Home आपला जिल्हा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज योजना*

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज योजना*

175
0

*जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगारांसाठी कर्ज योजना*

चंद्रपूर दि. 30 जून : सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींकरीता स्वतःचा उद्योग, सेवा उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत सन 2021-22 या वर्षाकरीता जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ग्रामीण व शहरी भागात सुधारीत बीज भांडवल कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

सुधारीत बिज भांडवल कर्ज योजना:

पात्रता: अर्जदार कमीत कमी 7 वी पास व वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष असावे. अर्जदार महाराष्ट्राचा किमान 15 वर्षाचा रहिवासी असावा.

वैशिष्टे :उदयोग सेवा व व्यापार व्यवसायातील प्रकल्प मर्यादा रु.25 लाखापर्यंत आहे. 10 लाखावरील प्रकल्पास बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्पाच्या 15 टक्केप्रमाणे अथवा जास्तीत जास्त 3.75 लक्ष बीज भांडवल रक्कम देण्यात येते. 10 लाखापेक्षा कमी प्रकल्पास सर्वसाधारण प्रवर्गातील लाभधारकांसाठी 15 टक्के तर अनुसूचित जाती, जमाती, अंपग, विमुक्त व भटक्या जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांकरीता 20 टक्के बीज भांडवल देण्यात येते. बीज भांडवलाची रक्कम मृदू कर्ज सॉफ्ट लोन म्हणून दरसाल 6 टक्के व्याजाने देण्यात येते.

बीज भांडवल कर्जाची परतफेड विहित कालावधीत करण्यात आली नाही तर थकीत रकमेवर दरवर्षी 1 टक्के नुसार दंडनीय व्याज आकारण्यात येते. बीज भांडवली कर्जाची नियमितपणे विहित कालावधीत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांस 3 टक्के सवलत देण्यात येते. तसेच कर्जाची परतफेड 7 वर्षाच्या आत करावयाची असून त्यामध्ये 3 वर्षाचा विलंबावधी समाविष्ट आहे. तर वाहतूक व्यवसायासाठी, व्यापार व सेवा उद्योगासाठी विलंबावधी 6 महिन्याचा राहील.

आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट आकाराचे फोटो, मार्कशीट, टीसी, राशन कार्ड, सेवायोजन नोंदणी जागा भाडेतत्त्वावर असल्यास संमतीपत्र तसेच अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना:

पात्रता : अर्जदारास शिक्षणाची व वयाची अट नाही. अर्जदाराचे महाराष्ट्रातील किमान 15 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. अर्जदार उद्योग सेवा व उद्योग नोंदणीस पात्र असावा.

उद्योगांमधील यंत्रसामुग्रीची गुंतवणूक 2 लाखाच्या आत असावी. उद्योगात 1 लाख लोकवस्ती पेक्षा कमी असणाऱ्या गावामध्ये सुरू करता येतो.लाभार्थ्यांस 65 ते 75 टक्के बँक कर्ज देण्यात येते. सर्वसाधारण प्रवर्गासाठी 20 टक्के बीज भांडवल रु. मर्यादा 3 लाख 75 हजार तर अनुसूचित जाती- जमाती करीता 30 टक्के कमाल रु. 60 हजारापर्यंत देय राहील. बीज भांडवलावर व्याजदर 4 टक्के राहील.

लाभार्थ्यास स्वतःचे 5 टक्के भांडवल भरणा करणे आवश्यक आहे. कर्जाचा परतफेड कालावधी 7 वर्षे आहे.

आवश्यक कागदपत्रे: विहित नमुन्यातील अर्ज, पासपोर्ट आकाराचे फोटो, मार्कशीट, टीसी, राशन कार्ड, सेवायोजन नोंदणी जागा भाडेतत्त्वावर असल्यास संमतीपत्र, अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

तरी इच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, चंद्रपूर येथे प्रत्यक्षपणे अथवा 07172-252208 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. राठोड यांनी कळविले आहे.

00000

*मुख्यमंत्री साधतील कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी संवाद*

Ø शेतक-यांनी लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि. 30 जून : खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या मोहिमांवर विशेष भर देऊन दि.21 जून ते 1 जुलै 2021 या कालावधीत कृषी संजीवनी मोहीम यशस्वीपणे पार पडत आहे. दि. 1 जुलै 2021 रोजी हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या कृषी दिनी कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप आहे.

नुकतेच कृषी विभागामार्फत सन 2020 च्या रब्बी हंगामाचे रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांसाठी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीचे पीकस्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. दि. 1 जुलै 2021 रोजी मुंबई येथे दुपारी 12 वाजता मंत्रालय, मुंबई येथे होणाऱ्या कृषी दिन कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय रब्बी हंगाम 2020 मधील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या शेतकऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते सत्कार होणार आहे.

सदर कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसुलमंत्री, कृषीमंत्री, फलोत्पादन मंत्री, कृषी राज्यमंत्री, फलोत्पादन राज्यमंत्री, सचिव (कृषी) आणि आयुक्त (कृषी) यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. तसेच सदर कार्यक्रमांच्या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कृषी विभागाच्या रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाचे यु-टयुब चॅनल www.youtube.com/c/AgricultureDepartmentGom या लिंकवरुन होणार असून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here