Home विशेष *रिपब्लिकन झंझावात : अॅड मा मा येवले या चरित्र ग्रंथातून एकही शब्द...

*रिपब्लिकन झंझावात : अॅड मा मा येवले या चरित्र ग्रंथातून एकही शब्द वगळणार नाही* *— अॅड मा मा येवले*

69
0

Pratikar News

नांदेड –
“रिपब्लिकन झंझावात : अॅड मा मा येवले” हा माझा चरित्र ग्रंथ माझ्या हयातीतच छपाई होऊन प्रसिद्ध झालेला आहे. मी, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी शपथ घेतली असून मी, घेतलेल्या शपथेशी एकनिष्ठ राहून सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्य केलेले आहे ते सत्य आहे आणि ते सत्य माझ्या चरित्र ग्रंथातून प्रकाशित झालेले असल्याने या ग्रंथातील एकही शब्द वगळणार नाही, असे जाहीर प्रकटन अॅड मा मा येवले यांनी नुकतेच प्रसिद्धीस दिले आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, रिपब्लिकन नेते अॅड मा मा येवले यांच्या जीवनावर आधारित “रिपब्लिकन झंझावात: अॅड मा मा येवले” हा चरित्र ग्रंथ २१ जानेवारी २०२१ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ कमलताई गवई आणि आमदार प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या शुभहस्ते प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाचे लेखक प्रा रविचन्द्र हडसनकर आणि प्रकाशक श्री निर्मलकुमार सूर्यवंशी, निर्मल प्रकाशन, कैलास नगर नांदेड यांना, या पुस्तकातील प्रकरण 48 आणि प्रकरण 73 मध्ये आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळी विरोधी केलेल्या कार्याचा उल्लेख आलेला आहे. तो मजकूर आणि प्रकरण वगळावे अन्यथा परिणाम भोगावे लागतील अश्या धमक्या त्या कार्यकर्त्यांच्या समर्थकांनी दिल्या. म्हणून लेखक आणि प्रकाशक यांनी संयुक्तपणे एक जाहीर प्रकटन स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्धीस देऊन प्रकरण 48 आणि प्रकरण 73 मधील एक प्रश्न आणि त्या प्रश्नांचे उत्तर वगळणार असे जाहीर केले.
लेखक आणि प्रकाशक यांनी संयुक्तपणे प्रसिद्धीस दिलेले जाहीर प्रकटन अॅड मा मा येवले यांची संमती न घेता प्रसिद्धीस दिले म्हणून अॅड मा मा येवले यांनी सुध्दा जाहीर प्रकटनाद्वारे सर्व जनतेला कळविले आहे की, मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या संपूर्ण चळवळीला वाहून घेण्याची शपथ घेतली. त्या शपथेस एकनिष्ठ राहून राजकीय जीवनात मी माझ्या तत्वांशी कधीही तडजोड केलेली नाही. माझ्या सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि खाजगी जीवनातील चढ-उतार, कडू आणि गोड अनुभवांची शिदोरी ग्रंथ रुपाने माझ्या हयातीतच या चरित्र ग्रंथातून प्रकाशित झालेली आहे. लेखकास जी माहिती पुरवली, त्या माहितीची त्यांनी साचेबद्ध पध्दतीने रचना केली आणि प्रकाशकाने ती प्रकाशित केली एवढाच काय तो संबंध लेखक आणि प्रकाशक यांचा या चरित्र ग्रंथाचे बाबतीत आहे. या पुस्तकातील प्रकरण 48 आणि प्रकरण 73 मधील तो प्रश्न आणि त्याचे उत्तर हे माझ्या जीवनात प्रत्यक्षात घडलेले प्रसंग असून ते माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत ते माझ्या आग्रहाखातर आणि संमतीनेच या ग्रंथात मुद्रीत करण्यात आलेले आहेत या ग्रंथ छपाईचा संपूर्ण खर्च मी केलेला आहे. या चरित्र ग्रंथात काय छापावे आणि काय छापू नये ? याचा संपूर्ण अधिकार माझा आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ते दोन्ही प्रकरणं किंवा पुस्तकातील एकही शब्द या ग्रंथातून वगळला जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे आवाहन त्यांनी केले असून पुढे असे जाहीर केले की, ज्यांना कुणाला या ग्रंथातील मुद्रीत मजकूरा बद्दल आक्षेप असतील त्यांनी प्रत्यक्षपणे मला जबाबदार धरावे. या ग्रंथाचे संबंधाने ग्रंथाचे प्रकाशक आणि लेखक यांना जबाबदार धरण्यात येऊ नये या संबंधाने जो काही कायदेशीर कारवाईचा मार्ग असेल त्यास पुराव्यानिशी उत्तर देण्यासाठी मी बांधील राहिल. या ग्रंथाचे संबंधाने ज्याला कुणाला आक्षेप असेल त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे अगोदर त्यांनी त्यांचे राजकीय जीवनात काय काय उद्योग केलेत त्यांचे प्रथमतः अवलोकन करावे त्यांनी त्यांचे झाकून असलेले गंभीर स्वरूपांचे पितळ उघडे होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन सुध्दा या जाहीर प्रकटनाद्वारे अॅड मा मा येवले यांनी केले आहे.
माझ्या रिपब्लिकन चळवळीतील बारीकसारीक घडामोडी आंबेडकरी अनुयायांपूढे आणल्याबद्दल या जाहीर प्रकटनाद्वारे अॅड मा मा येवले यांनी लेखक प्रा रविचन्द्र हडसनकर आणि प्रकाशक श्री निर्मलकुमार सूर्यवंशी यांना धन्यवाद दिले आहेत.

बातम्या आणि जाहिरातकरीता संपर्क साधावा - 7038636121

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here