Home विशेष कोरोना व्हायरस म्युटेशनमुळे लसीचा तिसरा बुस्टर डोस? तज्ज्ञांचं उत्तर

कोरोना व्हायरस म्युटेशनमुळे लसीचा तिसरा बुस्टर डोस? तज्ज्ञांचं उत्तर

55
0
Vaccine

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना लशीच्या दोन डोसमधील (corona vaccination drive in India) अंतर वाढविले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी कोरोना झालेल्यांना एकच डोस पुरेसा असेल, अशीही माहिती समोर आली होती. मात्र, याबाबत सरकारने अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. जगातील अनेक देशांमध्ये जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण (vaccination) झाले असतानाही ते लसीकरणाबाबत वेगळा विचार करताना दिसून येत आहेत. काही देशांमध्ये तिसरा बुस्टर डोस द्यावा का? (third booster dose of corona) याबाबतही विचार सुरू आहे. मात्र, खरंच तिसरा डोस घ्यावा लागणार का? (what expert says about need a third booster dose of vaccine as virus mutate)

भारतामध्ये सापडलेल्या डेल्टा व्हेरींयंटमुळे सर्व जगामध्ये भीती पसरली आहे. त्यामुळे अनेक देश त्यांच्या नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी तिसरा डोस देण्याचा विचार करत आहेत. कारण, उपलब्ध लशी या अल्फा आणि बिटा स्ट्रेनवर ९० टक्के प्रभावी होत्या. मात्र, सध्या या लशी डेल्टा व्हेरीयंटपासून कमी संरक्षण देत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. मात्र, असे अधिकृतपणे अजून कोणीही सांगितलेले नाही.

इंग्लंडमध्ये क्लिनिकल ट्रायल –

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लशीचा तिसरा डोस गरजेचा आहे का? हे तपासण्यासाठी सध्या इंग्लंडमध्ये क्लिनिकल ट्रायल सुरू आहे.

फायझर आणि मॉडर्नाची घोषणा –

ज्या लोकांनी लशीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, त्यांना कदाचित बुस्टर डोस घेण्याची गरज भासू शकते. त्यानंतर वर्षाला या लशीचा डोस घ्यावा लागेल, असे फायझर आणि मॉडर्ना या दोन्ही कंपन्यांनी घोषित केले आहे.

”सध्याची परिस्थिती बघता, तिसऱ्या डोसची गरज आहे. कुठे सहा महिन्यांनी तर कुठे १२ महिन्यांनी तिसरा बुस्टर डोस घ्यावा लागेल. त्यानंतर या लशीची वार्षिक गरज पडेल. मात्र, त्यापूर्वी या सर्व गोष्टी तपासून पाहणे गरजेचे आहे. तसेच यामध्ये कोरोना व्हेंरीयंटची भूमिका देखील महत्वाची असेल,” असे फायझरचे सीईओ अल्बर्ट बौर्ला यांनी सीएनबीसीसोबत बोलताना सांगितले.

भारतात देखील या महिन्याच्या सुरुवातीला, ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या तज्ज्ञ पॅनेलने भारत बायोटेक या कंपनीला कोव्हॅक्सीनचा तिसरा डोस काही लोकांना देण्याची परवानगी दिली होती. मात्र, ही फक्त क्लिनिकल ट्रायल होती. भारत बायोटेकने सहा महिन्यानंतर बुस्टर डोस देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, अशीही माहिती आहे.

तज्ज्ञ काय सांगतात? –

जर कंपन्या लशीच्या दोन डोसनंतर तिसरा डोस देण्याचा विचार करत असतील, तर ते रोगप्रतिकारशक्तीच्या डेटावर अवलंबून असावे, असे आयसीएमआर नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक समीरन पांडा यांनी सांगितले. म्हणजेच दोन डोस घेतल्यानंतर शरीरातील अँटीबॉडीजची स्थिती काय आहे आणि काही दिवसानंतर ही पातळी जर कमी झाली तर त्या व्यक्तीला तिसऱ्या बुस्टर डोसची गरज पडू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.

कोरोना जवळपास डिसेंबर २०१९ मध्ये आला आणि लशी या एप्रिल, ऑगस्टमध्ये तयार करण्यात आल्या. त्यामुळे यांच्याकडे असा कोणता डेटा आहे, की त्या आधारावर कंपनी तिसऱ्या बुस्टर डोसबाबत सुचवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच याबाबत आश्चर्यही व्यक्त केले. ”सध्या आमच्याकडे पुरेशी माहिती नाही. त्यामुळे तिसऱ्या डोसबाबत फक्त अंदाज लावण्यापेक्षा आपल्याला किती लशीचे डोस घ्यावे, यासाठीची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तिसरा डोस घेण्याची वेळ अजून आली नाही”, असे पांडा यांनी पीटीआयला सांगितले.

कंपन्या बुस्टर डोसबाबत बोलत आहेत. मात्र, हे बुस्टर डोस काय करतात? असाही सवाल त्यांनी विचारला. बूस्टर डोस हा अँटीबॉडीज टिकविण्यासाठी व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असू शकतो. मात्र, सहा ते नऊ महिन्यानंतर अँटीबॉडीज कमी झाल्या की नाही ते समजतं, असेही ते म्हणाले.

अवयव प्रत्यारोपण झालेल्यांसाठी तिसरा डोस महत्वाचा?

अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडीसीनचा या आठवड्याच्या सुरुवातीलाच एक अहवाल प्रसिद्ध झाला. त्यानुसार तिसऱ्या डोसमुळे अवयव प्रत्यारोपण झालेल्या व्यक्तीच्या शरीरात देखील अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणात वाढू शकतात, असे सांगितले. तिसऱ्या डोसमुळे लोकांना संरक्षण मिळू शकत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे, असे अटलांटा येथील एमोरी विद्यापीठाच्या प्रत्यारोप विभागाचे प्राध्यापक क्रिस्टीयन लार्सेन म्हणाले. पण, या अभ्यासामध्ये त्यांचा समावेश नव्हता.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here