतकर्यांना मदत मिळाली पाहिजे. आधीच शेतकर्यांनी कर्ज घेऊन पिकाची लागवड केली होती. पिकेही चांगली होती परंतु, निसर्गाने शेतकर्यांना या अतिवृष्टीमुळे पुन्हा चिंतेच्या आणि कर्जाच्या खाईत लोटले आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा स्थितीत सरकारने तातडीने मदत करणे आवश्यक आहे. असे
– अँड.वामनराव चटप, माजी आमदार यांनी बोलताना सांगितले.